वटवृक्षाच्या संवर्धनासाठी सुवासिनी सरसावल्या

वटपौर्णिमेला सुवासिनी करणार वटवृक्षाच्या चित्राचे पूजन

    13-Jun-2022
Total Views |

vtp
 
 
ठाणे: कोरोनाच्या जवळपास दोन वर्षानंतर यंदाची वटपौर्णिमा साजरी करण्याचा आनंद सुवासिनी घेणार असल्या, तरी वडाच्या संवर्धनासाठी सुवासिनींनी एक पाऊल पुढे टाकले आहे. वटपौर्णिमेला वटवृक्ष अथवा घरात वडाच्या फांद्याचे पूजन केले जाते. त्यामुळे बेसुमार वृक्षतोड होऊन वटवृक्षाची पर्यायाने पर्यावरणाचीदेखील मोठ्या प्रमाणावर हानी होत असते. तेव्हा, वडाच्या फांदीऐवजी वडाच्या झाडाचे चित्र रेखाटून अथवा रांगोळी काढून वटपौर्णिमा साजरी करून, पर्यावरण संवर्धनासाठी खारीचा वाटा सुवासिनी उचलणार आहेत. सध्याच्या घडीला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला, तरी प्रशासनाने सण उत्सवामध्ये कोणत्याही प्रकारचे निर्बंध ठेवलेले नाहीत. त्यामुळे येणारी वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्याचा मनोदय सुवासिनींचा आहे. परंतु, वडाच्या झाडाला कोणतीही इजा न करता, वटपौर्णिमा आनंद लुटण्याचा संकल्प अनेक महिलांनी केला आहे.
 
 
वडाच्या झाडांनी व्यापलेल्या शहरात या झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात होते आहे. त्यामुळे वटपौर्णिमेला जवळ वडाचे झाड शोधणे सुवासिनींसाठी मोठी कसरत असते. अनेक सुवासिनी वडाच्या झाडाची फांदी घरात आणून पूजतात. मात्र, या फांदीसाठी वडाच्या झाडांना मोठी हानी पोहोचत असून, वडाच्या संवर्धनासाठी अनेक सुवासिनी वडाची प्रतीकात्मक चित्र काढून पूजन करणार आहेत.
 
 
वटपौर्णिमेला वडाच्या फांद्या कापून, पूजा झाली की, दुसर्‍या दिवशी फांदी कचराकुंडीत फेकली जाते. त्यामुळे वडाच्या झाडांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेणे खूप महत्त्वाचे आहे.
 
 
प्राणवायू देणारा वड
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांची मोठी मदत मिळते. यातही वड, पिंपळ उंबर, कडुलिंब आदी स्थानिक झाडे महत्त्वाची असतात. आयुर्वेदातवडाचे झाड खूप महत्त्वाचे आहे. भरपूर प्राणवायू, धुलिकण शोषून घेण्यासाठी हे झाड ओळखले जाते. झाडाच्या पानांमागे बघितले, तर धुलिकण चिकटलेले दिसतात.
- डॉ. प्रमोद साळसकर, पर्यावरणतज्ज्ञ