रक्तदान नव्हे जीवदान!

जनकल्याण रक्तपेढी, पुणे

    15-Jun-2022
Total Views |


donation
 
 
समाजातील रक्त व रक्तघटकांची गरज योग्य पद्धतीने पूर्ण करण्यासाठी १९८३ साली जनकल्याण रक्तपेढीची सुरुवात झाली. प्रारंभीच्या काळात शनिवार पेठेत वैद्य खडीवाले संस्थेच्या इमारतीमध्ये सुरू झालेली रक्तपेढी आज स्वारगेटजवळ स्वतःच्या पाच मजली वास्तूमध्ये कार्यरत आहे. विविध सामाजिक क्षेत्रांतील कर्तृत्ववान व समर्पित असे विश्वस्त व कार्यकर्ता वृत्तीने काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या बळावर जनकल्याण रक्तपेढी सुरुवातीपासून केवळ सामाजिक दृष्टिकोन ठेवून कार्य करते आहे.
 
 
स्वेच्छा रक्तदान चळवळीत अग्रेसर रक्तपेढी सुरुवातीपासूनच ‘स्वेच्छा रक्तदान’ हेच कार्याचे सूत्र मानून बदली रक्तदान, पैशांच्या मोबदल्यात रक्तदान किंवा तत्सम कुठल्याही तडजोडी न करता जनकल्याण रक्तपेढी काम करत आलेली आहे. रक्तपेढी मान्यताप्राप्त विभागीय रक्तसंक्रमण केंद्र एनएबीएच (NBH) हे गुणवत्तेचे राष्ट्रीय मानांकन प्राप्त NCO (National IDS Control Organisation ) आहे. रक्तसंकलन केवळ स्वेच्छा रक्तदात्यांकडूनच होत असल्यामुळे स्वाभाविकच रक्त सुरक्षित असण्याची खात्री अधिक असते. रक्तदान शिबिरांमध्ये रक्तदात्यांची व संकलित रक्तपिशव्यांची हरप्रकारे काळजी घेतली जावी, याकरिता रक्तपेढी कायम प्रयत्नशील राहिली आहे.
 
 
अद्ययावत डोनर कोच, छोट्या शिबिरांसाठी फिरती रक्तवाहिनी, रक्तपिशव्यांची शीतसाखळी सांभाळण्यासाठी फ्रिजेसनी युक्त असे वाहन ही जनकल्याण रक्तपेढीची खास अशी वैशिष्ट्येे राहिली आहेत. सध्या दरवर्षी सामाजिक संस्था, संघटना, महाविद्यालये, आयटी कंपन्या अशा विविध स्तरांतून होणार्‍या सुमारे ३०० ते ३५० शिबिरांमधून व प्रत्यक्ष रक्तपतेढ्यांतून २२ हजार ते २५ हजार रक्तपिशव्यांचे संकलन होत आहे.
 
 
गुणवत्तापूर्ण, सुरक्षित रक्त व रक्तघटक रूग्णाला उपलब्ध होण्यासाठी सातत्याने तांत्रिक सुधारणा हे ‘जनकल्याण’चे वैशिष्ट्य राहिलेले आहे. समाजातीलच अनेक दान व्यक्ती व संस्थांच्या मदतीने जनकल्याण रक्तपेढीमध्ये अनेक अद्ययावत उपकरणे आणली गेली व आजमितीस ‘पुण्यातील अत्याधुनिक रक्तपेढी’ असा जनकल्याण रक्तपेढीचा लौकिक आहे. अनेक अद्ययावत उपकरणे पुण्यात केवळ जनकल्याणमध्येच आहेत, ज्यांचा लाभ हा प्रत्यक्ष गरजूंना नियमितपणे होत असतो. रक्तगट तपासणीसाठीही आता स्वयंचलित रक्तगट तपासणीची यंत्रणादेखील रक्तपेढीमध्ये उपलब्ध आहे.
 
 
‘टीटीआय’ प्रयोगशाळा
 
 
रक्तसंकलनानंतर अत्यावश्यक असणार्‍या ’रक्तसंक्रमणाद्वारे संभाव्य रोगांच्या पडताळणीसाठी’ (Transfusion Transmitted Infections) रक्ताच्या सर्व तपासण्या या स्वयंचलित व अद्ययावत उपकरणाद्वारेच (utomated Elisa Processor) केल्या जातात. स्वाभाविकच वेळेची बचत आणि अचूकता अशा दोन्हीही गोष्टी यामुळे साधल्या जातात.
 
 
रक्तघटक प्रयोगशाळा
 
 
संकलित केलेल्या सर्व रक्ताचे स्वयंचलित व अद्ययावत उपकरणाच्या (utomated Componment Extractor) सहाय्याने रक्तघटकांमध्ये विघटन केले जाते. (यामुळे संकलित झालेल्या एका रक्तपिशवीचा उपयोग तीन ते चार रूग्णांना होवू शकतो.) हे विघटन अत्याधुनिक अशा ’बफी कोट’ पध्दतीने केले जाते. यामध्ये रिअ‍ॅक्शन येण्याचा सर्वाधिक धोका ज्या पांढर्‍या पेशींमुळे असतो, त्या रक्तामधून वेगळ्या केल्या जातात. त्यामुळे अर्थातच रिअ‍ॅक्शन्स् येण्याचा धोका बर्‍याच अंशी कमी होतो. अन्य महत्त्वपूर्ण उपकरणे रक्तातील प्लाज्मा हा घटक केवळ १५ मिनिटांत -३५ अंशापर्यंत खाली घेऊन जाणारा ’स्नॅप फ्रीजर’ तसेच बालरूग्णांसाठी निर्जंतूक स्थितीमध्ये पाहिजे तेवढेच रक्त वेगळे करू शकणारा ’स्टराइल कनेक्टींग डिव्हाइस’ ही उपकरणेदेखील जनकल्याण रक्तपेढीमध्ये आहेत.
 
 
अफेरेसिस
 
 
२०१३ पासून काही विशिष्ट रोगांसाठी अत्यावश्यक असणार्‍या ’सिंगल डोनर प्लेट्लेट्स’ (SDP) अर्थात रक्तामधील केवळ ’प्लेट्लेट्स’ काढून घेऊन उर्वरित रक्त पुन्हा रक्तदात्याच्या शरीरात सोडणे ही सुविधा अंतर्भूत असणारी ’अफेरेसिस’ (Pheresis) ही यंत्रणा देखील रक्तपेढीमध्ये सुरू झाली आहे. अन्यत्र खर्चिक असणारी ही सुविधा जनकल्याण रक्तपेढीने मात्र सवलतीच्या दरात सर्व सामान्यांना उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. याचा उपयोग विशेषतः डेंग्यू व कर्करोगावर उपचार घेणार्‍या रूग्णांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. ‘एसडीपी’साठी रक्तदाते मिळविण्याची जबाबदारीदेखील ’जनकल्याणनेच’ स्वीकारली आहे.
 
 
रक्त साठवणूक
 
रक्त व रक्तघटक यांची साठवणूक अत्यंत काळजीपूर्वक विशेष उपकरणांच्या साहाय्याने योग्य त्या तापमानाला केली जाते. जसे लाल रक्तपेशी (२ ते ६०), प्लेटलेट्स (२० ते २४०), प्लाझ्मा आणि क्रायो (-४०) एकावेळी सुमारे सहा हजार रक्तघटक साठविण्याच्या क्षमतेमुळे सर्व काळ बहुतेक सर्व रक्तगटांची व रक्तघटकांची उपलब्धता असते.
 
 
रक्त विकिरण प्रयोगशाळा
 
 
रक्तातील उपद्रवी पांढर्‍या पेशींना निष्क्रिय करण्यासाठी ’रक्त विकिरक’ (Blood Irradiator) ह उपकरण वापरले जाते. अत्यंत कमी प्रतिकारशक्ती असलेल्या रुग्णांसाठी असे विकिरत रक्तघटक केलेले खूप उपकारक ठरतात, अशी रक्तविकिरण प्रयोगशाळा जनकल्याणमध्ये 2016 साली सुरू झाली असून सर्व रुग्णांना अत्यल्प दरांत ही सेवा सध्या उपलब्ध आहे.
 
 
‘थेलेसेमिया’ व ‘हिमोफेलिया’
 
 
‘थेलेसेमिया’, ‘हिमोफेलिया’ हे रोग म्हणजे निसर्गाचा शापच. कारण, ’थेलेसेमिया’ म्हणजे शरीरात योग्य रक्तपेशी तयार न झाल्याने ‘हिमोग्लोबिन’चे प्रमाण कमी होणे, तर रक्त लवकर न गोठल्याने रक्ताची हानी होत जाणे म्हणजे ‘हिमोफेलिया.’ या दोन्ही प्रकारच्या रूग्णांना आजाराच्या गंभीरतेप्रमाणे महिन्यातून सुमारे एक ते दोन वेळा रक्त भरून घेण्याशिवाय काही पर्यायच नसतो. दर महिन्याला इतका खर्च केवळ रक्तपिशव्यांवर करणे कसे परवडणार? अशा प्रकारच्या सर्व रुग्णांना जनकल्याण रक्तपेढी जितक्या वेळा लागेल तितक्या वेळा १०० टक्के सवलतीत रक्तपिशव्या देते. दरवर्षी अशा रुग्णांना रक्तपेढीतून नियमितपणे १५०० ते १८०० रक्तपिशव्या मोफत दिल्या जातात.
 
 
रक्ताचा कर्करोग व डायलिसिस
 
 
रक्ताचा कर्करोग व काही कारणांमुळे किडनीज् निकामी झाल्याने सतत करावे लागणारे डायलिसिस या आजारांमध्ये वारंवार मोठ्या प्रमाणात रक्त व रक्तघटकांची आवश्यकता भासते. या रुग्णाच्या पाठीशी जनकल्याण रक्तपेढी सातत्याने भक्कमपणे उभी आहे. अशा रुग्णांनाही रक्तपेढीकडून ५० ते १०० टक्क्यांची सवलत दिली जाते.
 
 
दारिद्रय रेषेखालील व अल्प उत्पन्न गटातील रुग्णांसाठी
 
 
रक्ताची आवश्यकता ही कोणाला व कधी भासेल, हे सांगता येत नाही. त्यात रुग्णांची आर्थिक परिस्थिती जर बेताचीच असेल, तर त्याला व त्याच्या नातलगांना फारच मनस्ताप होतो. अशा परिस्थितीत अन्य अल्प उत्पन्न गटातील रुग्णांसही जनकल्याण रक्तपेढी ५० टक्क्यांपासून ते १०० टक्क्यांपर्यंत सवलती देते.दरवर्षी अशा अनेक गरजू रुग्णांस ४० लाख ते ५० लाखांपर्यंतच्या सवलती दिल्या जातात.या सर्व सवलतींबरोबरच रक्तपेढीत येणारा कुणीही गरजू केवळ पैशांअभावी रिक्त हस्ते परत जाणार नाही, याची सर्वतोपरी काळजी घेतली जाते.
 
 
रक्तसाठवणूक आणि वितरण
 
 
सर्व आवश्यक तपासण्यानंतर रक्त व रक्तघटकांचे वितरण पुणे शहरातील सुमारे १५० ते १७५ रूग्णालयांना तसेच पुणे शहर, पुणे ग्रामीण व सातारा ग्रामीण या भागांतील एकूण १६ रक्तसाठवणूक केंद्रांना केले जाते. दरवर्षी रक्तपेढीतून सुमारे ३० हजार ते ३५ हजार रक्तघटकांचे वितरण होत असते. मोठ्या भौगोलिक क्षेत्रात सर्व ठिकाणी रक्ताची उपलब्धता कमीत कमी वेळात होण्यासाठी जनकल्याण रक्तपेढी पुणे व पुणे परिसरातील एकूण १६ रक्तसाठवणूक केंद्रांना मातृसंस्था म्हणून रक्तपुरवठा करते. यामध्ये पुणे शहरात दहा, तर पुणे जिल्ह्यातील शिरूर व सातारा जिल्ह्यातील वाई, फलटण व शिरवळ, पाचगणी या ग्रामीण भागांत सहा अशी एकूण १६ रक्तसाठवणूक केंद्रे कार्यरत आहेत आणि त्यांचा लाभ त्या त्या भागातील रूग्णांना होतो आहे.
 
 
अविरतपणे राबणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग हे या रक्तपेढीचे खास वैशिष्ट्य आहे. वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ, अधिकारी, सेवाव्रती, चालक, सेवक असा सुमारे ७० जणांचा कर्मचारी वर्ग अहर्निश कामामध्ये व्यस्त असतो.
 
 
रक्तदूत (कुरिअर सेवा)
 
 
रक्तदूत सेवा म्हणजेच वेळीअवेळी केवळ एका फोनवर प्रत्यक्ष रुग्णांपर्यंत जाऊन रक्ताचा नमुना रक्तपेढीत घेऊन येणे तसेच रक्तपिशवी रुग्णांपर्यंत पोहोचविणे होय. नाममात्र सेवाशुल्क आकारून २४ तास आणि सातही दिवस चालू असणारी ही सेवा शहरातील व शहराबाहेरील रुग्णांसाठी एक वरदान ठरली आहे. सध्याच्या विभक्त कुटुंबपद्धतीमध्ये असणारी मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता अशा प्रकारची सेवा म्हणजे रुग्णांकरिता एक दिलासाच होय. कुरिअर सेवेसाठी सध्या जनकल्याणचे नऊ कर्मचारी नियुक्त आहेत.
 
 
भारत विकास परिषद पॅथोलॉजी लॅब आरोग्यक्षेत्रात पॅथोलॉजी चाचण्यांची वाढती गरज लक्षात घेऊन जनकल्याण रक्तपेढीने भारत विकास परिषद या संस्थेच्या मदतीने २०१० मध्ये रक्तपेढीच्याच इमारतीमध्येभारत विकास परिषद पॅथोलॉजी लॅबची सुरूवात केली.
 
 
रक्तपेढीचे अन्य उपक्रम :
 
 
रक्तदाते, शिबीर संयोजक यांचा गौरव करण्यासाठी नैमित्तिक एकत्रीकरणे. २. ‘थेलेसेमिया’ग्रस्तांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम. ३. हितचिंतकांचे मेळावे. ४. ’समर्पण’ या वार्षिक वृत्तांताचे प्रकाशन. ५. रुग्णालयातील डॉक्टर्स व नर्सेस यांच्याकरिता ’रक्तसंक्रमण’ या विषयातील प्रशिक्षणाचे कार्यक्रम.
 
 
आंतररक्तपेढी आदान-प्रदान
 
 
रक्तसाठवणूक केंद्राबरोबरच जनकल्याणमार्फत पुण्यातील काही रक्तपेढ्यांखेरीज नागपूर, अकोला, उदगीर, नगर, वसई, मुंबई इ. ठिकाणच्या रक्तपेढ्यांनाही गरजेनुसार रक्तघटकांचा पुरवठा केला जातो.
 
जनकल्याण रक्तपेढी राज्य रक्त संक्रमण परिषद, महाराष्ट्र राज्याच्या पुरस्काराने सन्मानित 
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जागतिक रक्तदाता दिनानिमित्त दि. १४ जून रोजी यशंवराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे रक्तकेंद्राचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. रक्तसंकलन विलगीकरण, रक्ताची चाचणी साठवण वितरण इत्यादी कार्यामध्ये विशेष योगदानासाठी पुण्याच्या जनकल्याण रक्तपेढीचाही सत्कार यावेळी करण्यात आला. या सत्कार समारंभाचे प्रमुख अतिथी होते आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे, राज्य आरोग्यमंत्री राजेंद्र येडगावकर, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे. मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्रातील १५ रक्तपेढी, शेकडो रक्तदाते आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करणार्‍या संस्थांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे म्हणाले की, “महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात आणि दुर्गम भागातही आधुनिक रक्तपेढी असायला हवी. रक्तदान म्हणजे जीवनदान.” सन्मानाबद्दल जनकल्याण रक्तपेढीचे प्रतिनिधी संतोष अंगोलकर म्हणाले की, “या सन्मानाने आनंदित आहोतच, पण रक्तदान करण्यास लोक स्वेच्छेने आपल्या रक्तपेढीत येतात, हा आमच्यासाठी मोठा सन्मान आहे.” यावेळी १३५ वेळा रक्तदान केले म्हणून रा.स्व.संघाचे शरद गांगल यांचाही सत्कार करण्यात आला.
 
 
 - डॉ. अतुल कुलकर्णी