गिधाड संवर्धक डॉ. राम जकाती यांचे निधन

पुण्यात घेतला अखेरचा श्वास

    16-Jun-2022
Total Views |
ram
 
मुंबई(प्रतिनिधी): निवृत्त आयएफएस अधिकारी डॉ राम जकाती यांचे काल दि. १५ रोजी संध्याकाळी पुण्यात निधन झाले. हृदयविकारच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाले. हरयाणातील पिंजोरच्या जटायू गिधाड संवर्धन प्रजनन केंद्राच्या स्थापनेत डॉ. जकाती यांनी मोलाची भूमिका बजावली होती.
 
डॉ राम जकाती हे हरयाणा कॅडरचे भारतीय वन सेवेतील अधिकारी होते.हरियाणा वन विभागाचे मुख्य वन्यजीव वॉर्डन म्हणून त्यांनी अनेक संवर्धनाचे प्रकल्प सुरू केले होते. डॉ जकाती यांनी ९०च्या दशकात गुरांना दिल्या जाणाऱ्या डायक्लोफेनाक या पशुवैद्यकीय औषधाच्या वापरामुळे गिधाडांना होणाऱ्या त्रासाचे निदान केले होते. डायक्लोफेनाक गुरांसाठी निरुपद्रवी आहे परंतु त्यांच्या शवांना खाणाऱ्या गिधाडांवर त्याचा विनाशकारी परिणाम होतो. गिधाडे नामशेष होऊ नयेत यासाठी आवश्यक असलेल्या तातडीच्या उपाययोजना करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
 
ब्रिटनच्या रॉयल सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ बर्ड्स (RSPB) ने त्यांच्या लुप्तप्राय गिधाडांना वाचवण्याच्या व्यापक कार्यासाठी डॉ राम जकाती यांना २०२०मध्ये सन्मानित केले होते. निसर्ग संवर्धनातील उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना प्रतिष्ठित पदक प्रदान करण्यात आले आहे. रॉयल सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ बर्ड्स ही ब्रिटनमधील सर्वात मोठ्या निसर्ग संवर्धन धर्मादाय संस्था आहे.