मेक्सिकोतील ‘जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धे’त आकांक्षा व्यवहारेला रौप्यपदक

    12-Jun-2022
Total Views |

akansha vyavhare
 
 
 
 
मेक्सिको : मेक्सिको लिओन येथे सुरु असलेल्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत आकांशा व्यवहारेनी ऐतिहासिक कामगिरी बजावली. आकांक्षाने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ४० किलो वजनी गटात भारतासाठी ५९ किलो स्नॅच व ६८ किलो क्लिन जर्क असे १२७ किलो वजन उचलून वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. मनमाडच्या क्रीडा इतिहासात जागतिक युथ वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक पटकावणारी आकांशा ही पहिलीच खेळाडू ठरली आहे. कझाकीस्थान व कोलंबियाच्या खेळाडूंशी अटीतटीची लढत देत असतांना आकांक्षाचे सुवर्णपदक अवघ्या एक किलोने हुकले.
 
 
 
गेल्या दोन महिन्यांपासून भारतीय क्रीडा प्राधिकरण पतियाळा येथे भारतीय संघाचे प्रशिक्षण शिबिरातसुद्धा आकांक्षाने आपल्या जिद्द व मेहनतीच्या जोरावर उत्तम कामगिरी बजावली होती. आकांक्षा सध्या गुरू गोविंद सिंग हायस्कुल मनमाड येथे इ १० वीत शिकत आहे. ५९ किलो स्नॅचचा तिसरा प्रयत्न आकांक्षाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक मिळवून देणारा ठरला. क्लिनजर्क मध्ये ६८ किलोचा दुसरा यशस्वी प्रयत्न झाल्यानंतर ७१ किलोचा तिसरा प्रयत्न अयशस्वी ठरला, त्यामुळे आकांक्षाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अतिशय कमी वयात जागतिक पातळीवर उत्कृष्ट कामगिरी बजावणारी आकांक्षा पुढील जागतिक स्पर्धेत नक्कीच सुवर्णपदक पटकावेल.
 
 
 
आकांक्षाला छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे, व भारतीय संघाबरोबर मेक्सिको येथे प्रशिक्षक म्हणून निवड झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले. जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील, मोहन अण्णा गायकवाड, डॉ. सुनील बागरे, प्रा. दत्ता शिंपी, छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी. जी. धारवाडकर, अध्यक्ष पी. जे. दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी, प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापक आर. एन. थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे, पर्यवेक्षिका पोतदार एस एस, महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष संजय मिसर, सचिव प्रमोद चोळकर, भारतीय व महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघाचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने, गुरू गोविंद सिंग हायस्कुलचे अध्यक्ष बाबा रणजित सिंग, प्राचार्य सदाशिव सुतार यांनी आकांक्षाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छासुद्धा दिल्या.