कोरेगाव-भीमा हिंसाचारासंदर्भात तळोजा तुरूंगात असलेल्या सागर गोरखेने तुरूंगात सोईसुविधा मिळाव्यात यासाठी उपोषण केले. फोन वापरायला मिळावा, आमची पत्रे स्कॅन केली जाऊ नयेत, पंखा आणि पाणी उपलब्ध व्हावे, तसेच इतर काही मागण्यांसाठी ते उपोषण होते. सात दिवस झाले तरी त्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. शेवटी शिक्षक मतदारसंघाचे आमदार आणि लोकभारतीचे अध्यक्ष कपिल पाटील हे तळोजा तुरूंगात गेले. सागर गोरखेची त्यांनी समजूत काढली. तसेच त्याच्या मागण्यांसाठी आपण कसा पाठपुरावा केला, हे देखील त्यांनी अभिमानाने जाहीर केले. या घटनेला प्रसारमाध्यमांनी फारशी प्रसिद्धी दिली नाही. मात्र, सामजिक घटनांचा मागोवा घेताना भारतीय नागरिक आणि संविधानाची पुरस्कर्ती म्हणून मला या घटनेचे विशेष वाटले. ते विशेष इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
“आमच्या नातेवाईकांशी बोलण्यासाठी आम्हाला फोन हवेत, आमची पत्रं तपासली जातात, आम्हाला मच्छरदाणी हवी, आम्हाला दिवसाला १३५ लीटर स्वच्छ पाणी हवे, हवेसाठी पंखा हवा, मी आणि आमचे साथीदार आजारी असतो, आम्हाला तत्काळ आरोग्य सुविधा हवी, आमचे नातेवाईक आम्हाला भेटण्यासाठी येतात. त्यांना बसण्यासाठी चांगली सुविधा हवी,” अशी मागणी कोरेगाव-भीमा हिंसाचारानंतर तळोजा तुरुंगात अटकेत असलेला आरोपी सागर गोरखेेने केली. या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून त्याने २० मेपासून उपोषणही सुरू केले होते. यावर तळोजा तुरूंगाचे अधीक्षक यु. टी. पवार यांचे म्हणणे होते की, ”गँगस्टर, दहशतवादी आणि नक्षलींसंदर्भात अटक गुन्हेगारांना फोन वापरू न देणे, त्यांना बाहेरून आलेली पत्रं आणि साहित्य तपासणे हे तुरूंगाच्या नियमावलीतच आहे. तसेच सागर गोरखे जिथे आहे, तिथे पाण्याची टाकी आहे. त्यामुळे त्याला हवे तेव्हा पाणी उपलब्ध आहे. त्या व्यतिरिक्त जर त्याला आणखीन पाणी हवे असेल, तर तो पाणी खरेदी करू शकतो. तसेच, मच्छरदाणीचा वापर करून कैदी आत्महत्येचा प्रयत्न करू शकतात म्हणून मच्छरदाणी दिली नाही.” तळोजा तुरूंगात असलेल्या सागर गोरखेचे तथाकथित उपोषण सात दिवस सुरू होते. या सगळ्या काळात शहरी आणि ग्रामीण भागातील छुप्या नक्षली समर्थकांनी, त्यात अर्थात ‘डफली गँग’ आघाडीवर होती. त्यांनी या उपोषणाला भरपूर प्रसिद्धी दिली. मात्र, या सगळ्या उपोषणकिंवा मागणीला महाराष्ट्राच्या सर्वधर्मीय जनतेने समर्थन तर सोडाच, त्याची साधी दखलही घेतली नाही. पण, या उपोषणाची आणि कोरेगाव-भीमा हिंसेच्या पार्श्वभूमीवर तुरूंगात असलेल्या सागर गोरखेची दखल घेतली ती ‘लोकभारती’चे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील यांनी. कपिल पाटील २७ मे रोजी तळोजा तुरूंगात गेले. त्यांनी म्हणे सागर गोरखेला समजावले की, स्वतःला त्रास करून प्रश्न सुटत नसतात. तसेच स्वतः कपिल पाटील यांनी जाहीर केले की, सागर गोरखेच्या उपोषणाबद्दल आणि त्याच्या मागण्याबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्याशी संपर्क करणार. तसेच सागर गोरखेने ज्या मागण्या मांडल्या, त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण कसे प्रयत्न केले, हेसुद्धा कपिल पाटील यांनी आपण फार मोठे लोकसेवेचे काम करतो, या पद्धतीने सांगितले. ते म्हणाले की, ”तुरूंगात पाणी कमी येते. पाण्याचा प्रश्न ‘सिडको’ प्रशासनाकडे आहे. मी ‘सिडको’कडे हा प्रश्न मांडला. तसेच, तुरूंगात बंद असलेल्या कैद्यांना भेटायला येणार्या नातेवाईकांना उठण्या-बसण्याची सुविधा व्हावी म्हणून एक शेड बांधायला हवी.

ती शेड बांधायची मागणी मी स्थानिक आमदारांना पूर्ण करण्यास सांगणार आहे. तसेच, सागर गोरखे वगैरे कैद्यांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी मी तुरूंग अधिकार्यांशी बोललो. ”बापरे, किती मोठे लोकोपयोगी, समाजपयोगी काम कपिल पाटील यांनी केले. खरंच जर तातडीने हे काम त्यांनी केले नसते,तर समाजाचे मोठे नुकसान झाले असते का? या पार्श्वभूमीवर मागोवा घेतला, तर जाणवते की, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, राष्ट्रवादीचे शरद पवार म्हणा यांच्यासाठी कपिल पाटील यांच्या जिभेतून स्तुतीसुमनांचा धबधबाच कोसळतो. अर्थात, प्रकाश आंबेडकर काय किंवा शरद पवार काय, हे दोघेही राजकीय नेते आहेत. त्यामुळे कपिल पाटील यांना शिक्षक परिषदेतून आमदारकी जिंकण्यासाठी ही स्तुतीसुमने उधळावी लागणारच! पण, सागर गोरखे आणि त्याच्यासारख्या इतर कैद्यांसाठी कपिल पाटील यांनी इतके अगतिक का व्हावे? तर कपिल पाटील यांनी हे करणे अपेक्षितच होते. त्यांची वैचारिकता आणि लागेबांधे लपलेले नाहीत. आंबेडकरी चळवळ (खोलात गेल्यावर कळते की आंबेडकरांचे नाव घेऊन मार्क्सवाद पसरवणारे) आणि मार्क्सवादी गटाचे समन्वयक साथी म्हणूनच त्यांच्या कंपूतले लोक त्यांना ओळखतात. गेले अनेक वर्षे ते शिक्षक मतदारसंघाचे काम करतात. मात्र, त्यांचे विचार पाहिले की, वाटते, अरे देवा, हे शिक्षकांचे प्रश्न मांडतात? दररोजच्या परिस्थितीबाबत ते मत मांडत असतात. कर्नाटक ‘हिजाब’वादावर या आमदारांचे म्हणणे होते, ’हिजाब’ घातला म्हणून किताब कसं रोखणार? ‘जय श्रीराम’ म्हणत टोळकं त्या मुलीच्या मागे लागले. उद्या ’भारतमाता की जय’ म्हणत ते अंगावर हात टाकतील. आधी दाभोलकर, पानसरे नंतर पुण्यप्रसून आणि निखिल वागळेची नाकेबंदी, शाहरूखच्या मुलाला खोट्या आरोपाखाली अटक, आता किरण मानेना मालिकाबंदी. उद्या ते आपल्या प्रत्येकाच्या दारावर येणार आहेत.” तर उत्तर प्रदेश आणि बॉलीवूड याबाबत त्यांचे म्हणणे आहे की, ’‘योगी के राज में लव्ह जिहाद और मॉब लिचिंग का खौफ हैं बॉलीवूड वहा मुक्त सास लेे पाएगा?” आता या दोन्ही विधानांचा आणि शिक्षकांच्या प्रश्नांचा अर्थोअर्थी तसा काहीच संबंध नाही. असो, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे. शिक्षक परिषदेचा आमदार तळोजा तुरूंगातल्या नक्षली आरोपात कैद असलेल्यांसाठी काम करतो. मात्र, शिक्षकांनी काही बोलायचे नाही. कारण,जातीयता. शाहू, फुले आंबेडकर आणि नावाला छत्रपतींचे नाव तसेच वेळेकाळेला लहुजी वस्ताद आणि अण्णाभाऊ साठेंचे नाव घेतले की झाले. झाली समता! असा समज आजही लोकांच्या मनावर बिंबवला जातो. सेवा दल विचारसरणी ते डावे विचारसणी, कार्यकर्ता पत्रकार, आता राजकारणी झालेले कपिल पाटील हेसुद्धा याला अपवाद नाहीत.
हे सगळे विस्ताराने लिहायचे कारण की, काय सुरू आहे महाराष्ट्रात? कपिल पाटील हे तर केवळ एक वानगीदाखल घेतलेले उदाहरण. दि. ६ जून, २०१८ रोजी आणि त्यानंतरही कोरेगाव-भीमा हिंसेवरून १६ लोकांना अटक झाली. आता त्या घटनेला पाच वर्षे झाली. खटला न्यायालयात सुरू आहे. या खटल्याबाबत पोलिसांनी अनेक साक्षी-पुरावे उभे केले. प्रसारमाध्यमांत जे समोर आले त्यातून असे सूचित झाले की, हे आरोपी नक्षली समर्थक होते. यांना देशात अराजकता माजवायची होती. त्यांच्यामुळेच कोरेगाव-भीमाच्या नावाने हिंसा झाली. खासगी आणि सरकारी मालमत्तेची अगणित हानी झाली. त्यात शेकडो तरूणांवर कारवाई झाली. हे सगळे भरून येणारे आहे. मात्र, सर्वात मोठे नुकसान झाले ते पुरोगामी आणि समतेचा वारसा सांगणार्या महाराष्ट्राच्या अस्मितेचे! समाजात नव्याने तेढ निर्माण झाली. परस्पार संशय निर्माण झाला. संविधानाने एक होऊ पाहणार्या समाजात फूट पाडता येऊ शकते का, याची चाचपणी करण्याचा हा प्रयत्नच होता. यामुळे या गुन्ह्यात अटक असलेल्या सगळ्या दोषींची मानसिकता आणि यापूर्वीच्या त्यांच्या कारवाया हे विचार करण्यासारख्याच आहेत. त्यामुळेच शिक्षक मतदारसंघातील आमदार कपिल पाटील यांनी या उपोषणामध्ये समन्वयकाची भूमिका बजावली, त्यावेळी मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले. अर्थात, याबाबत प्रसारमाध्यमांत फारसे कुठे पडसादही उमटले नाहीत. असो. तसेही केंद्रात भाजप सरकार आल्यापासून स्वतःला ‘रॅडिकल आंबेडकरवादी’ (जे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वत:ला ‘रॅडिकल’ वगैरे कधी म्हंटले आहे का? माझ्या तरी वाचनात आले नाही!) म्हणत काही गट आणि त्या गटातली हाताच्या बोटावर असलेले लोक भलतेच बावरले आहेत. हे ठरावीक लोक आहेत आणि तेच तेच लोक आहेत. त्यांच्या प्रसारमाध्यमांमधील संदेश पाहिले की, वाटते हे लोक गैरसमजुतीतून कधी जागे होणार? अशीच एक पोस्ट एकाने लिहिली की, ”इंदिरा गांधींनी लावलेल्या आणीबाणीविरोधात आवाज उठवणारे तुरूंगात गेले. त्यांना मोदी सरकार पेन्शन दयायची योजना आखते. तसेच, मोदी सरकारच्या विरोधात आवाज उठवणारे आमचे लोक तुरूंगात गेले, तर त्यांना समाजाने सन्मानित करावे. त्यांना भेटण्यासाठी तुरूंगात रांगा लावाव्यात. त्यांच्या सन्मानार्थ शहराच्या चौकाचौकात बॅनर लावावेत, पोस्टर लावावेत, प्रसारमाध्यमांत त्यांचे गुणगाण करावे. समाजात त्यांचे मोठेपण ठसवायला हवे.” मोदी सरकारच्या विरोधात आवाज उठवला म्हणजे काय? खूप मोठे मानवातावादी किंवा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याचे काम झाले का? की मोदी भाजप किंवा रा. स्व. संघाची निंदा केली, तर गरिबाघरची चूल पेटते का? की सर्वसामान्य माणसाला त्यातही हे नक्षली समर्थक सदासर्वकाळ स्वतःलाजे गरिबांचे, बहुजन समाजाचे कर्तेधर्ते समजते, त्या समाजाचे सगळे प्रश्न सुटतात का? पण नाही, यांच्या सगळ्या संदेशामध्ये, बोलण्यामध्ये सध्या एकच आविर्भाव असतो तो म्हणजे मोदींना, संघाला विरोध करा. त्यासाठी त्यांचे शब्दप्रयोगही ठरावीक जसे मनु, पेशवा, गाय गोबर वगैरे... देशद्रोहाच्या कायद्याविरोधात या सगळ्यांचे एकमत. यांना देशद्रोह या कायद्याची भीती का वाटते? खाई त्याला खवखवे आणि चोराच्या मनात चांदणे. त्यामुळेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एका नेत्याने देशद्रोह कायद्याबाबत लिहिले की, “केंद्र सरकारने युएपीए कायदा आणला तोच अत्याचाराच्या विरोधात तोंड उघडणार्यांविरोधात. त्यांना ही तोंड नकोत तर *ड हवी आहे. हवे तेव्हा मारण्यासाठी.” इतक्यावरच भिसे थांबत नाही, तर कोरेगाव-भीमा किंवा तत्सम सदृश्य आरोपांमध्ये तुरूंगात असलेल्या सागर गोरखेला ते प्रेमाने सल्ला देतात, ”दडपशाही विरोधात इतके जण तुरूंगात गेले तर आणखी तू एक. तू लढ आम्ही तुझ्यासोबत आहोत.” या सगळ्यांचे लढणे म्हणजे काय असते? तर शहरी भागातील वस्त्यांमध्ये शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेत नेमके त्यांच्या विचारांचे उलटे विचार तिथे रूजवण्याचा प्रयत्न करायचा. मी प्रथमही भारतीय आहे आणि अंतिमही भारतीय आहे, हा विचार यांच्या तोंडून कधीच निघत नाही.
दलिता रं हल्ला बोल रं
श्रमिका रं हल्ला बोल रं
असे म्हणत ही न्यायव्यवस्था, ही शासन व्यवस्था तुझी नाही, त्याच्यावर हल्लाबोल, असे रंजक पद्धतीने हे लोक भोळ्या-भाबड्या लोकांना सांगतात. त्या गाण्याचा अर्थ कळो ना कळो, पण त्यातला ठेका, ते गाणी गाणारी समाजातलीच तरूण मुलंमुली. यामुळे वस्तीतली किशोरवयीन मुलं त्या गाण्याच्या प्रेमात पडतात. पुढे या भोळ्या-भाबड्या तरूणाईला जाळ्यात खेचण्यास हे सगळे टपलेलेच असतात. कबिरांच्या नावाने आणि समतेच्या नावाने हे सगळे होते, हे विशेष. हेच लोक सध्या समरस झालेल्या समाजात पुन्हा जातीय तणाव निर्माण करण्यरासाठी काय वाट्टेल ते सांगतात. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपण महामानव, थोर पुरूष मानतो, त्या बाबासाहेबांच्या विचारांची, तर अक्षरशः तोडमोड करून त्यातून अतिशय वेगळाच अर्थ काढण्यात ही मंडळी माहीर! या लोकांचे म्हणणे असते की, त्यांना शोषित-वंचित समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यांचे उत्थान करायचे आहे. पण, कसे? यासाठी त्यांच्याकडे एकच उत्तर असते, भाजपला हरवा, मोदींना हरवा, रा. स्व. संघाचा विस्तार रोखा. पेशवाई गाडा, मनुवाद जाळा! याचाच अर्थ जातीअंताची लढाई हे फक्त ढोंग आहे. मुख्य कारण आहे सत्ताप्राप्ती. बरं, सत्ताप्राप्तीसाठी साधन काय तर हिंसात्मक आंदोलन? गरिबांना फसवून त्यांना मोर्चात आणले जाते, ते फसवे मोर्चे? रोजीरोटी आणि उत्कर्षाच्या वेगात जातपात विसरलेल्या जनतेला पुन्हा जातीयतेत ढकलणे? मान्य आहे जातीभेद अजून संपला नाही, ती दरी अजूनही काही प्रमाणात आहे. पण, जर ७० टक्के दरी भरली असेल, तर ३० टक्के दरी भरण्यासाठी काम करायचे की, भरलेल्या ७० टक्के दरीतील समरस समतेवर हल्ला करायचा? अर्थात, इतके जर कळले असते तर यांची चळवळ लोकचळवळ झाली असती. पण, ती लोकचळवळ झाली नाही. याचे कारण हेच की, लोकमानस विध्वसंक हिंसेवर नेेहमीच चालू शकत नाही. पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी सांगितलेल्या एकात्म मानववादातील संकल्पनेनुसार माणसाला परस्पर समन्वय आणि सहकार परस्पर सहभागिता हवी असते. समाजात जातीभेदाचा टोकाचा विद्वेष पसरवणार्या लोकांना लोकमानस कळलाच नाही. त्यामुळेच तर त्यांची ती ‘याला मारा...त्याला उलथवा... जाळा’ वगैरे चळवळ कधीच लोकचळवळ झाली नाही. विषयांतर झाले, तर विषय असा आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय अस्मितेचे मानबिंदू आहेत, हे सगळ्या भारतीयांनी मान्य केले आहे. मात्र, स्वतःला समतेचे कैवारी समजणारे हे लोक हे मान्य करत नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केवळ नवबौद्ध आणि अनुसूचित जातीजमातीच्या समाजघटकांनीच मानावे, असे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या समाजघटकांव्यतिरिक्त खुल्या प्रवर्गातील किंवा अगदी इतर मागासवर्गीयव्यक्तीनेही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जयगान गायलं, तर यांच्यासाठी ते पाप असते. मग ते वस्त्यांमध्ये गीत गातात की, जयभीम म्हणण्याआधी तुमचं रगत तपासा. छे! भयंकर विद्वेष पसरवणारी मानसिकता घेऊन हे लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि आता आता छत्रपती शिवाजी महाराजांचेही नाव घेतात, तेव्हा भयंकर वाईट वाटते. पण, विचार केल्यावर वाटते की, त्यांची ही खेळी आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे महाराष्ट्राचे सर्वेसर्वा आहेत. महाराष्ट्राच्या सर्वधर्मीय तरूणाईला खेचण्यासाठी या दोन नावांचा वापर करण्याशिवाय त्यांना पर्याय नाहीच. समाजासाठी रात्र वैर्याचीच आहे.त्यामुळे समाजजीवनावर परिणाम करणार्या व्यक्ती, प्रसंगांचे अंतरंग ओळखणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधी तळोजा तुरूंगातील नक्षलीसमर्थक आरोपींच्या मागणीपूर्तीसाठी प्रयत्न का करत असेल, यामागचे अंतरंग आणि त्यापलीकडची खेळी ओळखणे देशासाठी, संविधानासाठी आणि समाजासाठी सुद्धा तितकेच गरजेचे आहे. कारण-
‘हम चार दिन रहे ना रहे
तेरा वैभव अमर रहे मॉ’
९५९४९६९६३८