सौंदर्यवती पूजा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2022   
Total Views |

pooja parmeshwar 2
 
 
 
 
 
विविध सौंदर्य स्पर्धांत विजेतेपद पटाकावणार्‍या पूजा परमेश्वरला सुरुवातीला ‘सीए’ व्हायचे होते. पण, नंतर ती प्रीस्कूल शिक्षिका झाली व पुढे तर सौंदर्य स्पर्धांतही भाग घेतला, जाणून घेऊया तिच्याविषयीच...
 
 
 
‘एसआर क्विन्स मीडिया’तर्फे घेण्यात आलेल्या ‘मिसेस इंडिया क्विन सौंदर्य स्पर्धे’त ‘सिझन-२’ची विजेती मुंबईची मराठी मुलगी पूजा परमेश्वर ठरली आहे. पूजाला विजेतेपदाचा मुकूट प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यानिमित्ताने पूजाच्या या क्षेत्रातील प्रवास जाणून घेऊया. पूजाचा जन्म बोरिवली येथे झाला. तिचे शालेय शिक्षण बोरिवली येथे झाले. त्यानंतर एन. एम. महाविद्यालय, विलेपार्ले येथून तिने वाणिज्य शाखेत पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. पदवीनंतर पूजाने ‘सीए’ करण्याचा निर्णय घेतला. तिने ‘इंटर सीए’पर्यंतचे शिक्षण घेतले. दरम्यानच्या काळात पूजाचे लग्न ठरले. त्यानंतरही तिचे ‘सीए’चे शिक्षण सुरू होते. पण पूजाला आपला कल वेगवेगळ्या क्षेत्राकडे असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिने ‘सीए’च्या शिक्षणाला पूर्णविराम दिला. २०११ साली पूजाचा परमेश्वर यांच्याशी विवाह झाला. परमेश्वर हे स्वत: ‘सीए’ आहेत. पूजाला एक मुलगा आहे. त्याला जास्तीत जास्त वेळ देता येईल आणि कौटुंबिक जबाबदारी या सगळ्या जबाबदार्‍या पाहून काय करता येईल, याचा विचार करून पूजा ‘प्रीस्कूल’कडे वळली. एखाद्या सजर्नशील व्यवसायात येण्याची पूजाची इच्छा होती. त्यानुसार २०१५ ला ‘प्रीस्कूल’शी पूजा जोडली गेली. सुरुवातीला तिचा उत्साह पाहूनच संस्थेने तिला संधी दिली. ‘प्रीस्कूल’मध्ये ती मुलांना शिकावू लागली. काळानुरूप ‘प्रीस्कूल’साठी लागणारे प्रशिक्षणही तिने घेतले. ‘ईसीसीईडी’चा कोर्स तिने केला. २०१२ पर्यंत ‘सीए’साठीचे प्रशिक्षण सुरू होते. त्यानंतर त्यांनी थोडा ‘ब्रेक’ घेऊन मग ‘प्रीस्कूल’ जॉईन केले होते. शाळेमध्ये असतानाच त्यांना थोडेफार ‘मॉडेलिंग’ची आवड होती. शाळेत असताना ऐश्वर्या राय आणि सुश्मिता सेनसारखे आपणही काहीतरी करायचे, असे वाटत होते. शालेय जीवनात ते काही शक्य झाले नाही. ती शालेय जीवनात गायन, नृत्य अशा विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत होती. पण लग्नानंतर कौटुंबिक जीवनात स्थिरावल्यानंतर तिने लहानपणापासून मनी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आणि स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पूजाला ‘एसआर’ या सौंदर्य स्पर्धेची माहिती मिळाली.
 
 
 
त्यापूर्वी ती ‘तनिष्क ज्वेलरी’च्या डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या स्पर्धेत सहभागी झाली होती. या स्पर्धेत चार हजार स्पर्धेकांमधून पूजा ‘टॉप-३०’मध्ये आली होती. त्यावेळी आपण हे कामदेखील चांगले करू शकतो, असे पूजाला वाटू लागले. म्हणून पूजाने सौंदर्य स्पर्धेविषयी माहिती मिळविली. ‘एसआर’ या सौंदर्य स्पर्धेत केवळ मतदान करून पुढे जाता येते, असे नाही किंवा सौंदर्याच्या जोरावरही विजेती होता येत नाही. या सौंदर्य स्पर्धेसाठी खूप ‘टास्क’ दिले होते. त्या ‘टास्क’वर मार्क्स होते. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. ही स्पर्धा जिंकल्यानंतर ‘एसआर’सोबत एक वर्षाचा करार झाला आहे. त्यामुळे यापुढील काळात त्यांच्या ‘एनजीओ’च्या कामात पूजाचा सहभाग असेल. तसेच पूजाला वैयक्तिक कोणतेही काम मिळाले, तरी ती करू शकते. त्यामुळे आता एखादी अभिनयाची, ‘मॉडेलिंग’ची, ‘एनजीओ’मध्ये ‘असोसिएट’ होणे, अशा विविध प्रकारांपैकी कोणतीही संधी मिळाली, तर ते स्वीकारणार असल्याचे पूजा सांगते. पूजा व्यासपीठावर आपण कसे वावरायला हवे, त्यासाठी इंटरनेटवर अनेक गोष्टी ‘सर्च’ करत होती. अधूनमधून सराव करत होती. तिने आहारदेखील त्याप्रमाणे ठेवला होता. घरातील आहार जास्तीत जास्त खाण्यावर भर दिला. पाकीटबंद अन्न पूर्णपणे बंद केले होते. ‘तनिष्क’च्या स्पर्धेनंतर पूजाने सौंदर्य स्पर्धेसाठीआणखी जोरदार तयारी सुरू केली. ‘फिटनेस’साठी एक ‘ट्रेनर’ तिच्याकडे येत होता. ते ‘फिटनेस वर्कआऊट’ दररोज करीत होती. ते तिने सहा महिने केले. तिचे ‘वर्कआऊट’ आजही सुरू आहे. ‘एसआर’ यांनी प्रत्येक स्पर्धेकांकडून पुष्कळ तयारी करून घेतली होती. त्यासाठी ‘लेक्चर’देखील घेतली होती. सध्या ‘कोविड’ काळ असल्याने सर्व ‘लेक्चर’ ऑनलाईन होती. स्त्रियांचा काही काळानंतर स्वत:वरचा ‘फोकस’ निघून जातो. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्या ‘करिअर’मध्ये काही करू इच्छित असल्या, तरी कौटुंबिक जबाबदारीमुळे ते मागे पडते. कुटुंबाने तिला ‘सपोर्ट’ केला पाहिजे व स्त्रियांनीसुद्धा आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. माझ्या कुटुंबानेदेखील माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी चांगला ‘सपोर्ट’ दिला आहे. त्यामुळेच ही स्पर्धा मी जिंकू शकले, असे पूजा सांगते. या यशामागे ‘एसआर’च्या संचालिका श्वेता रॉय यांचादेखील मोलाचा वाटा आहे. पूजाला आता याच क्षेत्रात पुढे जाण्याची इच्छा आहे. त्यासोबत तिचे ‘प्रीस्कूल’चे कामही सुरूच आहे. त्या ‘किंडर कॅम्पस, चेंबूर’ आणि ‘कांगारू किड्स, घाटकोपर’ या दोन ठिकाणांच्या ‘प्रीस्कूल’मध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. पूजासाठी ‘एसआर क्विन्स’ ही व्यावसायिक पातळीवर तशी पहिलीच स्पर्धा होती. त्यात तिने पहिल्याच प्रयत्नात विजेते पदाचा मुकूट मिळविला असल्याने तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अशा या हरहुन्नर व्यक्तिमत्त्वाला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.
 
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@