नवी दिल्ली : शाहीनबागेत सुरु झालेल्या बुलडोझर कारवाईस स्थानिकांचा जोरदार विरोध बघायला मिळत आहेत. दक्षिण दिल्ली महानगरपालिकेकडून ही कारवाई सुरु करण्यात आली आहे. या कारवाईला होणाऱ्या नागरिकांच्या विरोधामुळे या कारवाईस पोलिसांकडून संरक्षण देण्यात आले आहे. नागरिकांनी रस्त्यावर उतरून या होणाऱ्या कारवाईस विरोध केला आहे. शाहीनबाग परिसर हा नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात मुस्लिम महिलांनी केलेल्या आंदोलनापासून गाजत आहे.
एप्रिल महिन्यात हनुमान जयंतीच्या दिवशी जहांगीरपुरीमध्ये उसळलेल्या हिंसाचारांनंतर अवैध बांधकामांवर कारवायांना वेग आला आहे. जहांगीरपुरी मध्ये या कारवाईच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. तशीच याचिका आता शाहीनबाग कारवाईच्या विरोधात सुद्धा करण्यात आली आहे. अवैध बांधकामाविरोधातील ही मोहीम अजून पुढचे पाच दिवस चालणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.