नवी दिल्ली: “मागील आठ वर्षांच्या काळात भारताने ‘ग्राम स्वराज’मध्ये मैलाचा दगड गाठला असून, पंचायत व्यवस्थेला बळकटी मिळाली आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. “कल्याणकारी योजना, जल संवर्धन यासाठी सरपंचांनी ठोस पुढाकार घ्यायला हवा,” असे आवाहनही मोदी यांनी केले.
पंतप्रधान मोदी यांनी अलीकडेच सरपंचांना पत्र लिहिले. या पत्रात मोदी यांनी काही मुद्द्यांचा विशेष उल्लेख केला आणि या योजनांसाठी सरपंचांचे सहकार्य मागितले. “मागील आठ वर्षांच्या काळात तुम्ही सर्वांनीच विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत भरीव योगदान दिले आहे,” असे कौतुकोद्गारही मोदी यांनी काढले.
येत्या २१ जून रोजी आपण आठवा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा करणार आहोत. हा दिवस आपल्याला विशेष असाच करायचा आहे आणि यात गावांमधील प्रत्येक व्यक्ती सहभागी होईल, याची काळजीदेखील तुम्हालाच घ्यायची आहे, असे आवाहनही मोदी यांनी केले. “यावर्षीच्या ‘योग दिना’ची संकल्पना ‘मानवतेसाठी योगा’ अशी आहे. हा दिवस जास्तीत जास्त यशस्वी करायचा आहे. त्यामुळे लोकप्रिय पर्यटन स्थळी किंवा जलाशयांजवळील मोकळ्या जागेवर योग दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा आणि त्या कार्यक्रमांची छायाचित्रे किंवा व्हिडीओ पाठविण्यात यावे,” असेही मोदी यांनी सांगितले.