ईशनिंदासदृश्य कायदा देशात लागू करावा, यासाठी मुंबईत वंचित बहुजन आघाडीतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘थॉटस ऑन पाकिस्तान’ लिहून मुस्लिमांचे अंतरंग स्पष्ट मांडले, ज्या थोर बाबासाहेबांनी संविधानातून या देशाला सर्वधर्मसमभावाचा मंत्र दिला, त्या बाबासाहेबांच्या वंशजाने कट्टर मुस्लीम राष्ट्राचा अभिनिवेश भारतात जागवण्याचा प्रयत्न करणे ही दुःखद गोष्ट आहे. यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी संगमनेर आणि अहमदनगर इथे काय झाले? जयंती उत्सवात हिरवे झेंडे घेऊन घुसलेले आणि रॅलीतील आयाबायांना त्रास देणारे जे कोणी होते, त्यांच्याबद्दल प्रकाश आंबेडकरांचे काय म्हणणे आहे?
‘वंचित बहुजन आघाडी’ हा पक्ष किमान नावाने तरी वंचित आणि बहुजनांचा कैवार घेण्याचे समर्थन करतो. पण, या पक्षाने गोरगरीब जनतेच्या भल्यासाठी काही योजना ठोस स्वरूपात राबवल्या का? कोरेगाव- भीमाची हिंसा उसळली. या हिंसेसंदर्भात प्रकाश आंबेडकर यांचेे नातेवाईक तेलतुंबडे सध्या तुरूंगात आहेत. कोरेगाव-भीमा हिंसेमध्ये समाजातील ज्या युवकांवर गुन्हे दाखल झाले होते, त्यांचे काय झाले? ईशनिंदेसारखा कायदा सुरू व्हावा म्हणून वंचित बहुजन आघाडी रॅली काढणार. का? याला उत्तर असेच असेल की, कोणाच्याही धार्मिक श्रद्धा दुखवू नयेत म्हणून! पण, खुद्द प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पक्षाने कधीच कुणाच्या श्रद्धांवर आघात केले नाहीत का? कधीच कुणाला जातीयवाचकसदृश्य शब्द वापरले नसतील? मनू, पेशवा या बाद झालेल्या शब्दांनी कधीच कुणाला हिणवले नाही? या रॅलीला नाव दिले ‘अमन रॅली.’ दि. १७ जून, शुक्रवार म्हणजे जुम्माची नमाज झाल्यानंतर मदनपुरा ते आझाद मैदान, अशी ही रॅली निघणार. मुंबईतल्या नव्हे, तर देशभरातल्या मुस्लीम बांधवांना चिथवण्यासाठी ही रॅली असावी का, असाच संशय येतो. पाकिस्तान, सौदी अरब, अफगाणिस्तान, इराण, इंडोनेशियासारख्या कट्टर आणि तितक्याच दहशतवादाने बरबाद देशांमध्ये ईशनिंदेचाकायदा आहे. भारतात ईशनिंदा कायदा लागू करा, असे म्हणणे म्हणजे संविधानाचा आणि प्रत्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मुस्लीम अनुनय करताना समाजबांधवांची उपेक्षा करणार्या प्रकाश आंबेडकरांना समाज माफ करणार नाही!
पोहोचलो एकदा अयोध्येला!
पोहोचलो एकदाचे अयोध्येला. इथे येणे गरजेचे होते. कारण, ते कमळवाले अयोध्या राममंदिर वगैरे सारखे बोलायचे. त्यांच्या निवडणुकीच्या अजेंड्यामध्येही ‘मंदिर वही बनायेंगे’सारखे वचन असायचे. भाजपवाले जिंकले, एकदा नाही दोनदा. त्यामुळे मीही ठरवले की, आपणही रामललाचे दर्शन घ्यायचे. एकदा अयोध्येला आले की, झाले मग देशभरात चर्चा सुरू होईल. महाराष्ट्रातून थोर नेते, बुद्धिमत्तेचे सर्वेसर्वा असलेले महाविकास आघाडीच्या एकीचे शिल्पकार अयोध्येला आले. कोण? म्हणजे काय? मीच तो. रोखठोक संपादक! इतके गुणविशेष माझ्यातच आहेत. हे तुम्हाला कळत नसेल तरीसुद्धा हा माझा अपमान आहे. महाराष्ट्राचा अपमान आहे.
मी उत्तर प्रदेशात गेल्या गेल्या कार्यकर्त्यांनी माझ्या गळ्यात हे मोठमोठे हार घातले. काय म्हणता, महाराष्ट्राच्या राज्यसभेत जबदरस्त राजकीय हारलो म्हणून ते हार घातले? काहीही म्हणू नका. काय म्हणता, मीच आमच्या साहेबांच्या चिरजीवांच्या स्वागतासाठी तयारी करायला गेलेला कार्यकर्ता आहे. नाही नाही, मी त्यांच्या दौर्याआधी एक दिवस अयोध्येत आलो खरा. पण, लगेच मला ‘कार्यकर्ता’ म्हणू नका. मी इतका मोठा आहे की, मोदी तिकडे महाराष्ट्रात गेले आणि मी त्यांच्या मतदारसंघाच्या राज्यात आलो. मोदींनी निदान माझ्याविरोधात तरी बोलावे? त्यामुळे तरी राष्ट्रीय स्तरावर माझे नाव जाईल. पण, मोदी माझ्याबाबत चुकूनही काही बोलत नाहीत. आता मी आदित्यनाथ यांच्या राज्यात आलो आहे. पण तेही ढुंकूनही पाहत नाहीत.
कुणीच लक्ष देत नाही म्हणून मी आमच्या खर्या साहेबांचे म्हणजे पवार साहेबांचे नावही घेतले. म्हणालो की, पवार साहेबच राष्ट्रपती पदाचे उमेदवार होऊ शकतात, बाकी इतर सगळे रबर स्टॅम्प असणार आहेत. काय म्हणता, महाराष्ट्रात पण पवार साहेबच सर्वेसर्वा आहेत. बाकी राज्यातले सत्ताधारी पवार साहेबांच्या हातातले रबर स्टॅम्प आहेत, असे काहीबाही बोलू नका. मला बारामती आणि वांद्रेदोघेही समान आहेत. दोघांनीही माझे भले करावे बस!!! राज्यसभा तर मिळतेच मिळते. तसेही आमचे बारामतीचे साहेब राष्ट्रपती झाले की, पुढे वांद्य्राचे साहेब पंतप्रधान होणार. मग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? बोला बोला, काय म्हणता तो पुन्हा येणारच!!