आजचा लेख हा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची ओळख करुन देणारा आहे. ज्यांनी ब्रश हातात घेतला की रंग बोलायला लागतात आणि लेखणी हातात घेतली की कागद बोलायला लागतात, हे दोन्ही माध्यमांचं बोलणं सामाजिक बांधिलकीशी असतं. ज्यांच्या डोक्यात सतत सृजन असते, तर मनात अनेक विचार असतात, भारतीय कलाजगत, भारतीय पत्रकारिता विश्व आणि फिल्म जगतातील अनेक दिग्गज ज्या व्यक्तिमत्त्वाला अगदी जवळून ओळखतात, अशा चित्रकार, पत्रकार जैन कमल यांच्या वादळी कलाप्रवासाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या लेखात करणार आहोत.
मास्टर ऑफ फाईन आर्ट’पर्यंत कलाशिक्षण घेतलेल्या जैन कमल यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या याच सदरातील एका कलाकारावरील लेख वाचला. त्या लेखाबद्दलचा अभिप्राय देण्याचा मोह त्यांना आवरला नाही. त्यांनी फोन केला. ओघाने मीही त्यांच्याबद्दल माहिती विचारली. त्यांनी काही ‘लिंक्स’, फोटोज् आणि त्यांचा ‘बायोडाटा’ पाठवला. मी थक्क झालो. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या ज्या देशांना भेटी दिल्या आहेत, त्या त्या देशांनी त्या देशाचे प्रमुख आणि आपले पंतप्रधान यांच्या भेटीचे टपाल तिकीट काढलेले आहे. अशा सर्व टपाल तिकिटांच्या अस्सल प्रतींचा संग्रह जेव्हा पंतप्रधान यांचे निकटवर्ती विनय सहस्रबुद्धे यांनी पाहिला, तेव्हा तेव्हा ते अवाक् झाले. लाखो रुपये खर्च करून या अवलियाने हा संग्रह जतन केला आहे. “माझ्यातील कलाकार, माझ्यातील पत्रकार आणि सामाजिकतेची परिमाणं जपणारा माझ्यातील भारतीय नागरिक सजग असल्यामुळे मी हे करू शकलो,” असे जैन कमल यांनी सांगितले, तेव्हा त्यांच्या चेहर्यावरील आनंद आणि समाधान ते लपवू शकले नाहीत.
अशा अवलियाला व्हॉट्सअॅपवर भेटण्यापेक्षा प्रत्यक्षात भेटण्याचा माझा निर्णय किती योग्य होता, हे मला त्यांच्या भाईंदरच्या घरी गेलो तेव्हा प्रत्ययास आले. त्यांनी ‘एक फकीर से दुसरा फकीर’ या विचारांवर आधारित पेंटिंग केले आहेत. ‘सबको सन्मति दे भगवान’ सांगून आजही अजरामर आहे, तर दुसरा फकीर ‘सबका साथ सबका विकास’ या विचाराने सार्या हिंदुस्थानालाच नाही, तर जगाला विकासात्मकतेचा संदेश देऊन एकत्र येण्याचा मंत्र देत आहेत. या ‘थीम’वरील जैन कमल यांची कलाकृती ही थक्क करणारी आहे.
चित्रकार जैन कमल यांचे कला शिक्षण ‘पटना आर्ट कॉलेज’, ‘बनारस हिंदू विश्वविद्यालय’ आणि ‘महाराजा शिवाजी राव विश्वविद्यालय, बडोदा’ या ठिकाणी पूर्ण झाले. ‘नवे ते मज नित्य हवे’ या विचाराचे जैन कमल यांचं कलाविषयक आकलन आणि सादरीकरण हे विलक्षण आहे. ब्राह्मी लिपी शिकण्यासाठी त्यांना प. पू. आचार्य सुनील सागरजी यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. चार वर्षे अथक मेहनत घेऊन त्यांना ‘णमोकार मंत्र’ला जे ब्राह्मी लिपीतील आहेत, त्यांना संगणकावर आणले. गेल्या ४५ वर्षांत त्यांनी राष्ट्रीय स्तरांवरील सुमारे ६० हून अधिक नियतकालिकांच्या ‘डिझायनिंग’सह जणू पुनर्निर्माणच केलेले आहे. ‘सेन्सॉर बोर्ड इन्फर्मेशन आणि ब्रॉडकास्टिंग’ मंत्रालयात भारत सरकारचे दहा वर्षे ज्युरी होते.
लाखो बीजाक्षरांचा समावेश करून त्यांनी एक अफलातून तंत्र विकसित करून ‘पेंटिंग शृंखला’ साकारली आहे. ‘टायपोग्राफी’ आणि ‘कॅलिग्राफी’मध्ये त्यांची संशोधनात्मक उपक्रमांची मालिका आशियाई देशांतील कलाकारांमध्ये लोकप्रिय झालेली आहे. संगणकीय तंत्रज्ञानावरील आवश्यक सॉफ्टवेअर्सची आणि कलाविषयक तंत्रांची माहिती घेऊन त्यांनी साकारलेल्या कलाकृती वेगळ्याच आध्यात्मिक क्षेत्रात घेऊन जातात.
त्यांच्या कलाकृतींमध्ये पारंपरिक सौंदर्याबरोबरच तांत्रिकतेतील आधुनिकेतचा समन्वय पाहायला मिळतो. नेत्रसुख, प्राण आणि आत्मा यांच्याशी एकात्मता आणि कमालीची तृप्तता देणार्या त्यांच्या कलाकृती जगभर व्यापल्या आहेत. धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विचारांना वाटून नेण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांच्या कलाकृती करतात.‘णमोकार’ पेंटिंग शृंखलेने तर असंख्य कलारसिकांना अक्षरश: भारावून टाकले आहे.
सतत कामात, कलासृजनात झपाटल्याप्रमाणे काम करणारे चित्रकार जैन कमल हे रंगरेषांचे जादूगार तर आहेतच. परंतु, त्यांच्याकडील शब्दसाठा आणि अचूक शब्दफेक ऐकल्यानंतर ते प्रचलित साहित्यिकांपेक्षा कुठेही कमी नाहीत, असे म्हणता येईल. पुण्याच्या आनंद गांधी यांनी त्यांच्या पेन आणि ब्रशवर लिहिताना म्हटलेले आहे की, “वृत्तपत्रसृष्टी हा खरेतर रुक्ष प्रांत. येथील विषयही दाहक क्वचितप्रसंगी अंगावर येणारे आणि काहीवेळा हादरवणारेही. मात्र, तेथे काही विरंगुळ्याची स्थळेही असतात. ती स्थळे रुक्ष असून चालत नाहीत, तर त्यांना प्रसन्नताही प्रदान केली जावी लागते. हे हेरणे चाणाक्ष व्यक्तीचे काम असते. जैन कमल यांचे या जगाकडे लक्ष जाते आणि काळ्या शाईच्या पांढर्या कागदावर सौंदर्यस्थळं विकसित करणे हे त्यामुळेच ते साध्य करु शकले,” या विधानावरुन त्यांच्या कामाची व्याप्ती ध्यानात येते.
चित्रकार जैन कमल यांची अक्षर साधनादेखील अद्भुत आहे. तथ्यांना मूर्त स्वरुपात आणण्यासाठी ‘अक्षराकृतीं’चे फार मोठे योगदान जैन कमल यांनी दिले आहे. त्यांच्या जिज्ञासू वृत्तीमुळे त्यांनी कलेच्या बर्याच माध्यमातून लिलया मुशाफिरी केली आहे. त्यांनी स्वतः मिळविलेला अनुभव समृद्ध करीत असतानाच तरुणपिढीलाही त्या अनुभवाचा लाभ व्हावा, यासाठी त्यांनी कार्यशाळा घेऊन बर्याच कला महाविद्यालये आणि कला संस्थांना बरीच वर्षं मार्गदर्शन केलेले आहे. कला, आध्यात्मिकता आणि कर्तव्यदक्षता या त्रिगुणांचा संगमच त्यांच्या आविष्कारामध्ये आणि व्यक्तिमत्त्वामध्ये झालेला दिसून येतो.
अनेक पुरस्कार, अनेक प्रदर्शने (एकल वा समूह) आणि अनेक कार्यशाळा यांची यादी फार मोठी आहे. जी चित्रकार जैन कमल यांना जोडली गेलेली आहे. त्यांचा कथा प्रवास आणि कलम प्रवास अद्भुत आणि थक्क करणारा आहे. त्यांच्या पुढील कला प्रवासाला आमच्या शुभेच्छा.