मुंबई (प्रतिनिधी): नैऋत्य मान्सून दरवर्षीपेक्षा एक आठवडा आधीच महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मंगळवार दि. ३१ रोजी सांगितले. दक्षिण कोकण भागात आणि कोल्हापूरमध्ये मान्सून सुरू होण्याची सामान्य तारीख दि. 9 जून आहे. मात्र, यंदा तो एक आठवड्यापूर्वीच येण्याची शक्यता आहे.
मान्सून केरळमध्ये दि. २९ मे रोजी दाखल झाला. तर, सोमवार दि ३० आणि मंगळवार दि ३१ रोजी नैऋत्य मोसमी पाऊस केरळच्या काही भागात, तामिळनाडूमध्ये पुढे सरकला. तसेच लक्षद्वीप आणि अरबी समुद्राच्या काही भागात पुढे सरकला. महाराष्ट्रात मार्च ते मे दरम्यान सरासरीपेक्षा ६६ टक्के कमी पाऊस झाला. आता लवकर येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आयएमडीचा दुसर्या टप्प्यातील लांब पल्ल्याचा अंदाज मंगळवार दि. ३१ रोजी जारी करण्यात आला.
महाराष्ट्रात, जून-सप्टेंबर या हंगामात, 'दीर्घ कालावधीच्या सरासरी'च्या 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. कर्नाटक, तामिळनाडू, ईशान्य भारत, गंगेच्या पश्चिम बंगाल, गोवा आणि कोकणातील काही भागांमध्ये येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सूनच्या प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल आहे, असे हवामान खात्याने सांगितले आहे.