बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजे ‘लॉकडाऊन’च्या काळामध्ये एका दिवशी कॅम्पमध्ये नेहमीच्या ठिकाणी जात होतो. फोनवरील बोलणं संपवून मी निघणार, इतक्यात ‘पार्क’ केलेल्या दोन गाड्यांच्या जागेमध्ये एक माणूस पडलेला मला दिसला.
बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजे ‘लॉकडाऊन’च्या काळामध्ये एका दिवशी कॅम्पमध्ये नेहमीच्या ठिकाणी जात होतो. फोनवरील बोलणं संपवून मी निघणार, इतक्यात ‘पार्क’ केलेल्या दोन गाड्यांच्या जागेमध्ये एक माणूस पडलेला मला दिसला. तो कसाबसा सरपटत आला आणि माझ्या बुटावर त्याने डोके ठेवले. रडत तो म्हणाला, “मला मरण हवंय सर...!” माणसं जगणं मागतात, स्वतःला जगवण्यासाठी इतरांना मारतात. हा मात्र, स्वतःसाठी मरण मागत होता. याची उंची साधारण पाच फूट असावी. परंतु, वजन मात्र १५ ते १७ किलो असावं. त्याची कातडी फाडून स्टीलचा एक रॉड बाहेर आला होता.
कोल्हापूर जिल्ह्यामधील याचं एक खेडेगाव. आई-वडील दोघेही अंध आणि वृद्ध. नशीब आजमवायला हा पुण्यात आला. नोकरी करू लागला. यानंतर रस्त्यावर त्याचा अपघात झाला. शासकीय रुग्णालयाने शस्त्रक्रिया करून त्याच्या पायात रॉड टाकून दिला आणि याला ‘डिस्चार्ज’ केलं, पण होती ती नोकरी गेली, शेवटी रस्त्यावर आला. वृद्ध, अंध आई-वडिलांना कोणीतरी बातमी कळवली, ‘अॅक्सिडेंट’मध्ये तो ठार झाला. बिचार्या आईवडिलांनी त्याचा दहावासुद्धा घातला. दोन वर्षे हा रस्त्यावर या अखंड वेदना घेऊन फिरत होता. मला भेटलेल्या दिवशी, लगेचच त्याला अॅडमिट केले. त्याचे कमरेपासून खाली असणार्या दोन्ही पायांचे तुकडे झाले होते.
सर्व तुकडे या वर्षभरात आम्ही जुळवले आहेत. कधीही उभा राहू न शकणारा तो, आज ‘वॉकर’च्या साहाय्याने उभा आहे. आता याला घेऊन जा आणि दोन महिन्यानंतर पुन्हा घेऊन या असे डॉक्टर म्हणाले. शेवटचे एक ऑपरेशन झाले की, हा स्वतः चालायला लागेल. खरं आहे, पण याला दोन महिने मी ठेवू कुठे ? पुन्हा रस्त्यावर ? की त्या ‘पार्क’ केलेल्या दोन गाड्यांच्या फटीमध्ये? मधल्या काळात मी याच्या वडिलांशी फोनवर संपर्क साधला. आपला मुलगा बोलतोय, असे समजून तो भोळा अंध बाप माझ्याशी बोलत राहिला. ‘’आरं तू जित्ता हाईस? खरंच का मर्दा तू जित्ता हाईस?’ त्यांचा विश्वासच बसत नव्हता. मी म्हणालो, ‘’व्हय पप्पा मी जित्ता हाय. मी घरला येणार हाय. दोन म्हैने मला टायम द्या. तवर दोगं बी मरू नगा बरं का !” “ये लवकर घरला ये. मंग, तू आल्यावर आपून खीर करून खाऊ, तुला आवडती तशी.” तो म्हणाला, “काय म्हनले पप्पा?” मी म्हणालो , ’दोन म्हैन्यानंतर आपल्याला पप्पांनी खीर खायाला बोलावलं हाय.” यानंतर माझा शर्ट ओढून तो धाय मोकलून रडायला लागला होता. थोडा वेळ मग मीच त्याचा पप्पा झालो.
असे आणखी तीन वृद्ध आजोबा भेटले, या तिघांची सोय कुठे करावी या विचारात असतानाच एके दिवशी सामाजिक क्षेत्रातली माझी मानलेली बहीण गौरीताई धुमाळ यांचा कामानिमित्त फोन आला. गौरी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पौड पुणे येथे वृद्धाश्रम चालवते. तिला विचारलं, ‘’तीन आजोबांना तुझ्याकडे आश्रय देशील का?” क्षणाचाही विलंब न लावता ती म्हणाली, ‘’तीन काय ३०० बाबा पाठव माझ्याकडे अभिदादा‘. मुलीला बाप जड नसतो. म्हातारे आई-बाप ही ओझी नसतात. आपली जबाबदारी असते, हे मी तुझ्याकडूनच शिकले ना दादा?” तिला मनोमन नमस्कार करुन दि. २१ मे रोजी तिघांचीही व्यवस्था आम्ही गौरीताईकडे केली आहे. माझ्या सहकार्यांच्या सहकार्याने मी हे करू शकतो. अन्यथा माझी एकट्याची कोणतीही पात्रता नाही. शेवटी काय, तर ‘सर्व सन्तु सुखिन:।’
- डॉ. अभिजित सोनावणे