आडनावांवरून ‘ओबीसीं’ची गणना?

देवेंद्र फडणवीसांच्या आक्षेपाला विजय वड्डेट्टीवार आणि छगन भुजबळ यांची साथ

    14-Jun-2022
Total Views |

CB & VV
 
 
 
 
मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राज्यात सध्या ओबीसींचा ‘इम्पिरिकल डेटा’ गोळा करण्याचे काम सुरू आहे. मात्र, त्यासाठी सरकार वापरत असलेली पद्धत सदोष असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यात एकाच आडनावाचे अनेक समाजाचे लोक आहेत. अशावेळी एकसारख्या आडनावांमुळे ओबीसींची संख्या कमी दिसेल, अशी भीती फडणवीस यांनी व्यक्त केली. फडणवीसांच्या या आरोपांना मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही दुजोरा दिला आहे.
 
 
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ म्हणाले की, “आडनावावरुन जात ओळखणं कठीण आहे. त्यामुळे चुकीची संख्या आली, तर आयुष्यभर सगळ्या समाजाला त्याचे भोग भोगावे लागतील. एक आडनाव अनेक समाजात आहे. त्यामुळे आडनावावरुन जात ओळखणे कठीण आहे. त्यासाठी आयोगाने कर्मचार्‍यांना योग्य संदेश देणे आणि योग्य प्रकारे काम करुन घेणे गरजेचे आहे, यात काही दुमत असण्याचं कारण नाही. ओबीसी समाजाचे अनेक नेते बोलत असतात, त्यांच्या अनेक संघटना आहे.. ओबीसींच्या प्रत्येक पक्षाच्या संघटना आहे. ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या गावात योग्य काम होते की नाही, याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सात-आठ दिवस उशीर झाला तरी चालेल, पण हे काम व्यवस्थित व्हावे, अशीच आमची अपेक्षा आहे,”
 
 
 
‘ओबीसीं’चे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही.
 
फडणवीस यांच्या आक्षेपाला दुजोरा देत काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांनी ‘इम्पिरिकल डेटा’ गोळा करण्यासंदर्भात जे प्रश्न उपस्थित केले, ते काही अंशी खरेही आहेत. राज्य सरकारला याची कल्पना होती. आडनावावरून जो ‘इम्पिरिकल डेटा’ गोळा करण्याचे काम सुरू होते. आता त्यात सुधारणा केल्या जाणार असून आडनाव घेताना जात व प्रवर्ग हा संबंधित ग्रामपंचायतीकडून तपासणी केली जाईल. आता आम्हाला ही चूक लक्षात आली आहे. आम्ही आता त्यात सुधारणा करू, ओबीसींचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही. आम्हाला खुर्चीपेक्षा आणि पक्षापेक्षा ओबीसी आरक्षण महत्त्वाचे आहे.”