नवी दिल्ली : दिव्यांग मुलाला रांची विमानतळावर कुटुंबासह विमानामध्ये चढू न देण्याबाबत देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोमवारी इंडिगो एअरलाइन्सला चांगलेच फटकारले आहे. विमान प्रवाशांशी अशाप्रकारे गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही, या प्रकरणाची मी स्वतः चौकशी करत आहे, त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल," असा इशारा त्यांनी दिला आहे.
'एव्हिएशन रेग्युलेटर डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन'द्वारे (DGCA) इंडिगोला संपूर्ण घटनेचा अहवाल देण्यास सांगितले आहे. या संपूर्ण घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर ही कारवाई करण्यात आली. इंडिगोने एका निवेदनात म्हटले आहे की, संबंधित मुलामुळे इतर प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. "सर्वसमावेशक" असण्यात अभिमान वाटतो आणि भेदभावपूर्ण वर्तनाच्या सूचनांचे खंडन केले यावर जोर देण्यात आला.