मुंबई ता. १४
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांना समर्पित 'क्रांती गाथा' या भूमिगत दालनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राजभवन येथे झाले. या कार्यक्रमा दरम्यान मोदी यांनी भाषण केले. आपल्या भाषणामध्ये त्यांनी महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्रामधील क्रांतिकारकांचे कौतुक केले, देशाच्या विकासामध्ये महाराष्ट्राचे मोठं योगदान असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली.
मराठीत आपल्या भाषणाची सुरुवात करत पंतप्रधान म्हणाले, 'एका अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी आपण एकत्र आलो आहोत. ही वास्तु समर्पित करताना मला अतिशय आनंद होत आहे. हे महाराष्ट्र भवन अनेक लोकतांत्रिक घटनांसाठी साक्षीदार असून इथे अनेक संविधानिक पदाच्या शपथा घेतल्या आहेत. आता इथे जलभूषण भवन आणि क्रांतीगाथा गॅलरीचे उद्धाटन करण्यासाठी आलो असलो तरी याआधी पण राजभवनामध्ये आपण आलो आहोत, हे देखील पंतप्रधानांनी सांगितले.
राजभवन येथील ब्रिटिशकालीन बंकरमध्ये 'क्रांती गाथा' या भूमिगत दालनाचे तसेच 'जलभूषण' या नवीन इमारतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन झाले. या कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंह कोशारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य इतर मान्यवर उपस्थित होते.
देशाच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये महाराष्ट्रातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आहे. तसंच तुकाराम महाराजांपासून ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरापर्यंत अनेक महापुरुष महाराष्ट्रात निर्माण झाले. महापुरुषांची समृद्ध परंपरा महाराष्ट्राला आहे. त्यांनी देशाला उर्जा दिली. तसेच, स्वराज्याबाबत बोलायचं म्हटंल तर, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची आठवण राष्ट्रभक्तीच्या भावना प्रबळ करतात. आजच्या कार्यक्रमादरम्यान सावरकरांच्या आठवणींना उजाळा मिळाला असल्याचे देखील ते म्हणाले. भारताच्या स्वातंत्र्यामध्ये अनेकांचे योगदान आहे. यावेळी त्यांनी लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके यांच्या त्यागाची आठवण केली. या सर्वांचं लक्ष एकच होते देशाचे स्वातंत्र्य, असेही मोदी म्हणाले. दरम्यान, देशासाठी मुंबई हे स्वप्नांचे शहर आहे. आता मुंबईसह देशभरात विकास यात्रासुरु आहे. मग मुंबई असो वा महाराष्ट्रातील लहान शहर असोत. विकासाच्या यात्रेत मागे राहिलेले आदिवासी पाडेही आज विकास करत आहेत. सहकाराच्या भावनेने आपणाला पुढे जायच आहे. जगातल्या अनेक देशांना भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाने प्रेरणा दिल्याचे ते म्हणाले.
आपल्या समृद्ध वारश्याबाबत आपण अत्यंत उदासीन
जगभरातील लोक आपली मजाक उडवतील की, ७५ वर्षे या राजभवनात कामकाज चालते. मात्र त्याखाली बँकर आहे ही ७० वर्षात कोणालाही कळले नाही. आपण आपल्या समृद्ध वारस्याबाबत किती उदासीन आहोत. आपल्याच शोधून शोधून इतिहासचाही पाने शोधून काढायची आहेत. शांतिकृष्ण वर्मा यांना लोकमान्य टिळकांनी एक चिठ्ठी लिहिली होती आणि त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राहणं आणि शिक्षणाची सोय बघावी असे लिहिले होते. त्यांनी लंडनमध्ये इंडिया हाऊस जे क्रांतिकारकांची तीर्थंभूमी बनले होते. इंग्रजांच्या नाकावर टिच्चून भारतीय क्रांतिकारकांच्या हालचाली तिथे सुरु असायच्या. १९३० मध्ये शांतिकृष्णन वर्मा यांचे देहावसान झाले. त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की, माझ्या अस्थी सांभाळून ठेवा. जेव्हा भारत स्वतंत्र होईल तेव्हा माझ्या अस्थी भारतात घेऊन जाव्या. १९३०ची घटना आहे १०० वर्ष होत आले आहे. तुम्ही ऐकून हैराण व्हाल. आपल्या देशाचे हे दुर्भाग्य आहे. १९३०मध्ये देशासाठी प्राण सोडणाऱ्या व्यक्तीची एकमात्र इच्छा होती. ती माझ्या अस्थी स्वातंत्र्य भारतात जाव्यात आणि देशाच्या स्वातंत्र्याची अनुभूती मी नाहीतर माझ्या अस्थींनी घ्यावी. १५ ऑगस्ट १९४७च्या दुसऱ्या दिवशी हे काम झालं पाहिजे होतं. पण ते नाही झालं. २००३मध्ये ७३ वर्षांनी त्या अस्थी भारतात आणायचे भाग्य मला लाभलं. भारत मातेच्या पुत्राच्या अस्थी आज गुजरातच्या कच्छमध्ये त्यांच्या जन्मस्थानी ठेवण्यात आल्या आहेत. ती वस्तू हुबेहूब लंडनमधील इंडिया हाऊस सारखीच उभारण्यात आली आहे. हजारो विद्यार्थी तिथे जातात आणि प्रेरणा घेतात, असेही पंतप्रधान म्हणाले.
इतिहास जतन नाही जिवंत करणं आपलं काम : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "ज्या कार्यक्रमासाठी आज आपण जमलो त्या आधी तीन महिन्यापूर्वी दरबार हॉलचे लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. आज मा.पंतप्रधान आले आहेत. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतांना क्रांती गाथा दालनाचे उद्घाटन हा एक योगायोगच नाही तर एक चांगला मुहूर्त आहे. जे स्वातंत्र्य उपभोगतो आहोत त्यासाठी किती जणांनी आपल्या घरादारावर निखारे ठेवले, किती जणांनी बलिदान दिलं, कितीजणांनी मरण यातना सोसल्या, क्षणभर विचार केला हे असं घडलं नसतं तर आपण हे स्वातंत्र्य उपभोगू शकलो असतो का? हा प्रश्न मनात येतो. आपल्याला स्वातंत्र्य असंच नाही मिळाले, ते कुणी आपल्याला आंदण नाही दिलं हे स्वातंत्र्य आपल्याला लढून मिळवावं लागलं आहे. तो इतिहास नुसता जतन नाही तर जिवंत करणं हे आपलं काम आहे. काळ पुढे जात आहे. आपण पारतंत्र्यात १५०वर्षे होतो आता स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली, पुढे जात असताना हा वारसा पुढच्या पिढीला देण्याच काम केलं नाही तर मला वाटतं आपण आपल्या कर्तव्याला मुकतो आहोत. आज एक अप्रतिम काम आपण करत आहोत. सन २०१६ साली राजभवनातील हे भुयार सापडले. मात्र खंदक आणि भुयाराचा आज अप्रतिम उपयोग होतो आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
राजभवन हे राजभवन ना राहता लोकभवन व्हावे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले, महाराष्ट्र मला हिमालया सारखा वाटतो. मात्र त्याचवेळी पंतप्रधानांसमोर राज्यपालांनी राज्य सरकारचे कानही टोचले. महाराष्ट्रातील काही शहरात पाण्याची समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्याची विनंती राज्यपाल यांनी पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांना केली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी मदत केली, यासाठी मी त्यांचे आभार मानतो. राजभवन हे फक्त राजभवन राहू नये हे 'लोकभवन' व्हावे असा माझा प्रयत्न आहे. राजभवन लोकोपयोग कसे होईल हे मी पाहिले. मी राज्यभर फिरलो. मला आता मराठी भाषा समजते.मला लोक महाराष्ट्र कसा वाटतो विचारतात, तेव्हा मी मला महाराष्ट्र हिमालयासारखा वाटतो, अस मी सांगतो. हिमालयात समुद्र नाही , पण महाराष्ट्रात हिमालय नाही, तरिही मला महाराष्ट्र हिमालयासारखा वाटतो. मी ज्यावेळी राज्यात फिरत असतो, असेच एकदा मी औरंगाबादमध्ये गेलो होतो त्यावेळी मला लोकांनी पाण्याची समस्या सांगितली. पंतप्रधानांना मी विनंती करतो पाण्याची समस्या सोडवा, अशी विनंतीही त्यांनी केली. पुढे ते म्हणाले, मी एका शेतकरी घरातील आहे, शेतकऱ्यांच्या काय समस्या असतात मला माहित आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडण्याची विनंतीही राज्यपाल यांनी राज्य सरकारला केली.