याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘५ जी स्पेक्ट्रम’ लिलावाच्या प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. त्यानुसार दि. ५ जुलैच्या अखेरीस लिलाव प्रक्रिया होणार असून त्यानंतर भारतात ‘५ जी’ नेटवर्कच्या वापरास प्रारंभ होणार आहे. त्यानिमित्ताने ‘५ जी’ तंत्रज्ञानाची तांत्रिक पार्श्वभूमी आणि त्याचे फायदे यांचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख...
तंत्रस्नेही व्यवहार हा जीवन पद्धतीचा पाया व शक्तिशाली इंटरनेट हेच गृहीतक आहे. ते नसेल, तर ‘डिजिटल इंडिया’ कसे साकारणार? रस्ते नसतील, तर वाहने घेऊन काय उपयोग? त्याचप्रमाणे उच्च इंटरनेट ‘बॅण्डविड्थ ही एक्सप्रेसवे’ इतकीच अत्यावश्यक आहे. २०व्या शतकात ‘अन्न, वस्त्र, निवारा’ या आवश्यक गरजा होत्या. एकविसाव्या शतकात ‘वीज, मोबाईल व इंटरनेट’ यांची यात भर पडली आहे. इंटरनेटने भूगोल इतिहासजमा केला व आता सर्व वयोगटाचे लोक ‘लॉकडाऊन’मुळे तंत्रस्नेही झाले. इंटरनेट हे एकमेकांना जोडणी केलेल्या सर्व संगणकांचे एक जागतिक नेटवर्क आहे. नॉर्वेसारख्या विकसित देशात इंटरनेट हा मानवी हक्क म्हणून गणला आहे. हेच लोण २०२५ नंतर भारतातही येईल. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला अन्न, वस्त्र, निवार्याबरोबरच वीज व इंटरनेट देणे हे सरकारवर बंधनकारक असेल. इंटरनेट हे हवेसारखे असेल. माहिती-तंत्रज्ञानातील क्रांती, तिचा सर्वदूर प्रसार आणि परवडणार्या किमतीत मिळणारी विविध ‘स्मार्ट’ उपकरणे यांमुळे गेल्या दहाएक वर्षांत आपणा सर्वांना इंटरनेट, वेब, ब्रॉडबॅण्ड, वायफाय इ. शब्दप्रयोग चांगलेच माहीत झाले आहेत. जेथे ‘रेंज’, वीज आणि स्मार्टफोन आहे, अशा सर्वच शहरी आणि बहुतेक निमशहरी भागांत इंटरनेटवर आधारित विविध व्यवहारांची संख्याही लक्षणीय आहे. मागणी वाढली तरी त्याप्रमाणात पुरवठा न वाढल्याने ब्रॉडबॅॅण्ड असूनही स्पीड मिळत नाही, नेट स्लो झाले आहे, डाऊनलोड होत नाहीये लवकर... अशा तक्रारीही ऐकू येत असतात आणि ‘आमचेच नेट कसे फास्ट आहे’ हे दाखवण्यासाठी बर्याच संबंधित कंपन्या तशा जाहिरातीही करीत असतात. सध्या प्रत्येकाच्याच हाती स्मार्टफोन्स दिसू लागल्याने ‘हँडसेट’वरून ‘लाइव्ह स्ट्रीमिंग व्हिडिओ’ पाहणार्यांची संख्या विलक्षण वाढणार आहे व अशा अनेक सुविधांसाठी ‘५ जी’ तंत्र नुकतेच प्रकाशात आले आहे. ‘५ जी’ म्हणजे नक्की काय, ते समजण्यासाठी आपल्याला मोबाईलचा इतिहास समजून घ्यावा लागेल. यातील ‘जी’ म्हणजे ‘जनरेशन.’ आपण याला आपल्या भाषेत पिढी अथवा जशी पुस्तकाची असते तशी आवृत्ती असे म्हणू.
इतिहास
‘१ जी’ : सेल्युलर मोबाईल सर्व्हिसेस ही सर्वांत आधी ’Analogue’ रेडिओ टेक्नोलॉजी वापरात होते, तीच ’फर्स्ट जनरेशन सिस्टिम’ असे मानले जाते. त्यावरून फक्त फोन करता येत असत.
‘२ जी’ : त्यानंतर Analogue रेडिओ टेक्नोलॉजी नेटवर्क ‘डिजिटल’ नेटवर्कमध्ये रुपांतरीत झाल्यास ‘२ जी’ असे संबोधले जाते. ‘२ जी’ मध्ये इंटरनेटची सुविधा नव्हती. ‘२ जी’ने ‘एसएमएस’ (शॉर्ट मेसेजिंग सर्व्हिस) या सुविधेचा प्रथम वापर सुरू केला.
‘३ जी’ : त्यानंतर मोठ्या प्रमाणात पसरले गेलेल्या व अधिक चांगल्या सोई, जास्त वेग व संपूर्ण सुधारित आवृत्तीस ‘३ जी’ म्हणता येईल. इंटरनेट मोबाईलवर आले ते ‘३जी’ मुळे!
‘४ जी’ : स्मार्टफोनच्या आगमनानंतर लोक ‘डेटा’मोठ्या प्रमाणावर वापरायला लागले आणि त्यामुळे अधिक जलद इंटरनेटची गरज भासू लागली. त्यातून ‘४ जी’ नेटवर्कचा जन्म झाला. मोबाईल नेटवर्कच्या या चौथ्या आवृत्तीतील मुख्य सुधारणा म्हणजे अधिक जलद इंटरनेट सुविधा.
‘५ जी’ : ‘५ जी’ तंत्रामुळे आपण फक्त स्मार्टफोन नव्हे, तर सर्व उपकरणे जोडू शकू. ‘५ जी’ मोबाईल नेटवर्कमध्ये खूप जास्त ‘बँडविड्थ’ उपलब्ध होईल आणि त्यामुळे मोबाईल इंटरनेट अतिशय जलद असल्याचा अनुभव येईल. ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ या संकल्पनेमुळे आता जवळजवळ प्रत्येक ‘इलेक्ट्रॉनिक’ उपकरण इंटरनेटला जोडले जात आहे. स्मार्टफोनप्रमाणेच, इतरही अनेक वस्तू आणि उपकरणे हुषार झाली आहेत व ती इंटरनेट, ‘ब्ल्यूटूथ’, ‘निअर फ्रीक्वेन्सी’ (एनएफ) इ. मार्गांनी परस्परांशी संवाद साधू शकतात. वापरकर्त्याने आपल्या विशिष्ट गरजा एकदा ‘स्मार्ट’ उपकरणांना सांगितल्या की, ती उपकरणे एकमेकांशी ‘बोलून’ स्वतःच निर्णय घेऊ शकतात.
‘५ जी’ मुळे काय शक्य होईल?
भारतात लवकरच ‘५ जी’चं वारं वाढणार आहे. लवकरच हे तंत्रज्ञान भारतात उपलब्ध होणार आहे. इतर प्रगत देशांत ते आधीच वापरले जात आहे. ‘रिलायन्स जियो’, ‘एअरटेल’ इत्यादी उद्योग त्याचे मार्केटिंग सुरू करतील. यासाठी लागणार्या स्पेक्ट्रम लिलावही लवकर संपेल. या लिलावामध्ये ३.५ GHz बँड, २६ MHz mmWave बँड आणि ७०० MHz बँडची सर्वाधिक मागणी असलेल्या युनिट्सचे वाटप केले जाईल २०२६ पर्यंत, आपण भारतात ‘५ जी’च्या ग्राहकांची संख्या ३५ कोटीपर्यंत जाईल, अशी अपेक्षा आहे. मग नंतर ‘४ जी’ टप्प्याटप्प्याने बाहेर पडणे सुरू करणे भाग पडेल. ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’, ‘कृतीम बुद्धिमत्ता’, स्मार्ट इमारती, सेल्फ-ड्रायव्हिंग कार, स्वयंचलित कारखाने, AR/VR अनुभव, अल्ट्रा-एचडी लाइव्ह स्ट्रीमिंग, टेलिसर्जरी, इ. हे सर्व ‘५ जी’ नेटवर्कच्या ‘एन्हांस्ड मोबाईल ब्रॉडबँड’ (EMBB), अल्ट्रा-रिलायबलमुळे शक्य झाले आहे. लो लेटेंसी कम्युनिकेशन (URLLC) आणि मशीन मशीन-प्रकार कम्युनिकेशन (MMTC) ही व अनेक अॅप्स ग्राहकांना वापरता येतील. काही रिपोर्टसनुसार ‘५ जी’ तंत्रज्ञान हे ‘४ जी’पेक्षा १०० पट अधिक वेगवान असणार आहे. त्यामुळे भारतातील मोबाईल इंटरनेटचा स्पीड दहा गिगाबाइट प्रति सेकंद इतका होऊ शकतो. या स्पीडमुळे हाय-डेफिनेशन मूव्हीज, मोठे सॉफ्टवेअर्स अवघ्या काही सेकंदात डाऊनलोड करणं शक्य होणार आहे.
‘५ जी’ म्हणजे काय?
हे स्वागतार्ह आहे की, ‘५ जी’ तंत्रज्ञान आयात करण्याऐवजी, भारताने एक स्वदेशी ‘५ जी’ मानक विकसित केले आहे, जेणेकरून भारतातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि चिनी टेलिकॉम कंपन्यांवर अवलंबून राहणे टळेल. ‘टेलिकॉम स्टॅण्डर्ड डेव्हलपमेंट सोसायटी इंडिया’ आणि दूरसंचार विभागाच्या देखरेखीखाली ‘५ जी’ मानक विकसित केले गेले. ज्यामध्ये अनेक प्रमुख आयआयटी आणि आयआयएसीच्या योगदानासह आहे. भारतात विकसित केलेल्या ‘५ जी’ मानकाला ‘५ जी’ असे नाव देण्यात आले आहे. हे उल्लेखनीय आहे की, ‘५ जी’ मानक आधीच जागतिक ‘५ जी’ मानक ३GPP (3rd जनरेशन पार्टनरशिप प्रोजेक्ट) मध्ये समाविष्ट केले गेले आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ‘इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन्स युनियन’ (ITU) ने ‘५ जी’ मानक, भारताचे स्वदेशी ‘५ जी’ तंत्रज्ञान स्टॅक मंजूर केले होते. त्यानंतर डिसेंबर २०२१ मध्ये, ‘५ जी’ चे ३GPP मध्ये विलीनीकरण करण्यात आले, जेव्हा भारतात विकसित झालेले दूरसंचार तंत्रज्ञान जागतिक दूरसंचार संस्थांनी स्वीकारले होते. ३GPP मध्ये ‘५ जी’ मानकांचे विलिनीकरण, पुढे जाण्यासाठी एकच सामान्य तपशील सक्षम करते, तसेच ‘आयएमटी २०२०’ ‘५ जी’ मानक कुटुंबासाठी (ITU-R) एक सिंगल रेडिओ प्रवेश प्रस्ताव तयार करते, स्वदेशी संप्रेषण तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना देण्यासाठी, ‘आयआयटी हैदराबाद’, ‘आयआयटी मद्रास’ आणि ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन वायरलेस टेक्नोलॉजी’ यांनी ‘५ जी’ आणले आहे. अनभिज्ञांसाठी, ‘५ जी’ हे स्थानिक पातळीवर विकसित ‘५ जी’ नेटवर्क मानक आहे, ज्याला दूरसंचार विभागाने हिरवा कंदील आणि बजेट दिले आहे. ‘५ जी’ जागतिक ३GPP ‘५ जी’ मानकासाठी अधिक विश्वासार्ह आणि भारतकेंद्रित पर्याय म्हणून विकसित केले गेले आहे. ‘५ जी’चा सर्वात मोठा फायदा म्हणजे भारतात ‘५ जी’ नेटवर्कची मोठ्या प्रमाणावर तैनाती अधिक किफायतशीर बनवण्याची क्षमता. याव्यतिरिक्त ‘५ जी’ नेटवर्कच्या तुलनेत कमी ‘फ्रिक्वेन्सी’वर विस्तृत श्रेणी प्रदान करते, हेदेखील सिद्ध झाले आहे. हे त्याच्या ‘लो मोबिलिटी लार्ज सेल’ तंत्रज्ञानासाठी आहे. त्यामुळे, ‘५ जी’ नेटवर्क्स - योग्यरित्या अमलात आणल्यास - दुर्गम भागात, ग्रामीण भागात आणि कठीण भूप्रदेशांमध्ये वर्धित कव्हरेज प्रदान करतील. तथापि, भारतातील अनेक मोबाईल ऑपरेटर आणि सेवा प्रदात्यांनी त्यांच्या पायाभूत सुविधा आणि नेटवर्क उपकरणे जागतिक ‘५ जी’ मानकांमध्ये अपग्रेड करण्यासाठी आधीच मोठी गुंतवणूक केली आहे, ‘५ जी’ साठी पुन्हा ‘ऑप्टिमाइझ’ करणे हा आणखी एक महाग आणि तोटा सहन करणारा प्रकार असू शकतो. तथापि, भारतीय अधिकारी आता ऑपरेटर्सचे आर्थिक नुकसान न करता दोन्ही जगातील सर्वोत्कृष्ट आणण्यासाठी ‘५ जी’ स्थानिक मानकांचे जागतिक मानकांसह विलिनीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
आपण ‘४ जी’ फोन ‘५ जी’ मध्ये रूपांतरित करू शकतो का?
नाही, ‘४ जी’ फोनला ‘५ जी’ फोनमध्ये रूपांतरित करणे शक्य नाही, जोपर्यंत फोन मोडेम आणि प्रोसेसरसारखे घटक ‘५ जी’ सुसंगत युनिट्ससह बदलत नाहीत. त्याचप्रमाणे, त्यासाठी सॉफ्टवेअरमध्येही बदल करावे लागतील. फोन ‘अपग्रेडेशन’ हा बाजारात व्यवहार्य पर्याय नसल्यामुळे, ‘४ जी’ फोनला ‘५ जी’ फोनमध्ये रूपांतरित करण्याचा विचार करणे व्यवहार्य नाही. कृतीचा सर्वोत्तम मार्ग अर्थातच, थेट ‘५ जी’ फोन खरेदी करणे आहे.
‘५ जी’साठी नवीन सीमकार्ड विकत घ्यावे लागेल का?
होय, तुम्हाला तुमचे विद्यमान सीमकार्ड ‘५ जी’ सीमसाठी स्वॅप करावे लागेल. जे पुढील पिढीतील संप्रेषण तंत्रज्ञानासह उत्तम प्रकारे कार्य करेल. खात्री बाळगा की, नवीन ‘५ जी’ सुसंगत सीम नियमित स्मार्टफोन सीम्सप्रमाणेच आकाराचे असतील. अशा प्रकारे तुमच्या फोनमध्ये अखंडपणे स्लॉट केले जातील. भारतातील ‘५ जी’ची क्षमता खरोखरच अतुलनीय आहे. एकदा कार्यान्वित झाल्यानंतर, ते प्रति चौ. किमी फक्त २०००च्या तुलनेत एक दशलक्ष जोडणी केलेल्या उपकरणांना समर्थन देण्यास सक्षम असेल. ‘४ जी’ ‘एलटीई’अंतर्गत! ‘कनेक्टिव्हिटी’ आणि ‘५ जी’ इंटरनेटच्या अशा अभूतपूर्व पातळीसह, आपण भविष्यातील स्मार्ट शहरे विकसित करताना ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्यसेवा, शेती इत्यादींमध्ये परिवर्तन घडवून आणू शकू. खरंतर, २०३५ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेवर ‘५ जी’चा एकत्रित प्रभाव एक ट्रिलियनच्या आकड्याला स्पर्श करू शकतो. अखंड संवादाची क्षमता, ज्ञानाधारित अर्थव्यवस्था या -यंत्रणेला ‘हायपर कनेक्टेड नेटवर्क’ असेही संबोधले जाते. सर्व प्रकारचे ‘५ जी’ तंत्रज्ञान तयार होऊन ते प्रत्यक्ष ग्राहकाच्या हातात येईपर्यंत २०२३ वर्ष उजाडेल असे वाटते.
‘६ जी’ मोबाईल इंटरनेट नेटवर्क
आपल्या देशात ‘५ जी’ची चर्चा सुरू आहे. पण, इतर देश त्याही पुढे विचार करत आहेत. चीनमध्ये ‘६ जी’ चे प्रयोगही सुरू झाले आहेत. ‘६ जी’ ‘वायरलेस’ तंत्रज्ञानाची सहावी पिढी आहे. विस्तारित वास्तविकता आणि मिश्रित वास्तविकता मोबाईलच्या सहाव्या पिढीचा भाग असेल. १०० ‘जीएचजेड’च्या आसपास फ्रिक्वेन्सीवर ‘६ जी’ ऑपरेट करते - ते तीन मिमीची तरंगलांबी (फ्रिक्वेन्सी) आहे. हे संवेदनांचे इंटरनेट आहे, भौतिक आणि आभासी जगाचे संमिश्रण हे ‘६ जी’ चे वैशिष्ट्य आहे. पुढील दशकात स्मार्ट उपकरणे, ‘आयओटी’ (इंटरनेट ऑफ थिंग्स) या तंत्रामुळे सर्वत्र ‘इंटरनेट बॅण्डविड्थ’ लागेल. इथेच ‘६ जी’ कामाला येईल. यामुळे मोबाईल फोन वेगळे असतील. आत्ता आपण द्विमिती व्हिडिओ जमान्यात आहोत. ‘६ जी’मुळे जीवन-आकाराचे ‘३ डी’ होलोग्राम प्रदर्शन शक्य होते. ज्यांच्याशी आपण संपर्क साधत आहात त्या व्यक्ती ‘रिअल टाईम’मध्ये (जशा आहेत तशा प्रोफाइल चित्र नव्हे) आपल्या जवळ प्रगट होतात. अनेक पौराणिक टीव्ही मालिकांमध्ये जशा देवीदेवता मानवाच्यासमोर प्रगट झालेले दाखवत असत तसेच ‘६ जी’ होलोग्राम तंत्रामुळे हेच तंत्र सर्वसामान्यांना उपलब्ध होईल. यामुळे दळणवळण क्षेत्रात क्रांती होईल. २०२६च्या मध्यास हे प्रायोगिक तत्वावर सुरू होईल व २०३० पर्यंत सर्वत्र उपल्बध होईल. पारंपरिक द्विमिती मोबाईल फोनचा अस्त त्यामुळे नक्कीच होईल.
deepak@deepakshikarpur.com
(लेखक उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत.)
- डॉ. दीपक शिकारपूर