घोडबंदरची पाणीटंचाई हे कुणाचं पाप!

ठाणे भाजपचा पालिकेवर धडक मोर्चा

    13-Jun-2022
Total Views |

thane 3
 
 
 
 
 
ठाणे : घोडबंदररोडवरील तीव्र पाणीटंचाई दूर करण्यासाठी भाजपने महापालिकेवर आज धडक मोर्चा काढला. घोडबंदर रोडवरील रहिवाशांबरोबरच भाजपा कार्यकर्त्यांनी महापालिकेला पाणीटंचाईचा जाब विचारला. पाणी समस्या सोडवली नाही तर, पालिकेला घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. शहरातील पाणीटंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपने काढलेला आजचा आठवा मोर्चा होता. भाजपा जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे, आ. संजय केळकर आणि माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेऊन निवेदन दिले. या मोर्चात भाजपाचे प्रदेश सचिव संदिप लेले, माजी नगरसेविका अर्चना मणेरा, कमल चौधरी, कविता पाटील, संजय तांडेल, सरचिटणीस विलास साठे, कैलास म्हात्रे, उपाध्यक्ष सागर भदे, सचिन मोरे, कासारवडवली मंडल अध्यक्ष राम ठाकुर, हेमंत म्हात्रे, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष सचिन केदारी आदी उपस्थित होते.
 
 
 
घोडबंदर रोडवरील तीव्र पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना कराव्यात. त्याचबरोबर महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र धरण उभारण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा,अशी मागणी आयुक्त डॉ. शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. घोडबंदर परिसरात कापूरबावडीपासून थेट गायमुखपर्यंत अनेक गृहसंकुले व इमारती उभारल्या गेल्या. मात्र, त्यातुलनेत पाणीपुरवठ्याच्या सुविधा वाढविल्या गेल्या नाहीत. सत्ताधारी शिवसेनेच्याच कृपेने टँकर लॉबी फोफावली आहे, असा आरोप मोर्चात करण्यात आला. सत्ताधाऱ्यांच्या कृपेने ठाणेकरांच्या हक्काचे पाणी टँकर लॉबीला दिले जात आहे. यापुढे पुरेसे पाणी मिळेपर्यंत व स्वतंत्र धरण होईपर्यंत भाजपचे आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार आ. डावखरे यांनी व्यक्त केला.
 
 
 
वागळे इस्टेट परिसराला १० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा दिला गेला. मात्र, घोडबंदररोडला वाऱ्यावर सोडण्यात आले. पालकमंत्री हे केवळ वागळे इस्टेटचे पालकमंत्री आहेत का? असा टोला आ. संजय केळकर यांनी लगावला. यापुढील काळात पाणीप्रश्न न सुटल्यास महापालिकेला घेराव घालण्यात येईल, असा इशाराही आ. केळकर यांनी दिला. घोडबंदर रोड परिसरातील गृहसंकुले व इमारतींमधून कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला जातो. ठाणे महापालिकेत तब्बल २५ वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, सत्ताधारी शिवसेना स्वतंत्र धरण उभारण्यात अयशस्वी ठरली. २०१७ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीतही शिवसेनेने वचननाम्यात स्वतंत्र धरणाचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही, शिवसेनेने ठाणेकरांची फसवणूक केली आहे, अशी टीका मनोहर डुंबरे यांनी केली. दरम्यान, बंद कूपनलिका सुरू करणे, विहिरी साफ करणे, विकासकांनी घेतलेल्या बेकायदा नळ जोडणी शोधून ती तोडणे आदी आश्वासने आयुक्त डॉ. शर्मा यांनी भाजपाच्या शिष्टमंडळाला दिली, अशी माहिती आ. निरंजन डावखरे यांनी दिली.