युक्रेनमधील महिलांच्या परिस्थितीचा आढावा घेतला, तर जाणवेल की, युद्धग्रस्त स्थितीत स्त्रीला विकृततेचा सामना करावा लागतो. असाहाय्य महिलेला मदत करणारे लोक आहेत. पण, परिस्थितीमुळे तिच्या स्त्रीत्वाचा फायदा घेणारेही आहेत. वाईट असणार्यांमुळे मुली, महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त होते.
युक्रेनमधून लोकांचे पलायन
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे. रशियाने केलेल्या आक्रमणात तेथील स्त्री-पुरुष सर्वांचेच भयंकर नुकसान झाले. युक्रेनमध्ये काळ्या कचर्याच्या पिशवीत गुंडाळलेले ४०० हून अधिक मृतदेह सापडले होते. युद्धाच्या भीतीमुळे युक्रेनच्या नागरिकांना इतर देशांमध्ये निर्वासित होण्यास भाग पाडले जात आहे. हजारो युक्रेनियन लोक आपली घरे सोडून आश्रय घेण्यासाठी पश्चिम सीमेवरील देशांमध्ये पोलंड, हंगेरी, रोमानिया किंवा मोल्दोव्हामध्ये पोहोचत आहेत. विस्थापित झालेल्या लोकांपैकी अर्ध्याहून अधिक महिला असाव्यात, असा अंदाज आहे. यातील बर्याच जणी गर्भवती आहेत, काही अपंग आहेत, तर काही हिंसाचाराला बळी पडल्या आहेत. अनेकजण बस किंवा चारचाकीने येथे पोहोचले. युक्रेन सरकारने १८ ते ६० वयोगटातील पुरुषांना देश सोडण्यास मनाई केली आहे. शेजारील देशांनी मानवतावादी आधारावर या लोकांना आपल्या सीमेत प्रवेश करण्यास परवानगी देत, मदतीचे आश्वासन दिले आहे.
शेजारील देशांमध्ये आश्रय
खासदार आर्थर वाल हा युक्रेनमधील विध्वंसाची पाहणी करण्यासाठी युक्रेन सीमेवर गेला. तिथून त्याने एक विधान केले की, “मी पायी चालत युक्रेनची सीमा ओलांडली. मी एवढ्या सुंदर निर्वासित मुली अगोदर कधीच पाहिल्या नाहीत.” युक्रेनमधील महिलांच्या परिस्थितीचा आढावा घेतला, तर जाणवेल की, युद्धग्रस्त स्थितीत स्त्रीला विकृततेचा सामना करावा लागतो. असाहाय्य महिलेला मदत करणारे लोक आहेत. पण, परिस्थितीमुळे तिच्या स्त्रीत्वाचा फायदा घेणारेही आहेत. वाईट असणार्यांमुळे मुली, महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त होते.
युद्धभूमीवरील अत्याचाराच्या
भयंकर कहाण्या
महिला लहान मुलांसोबत आसरा शोधत आहेत. या निर्वासितांसाठी मोकळ्या मैदानात तंबू उभारले जात आहेत. खाण्यापिण्याची व्यवस्थाही केली जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार एक कोटींहून अधिक लोकांनी सीमा पार केली आहे. रशियाच्या आक्रमणानंतर सरकारकडून शहरातील महिलांवरील बलात्कार टाळण्यासाठी केस कापण्याची सक्ती केली जात आहे. यामुळे त्यांचे सौंदर्य कमी होईल व त्या सुरक्षित राहतील, असे महिलांना वाटते. एका शहरात १५ आणि १६ वर्षांच्या दोन बहिणींवर बलात्कार झाल्याची घटना आहे. एका युक्रेनियन महिलेने दावा केला की, रशियन सैनिकांनी तिच्या पतीची हत्या केल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. याशिवाय रशियन सैनिकांनी दहा वर्षांच्या मुलींवर बलात्कार केल्याचा दावा युक्रेनच्या खासदार लेसिया वेसिलेंक यांनी केला आहे. रशिया व युक्रेनमध्ये युद्धभूमीवरील छळाच्या व अत्याचाराच्या भयंकर कहाण्या हळूहळू समोर येत आहेत.
महिला, मुलींबरोबरच व
तरुण मुलांवरही अत्याचार
रशियन सैनिकांनी युक्रेनमधील महिला, मुलींबरोबरच पुरुष व तरुण मुलांवरही अत्याचार केल्याचे समोर आले आहे. युक्रेन व संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकार्यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार, रशियन सैन्याने पुरुष व मुलांवर केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या डझनभर तक्रारींची चौकशी सध्या सुरू आहे. मात्र, प्रत्यक्षात हा आकडा कितीतरी अधिक असण्याची शक्यता आहे. महिला व तरुणींकडून याबाबतीत तक्रारी केली जाण्याची शक्यता कमी आहे. पुरुष व तरुणांकडून अशा तक्रारी येणं त्याहूनही कठीण आहे. सत्य उजेडात येण्यासाठी परिस्थिती निवळण्याची गरज आहे, पीडितांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार करण्यासाठी पुढं यावं, असं ‘युनो’च्या प्रतिनिधी प्रमिला पॅटन म्हणाल्या. युक्रेन सरकारने यासंदर्भात एक अहवाल तयार केला आहे. त्यात रशियन सैनिकांनी युक्रेनमधील लहान मुलांपासून ते वयोवृद्ध नागरिकांवर केलेल्या अत्याचाराची माहिती आहे.
महिलांचे एक वेगळ्या प्रकारचे युद्ध
युक्रेनमधील महिला एका वेगळ्या प्रकारचे युद्ध लढत आहेत, ज्यात त्यांना स्वतःचेत्यांच्या कुटुंबांचे संरक्षण करावे लागत आहे. रशियन बॉम्बहल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, भूमिगत मेट्रो स्थानकांत बालकांना जन्म देणार्या महिलांची भयावह छायाचित्रे, व्हिडिओज तसेच, बॉम्ब अथवा क्षेपणास्त्रांसारख्या स्फोटक शस्त्रांपासून लोकांना संरक्षित करण्यासाठीच्या बंद जागेतील आश्रयस्थानांमध्ये तत्काळ हलविलेल्या नवजात मुलांचे व्हिडिओज सोशल मीडियावर समोर आले आहेत. युक्रेनमधील युद्धाचा विशेषत: महिलांवर जितका मोठा परिणाम झाला आहे, त्याचे अद्याप पूर्णपणे दस्ताऐवजीकरण करण्यात आलेले नाही. याशिवाय, युक्रेन-रशिया युद्धात महिलांविरूद्ध होत असलेल्या गुन्ह्यांची अधिकृत माहितीदेखील गहाळ आहे. कुटुंबाची काळजी घेण्याच्या अतिरिक्त जबाबदारीचे ओझे महिला पेलत आहेत आणि लैंगिक शोषण व गैरवर्तन याबाबतीत त्या अधिक असुरक्षित बनल्या आहेत.
आरोग्य सेवा उपलब्ध नाहीत
रशियाच्या लष्करी आक्रमणामुळे नियमित आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत, ज्यामुळे प्रसूती काळजीसह अगदी मूलभूत आरोग्य सेवाही महिलांना उपलब्ध होण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. स्ट्रेचरवरील गर्भवती महिलेच्या मृत्यूची बातमी, प्रसूतीपूर्व काळजीची गरज असलेल्या महिलांची असुरक्षा अधोरेखित करते. अंदाजानुसार, युक्रेनमध्ये पुढील तीन महिन्यांत सुमारे ८० हजार महिला बाळाला जन्म देतील. या गर्भवती महिला मातृत्वासंदर्भातील आरोग्य सेवेपासून वंचित राहिल्यास, बाळंतपण त्यांच्यासाठी जीवघेणा ठरू शकतो. २०१९ मध्ये ‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड’द्वारे (युएनएफपीए) प्रकाशित केलेल्या अभ्यासातील आकडेवारीनुसार, सुमारे ७५ टक्के युक्रेनच्या महिलांनी वयाच्या १५व्या वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या प्रकारचा हिंसाचार अनुभवला आहे आणि तिघींपैकी एकीला शारीरिक हिंसाचाराला सामोरे जावे लागल्या आहे.
लैंगिक हिंसाचार आणि बलात्कार
युद्धाचे अस्त्र
लैंगिक हिंसाचार आणि बलात्कार हे युद्धाचे अस्त्र म्हणून वापरले जाते, हे लक्षात घेता, रशियाने केलेल्या लष्करी आक्रमणादरम्यान तेथील महिलांना लैंगिक आणि शारीरिक हिंसाचार, अत्याचार, बलात्कार आणि छळवणूक याचा मोठा धोका युद्ध संपेपर्यंत आहे. युक्रेनच्या खासदार लेसिया वासिलेन्क यांनी दावा केला आहे की, रशियन सैन्याने महिलांवर बलात्कार केला आणि महिलांच्या शरीरावर ‘स्वस्तिक’ आकाराच्या भाजल्याच्या खुणांचे ठसे मागे सोडले. ही छायाचित्रे रशियाने केलेल्या युद्ध-गुन्ह्यांचे प्रकरण तयार करण्यासाठी पुरावा म्हणून वापरली जाऊ शकतात. युद्धामुळे इतर ठिकाणी विस्थापित होण्याकरता बालविवाह किंवा आत्यंतिक गरजेपोटी शरीरविक्रय करण्यासारख्या नकारात्मक पद्धतींचा अवलंब करण्यास भाग पडणे, याचा शेवट शोषणात होतो.
संगोपनाचे ओझे
युक्रेनमध्ये महिलांकडे त्यांची मुले, कुटुंबे आणि घरातील वृद्ध व्यक्तींचे पालनपोषण करण्याची जबाबदारी असते. मात्र, रशियाच्या आक्रमणादरम्यान, युक्रेन सरकारने १८-४० वर्षे वयोगटातील पुरुषांनी देश सोडून न जाता, देशासाठी लढण्याचे आदेश जारी केला आहे. त्यामुळे युक्रेनमधील महिलांना आता काळजी घेण्याच्या जबाबदार्यांचा सामना करावा लागत आहे. पारंपरिक कुटुंबपद्धतीला तडा गेल्यामुळे, युक्रेनच्या महिलांच्या हाती कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी अल्प उत्पन्न शिल्लक राहिले आहे. आसरा मिळालेल्या देशांमध्ये पुनर्वसनासाठी महिला आणि मुलांना अल्पमदतीसह एकट्याने पळून जावे लागल्याने, स्थिती अधिक बिघडली आहे. ‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन’च्या मते, एक कोटी व्यक्तींपैकी अर्ध्याहून अधिक महिला आणि मुले आहेत, ज्यांनी आक्रमणामुळे युक्रेनमधले आपले घर सोडून पळ काढला आहे. हे वाढते कौटुंबिक ओझे पेलणे, महिलांच्या क्षमतेच्या पलीकडे असल्याने त्यांना चिंता, आघात आणि नैराश्य यांसह मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
चीनमधून विवाहासाठी
युक्रेनच्या मुलींना मागणी
चीन आणि युक्रेनसदंर्भात एक बातमी समोर आली आहे. सध्या चीनमधून विवाहासाठी युक्रेनच्या मुलींना मागणी अचानक वाढली. कारण, चीनच्या पुरूषांना खात्री आहे की, युक्रेनमध्ये युद्धामुळे तिथले नागरिक युक्रेनमधून पलायन करत आहेत. त्यामुळे युद्धग्रस्त स्थितीला घाबरून युक्रेनच्या मुली देशाबाहेर राहण्यास तयार होतील. चिनी पुरूषांना वाटते की, युक्रेनमधील अस्थिर परिस्थितीमुळे युक्रेनमधील गोर्या आणि सोनेरी केसांच्या त्या मुली सहजासहजी विवाहाला तयार होतील. मात्र, ही मागणी विवाहाकरिता नसून त्या मुलींच्या शोषणासाठीही असू शकते. कदाचित या मुलींच्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना देहविक्रीच्या धंद्यात ढकलण्याचेही षड्यंत्र असू शकते. त्यामुळे चीनमध्ये युक्रेनच्या मुलींना विवाहासाठी मागणी वाढली, हा एक चिंतेचाच विषय आहे. आशा करूया की, युक्रेन युद्ध लवकरात लवकर संपेल आणि युक्रेनच्या महिलांवरती होणारा हिंसाचार थांबेल आणि त्यांना पुन्हा एकदा सुरक्षित जीवन जगता येईल.
- (नि.) ब्रि. हेमंत महाजन