गांधीनगर : सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात आरोपी असलेल्यांपैकी संतोष जाधव या एका आरोपीला अटक करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. संतोष जाधव या आरोपीला गुजरात राज्यातील कच्छ मधून अटक करण्यात आली आहे. संतोष जाधव बरोबर त्याचा साथीदार सूर्यवंशी याला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनाही रात्री बारा वाजता न्यायाधीशांच्या घरी हजर करण्यात आले होते, न्यायाधीशांनी त्या दोघांना २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
संतोष जाधव हा पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरचा रहिवासी होता. तब्बल दीड वर्षांपासून राणा बाणखेले या गुंडाची हत्या केल्याप्रकरणी तो फरार होता. फरारी असतानाच तो उत्तर भारतातील लॉरेन्स बिष्णोई या टोळीत सामील झाला होता. या टोळीसाठी खंडणी वसूल करण्याकरिता काही दिवसांपूर्वी संतोषने राजस्थानमधील गंगापूर शहरातील एका व्यापाऱ्यांवर गोळीबार केला होता. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्या प्रकरणात संतोष जाधव या नावाची जास्त चर्चा सुरु झाली होती. त्याचबरोबर अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणातसुद्धा संतोष जाधवचे नाव चर्चेत होते.
पंजाब, दिल्ली आणि मुंबई पोलिसांकडून संतोष जाधवचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली होती. त्यासाठी वेगवेगळ्या राज्यातील पोलीस पुण्यात तळ ठोकून बसले होते. मात्र पुणे ग्रामीण पोलिस पथकाला संतोष जाधव या आरोपीला गुजरात राज्यातील कच्छ मधून अटक करण्यात यश मिळाले. काही दिवसांपूर्वीच संतोष जाधव याचा साथीदार सौरभ महाकाळ उर्फ सिद्धेश कांबळे याला अटक करण्यात आली होती.