‘अग्निपथ’ची अग्निपरीक्षा

    17-Jun-2022   
Total Views |
 
 
 
Agnipath scheme
 
 
 
 
मोदी सरकारने नुकतीच संरक्षण दलांसाठी ‘अग्निपथ’ भरती योजनेची घोषणा केली असून, या योजनेच्या माध्यमातून भरती झालेल्या सैनिकांना ‘अग्निवीर’ संबोधले जाणार आहे. मात्र, या योजनेच्या अंमलबजावणीआधीच देशातील अनेक भागांत नाहक विरोध सुरू झाला. काँग्रेसनेही या योजनेचा पुनर्विचार करण्याची मागणी केली. त्यामुळे या योजनेच्या नावाखाली देशातील तरूणांना भडकविण्याचे उद्योग विरोधी पक्षांकडून रीतसर सुरू झाले आहे. ही भरती चार वर्षांसाठी होणार असून, यात सहा महिन्यांचा प्रशिक्षण कालावधीचाही समावेश आहे. या अग्निवीरांना महिना ३० ते ४० हजार रुपये वेतन देण्यात येणार असून चार वर्षांची सेवा संपली की, ११.७१ लाखांचा सेवा निधी देण्यात येईल, ज्यावर आयकर लागणार नाही. चार वर्षांनंतर ७५ टक्के अग्निवीरांची सेवा समाप्त होईल, तर उर्वरित २५ टक्के अग्निवीरांना सैन्यात कायम केले जाईल. विशेष म्हणजे, जात, धर्म, प्रदेशानुसार रेजिमेंटमध्ये भरती होणार नाही. ‘अग्निपथ योजने’साठी वयोमर्यादा १७.५ ते २१ असून यावर्षी ४६ हजार युवकांना संधी मिळणार आहे. अग्निवीर शहीद झाल्यास कुटुंबीयांना एक कोटींची तर नैसर्गिक मृत्यू किंवा अंपगत्व आल्यास ४८ लाखांची मदत दिली जाणार आहे. या योजनेने देशाची सुरक्षा सशक्त होणार असून, अनेकांचे देशसेवेसाठी सैन्यात जाण्याचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. या सेवेमुळे गुणवत्ता आणि शिस्तप्रिय अग्निवीरांकडे नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. समजा एखादा मुलगा या योजनेअंतर्गत वयाच्या २१ व्या वर्षी भरती झाला,तर त्याची सेवा २५ व्या वर्षी समाप्त होईल. त्यामुळे त्याला वयाच्या २५ व्या वर्षी एकरकमी १२ लाख मिळतील. २५ वय असताना कोणत्याही मुलाकडे इतकी रक्कम राहात नाही. त्यानंतर त्याने पुढे त्या मुलाला अन्य क्षेत्राच्या वाटाही मोकळ्या आहेत. या वयामध्ये घरी बसण्यापेक्षा किंवा राजकीय नेत्यांच्या मागेमागे फिरण्यापेक्षा या योजनेचा लाभ घेणे कधीही फायदेशीरच. आपल्या आंदोलनात झेंडे घेऊन फिरणार्‍यांची संख्या या योजनेने कमी होईल याची धास्ती काँग्रेससहित विरोधी पक्षांना आहे. म्हणून तरूणांची माथी भडकविण्याचे षड्यंंत्र रचले जात आहेत. त्यामुळे ‘अग्निपथ योजने’चा तरूणांची लाभ घेऊन माथी भडकवणार्‍यांचा डाव हाणून पाडणे आवश्यक आहे.
 
हे तर ‘भारत तोडो’ अभियान!
 
खरंतर मागील आठ वर्षांपासून मोदी सरकारच्या प्रत्येक योजनेला विरोध करण्यापलीकडे काँग्रेस पक्षाने कुठलेही ठोस कार्यक्रम राबविले नाहीच. उलट जे जे राष्ट्रहिताचे, राष्ट्रगौरवाचे त्यात खोट काढण्याची काँग्रेसची जुनीच खोड. आताही ‘अग्निपथ’ योजनेला विरोध करून तरुणाईची माथी भडकाविण्याचेच उद्योग काँग्रेस आणि विरोधकांकडून सुरू आहेत. कोणाच्या मते, या अग्निवीरांचे आयुष्य चार वर्षांच्या सेवेनंतर अधांतरी असेल, तर कोणी तरी या अग्निवीरांना पेन्शन मिळणार नाही, म्हणूनही विरोध केला. हे सगळे कमी की काय, म्हणून या खडतर प्रशिक्षणानंतर बंदुकी चालवायला शिकलेले हे तरुण नक्षलवादी, दहशतवादी गटांशी जोडले गेले, तर देशाचेच कसे नुकसान होईल वगैरे अजब युक्तिवादही यानिमित्ताने काही तथाकथित तज्ज्ञांकडून वर्तविले गेले. पण, मुळात जी व्यक्ती देशभक्तीने ओतप्रोत भरलेली असेल, जिची देशासाठी प्राणही द्यायची तयारी असेल, तो तरुण ‘अग्निपथ’नंतर देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी होईल, असा विचार करणार्‍यांची मुळात कीव येते. कारण, ज्यांच्या मनात, डोक्यात केवळ मोदीद्वेष आणि प्रस्थापितविरोधी मानसिकता नसानसात भिनली आहे, त्यांच्याच सडक्या डोक्यांतून असे विषारी विचार जन्म घेऊ शकतात. राष्ट्रहितैषी विचारांना, योजनांना विरोध करणे ही काँग्रेसची म्हणा जुनीच परंपरा. अगदी वाजपेयींच्या काळात झालेल्या पोखरणच्या अणुचाचणीपासून ते मोदी सरकारने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’पर्यंत, काँग्रेसने राष्ट्रसुरक्षेसंबंधी मुद्द्यांवर परकीयांचीच तळी उचलली. गांधी घराण्याचे ‘चिनी कनेक्शन’ही त्याचाच एक भाग. म्हणजे एकीकडे पडद्याआड चीनशी हातमिळवणी करायची आणि दुसरीकडे चीन भारतभूमी गिळंकृत करतोय म्हणून मोदी सरकारवर तोंडसुख घ्यायचे, असा हा दुटप्पीपणा. एवढेच नाही, तर विषय ‘राफेल’चा असो, काश्मीरमधून ‘कलम 370’ हद्दपार करण्याचा, ‘सीएए’, ‘एनआरसी’चा अशा कोणत्याही देशोन्नतीच्या योजनांचे, करारांचे काँग्रेसने हात दाखवून अवलक्षणच केले. त्यामुळे काँग्रेसने ’भारत जोडो’च्या गोंडस नावाखाली चालवलेला मुळात ‘भारत तोडो’चा हा खेळ देशविरोधी शक्तींनाच खतपाणी घालणारा आहे. परंतु, आता कितीही विरोध प्रदर्शने केली तरी देशातील ‘अग्निवीर’ काँग्रेसच्या या षड्यंत्राला अग्नीत भस्मसात केल्याशिवाय राहणार नाहीत.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.