मलिक आणि देशमुखांची मते गेली: राऊतांचा संताप

    17-Jun-2022
Total Views |
t
 
  
 
मुंबई : कोर्टाने अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक व माजी गृहमंत्री अनिल देशमुख या दोघांच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानास परवानगी मिळावी ही याचिका फेटाळल्याने शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली . नवाब मलिक व अनिल देशमुख या दोघांना कोणती शिक्षा ठोठावली आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी माध्यमांसमोर उपस्थित केला. त्या दोघांना बेकायदेशीर डांबून ठेवले असून त्यांना मतदान करू दिल्यास त्याचा महाविकास आघाडीला फायदा होईल असेही राऊत म्हणाले. मलिक आणि देशमुख हे विधानसभेचे आमदार आहेत. त्यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क नाकारल्याने देशातील संसदीय लोकशाहीला टाळं लावलं पाहिजे, हे माझं मत नसून ज्याला लोकशाही विषयी कळवळा आहे, त्या प्रत्येकाचं हे मत आहे, असेही राऊत म्हणाले.
 
 
राज्यसभेच्या निवडणुकीत ईडीने मलिक व देशमुखांच्या मतदानावर आक्षेप घेतला होता. त्याचा परिणाम निकालावर झाला आणि महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. विधानपरिषदेच्या निवडणूकित आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप व महाविकास आघाडीमध्ये जोरदार सामना रंगला आहे. राज्यसभेप्रमाणे विधानपरिषदेत आपला पराभव होऊ नये म्हणून महाविकास आघाडीसाठी देशमुख व मालिकांची मतं महत्वाची ठरणार होती. ती कमी झाल्याने आघाडीची चिंता वाढली आहे.
 
आपल्याकडे अतिरिक्त मतं नाहीत पण याचा अर्थ आमचा उमेदवार पडेल, असे नाही. कारण निवडणुकीत आम्ही कौशल्याचा वापर करू, फक्त फार चर्चा करणार नाही, असे राऊतांनी सांगितलं. निवडणुकीत भाजप चमत्कार करेल का? असा प्रश्न विचारला असता राज्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा चमत्कार होणार नसल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. हक्काची दोन मतं कमी झाल्याने महाविकास आघाडी आता काय पाऊल उचलणार हे महत्वाचं ठरणार आहे.