प्राण गेला तरी बेहत्तर, शत्रूपुढे झुकणार नाही

    08-May-2022
Total Views |

haldighati
 
 
 
‘मोडेन पण वाकणार नाही’ हा बाणा जीवनभर जपून, महाराणा प्रतापांनी अकबराचे मांडलिकत्व कधीच पत्करलं नाही. सरदार मानसिंहसह अनेक सरदार हे महाराणा प्रताप यांच्याशी बोलणी करण्यासाठी अकबराने पाठविले. परंतु, सर्वच जण आल्या वाटेनं खाली हात परतले. अशा अकबरालाही धडकी भरवणार्‍या महाराणा प्रताप यांचा जन्म ९ मे, १५४० रोजी कुंभलगड येथे झाला अन् हिंदुत्वाचा रक्षणकर्ता, क्रांतिसूर्यच जणू उदयास आला.
  
 
 
मेवाडचे राजा क्रांतिसूर्य महाराणा प्रतापसिंह सिसोदिया म्हणजे वीरता, त्याग, धैर्य, बलिदान, चारित्र्यशीलता, राष्ट्रभक्ती, देशाभिमान याचं मूर्तिमंत प्रतीक होय. अशा महापराक्रमी व अपराजित राजाचा जन्म सिसोदिया राजवंशात ९ मे, १५४० रोजी कुंभलगड येथे झाला अन् हिंदुत्वाचा रक्षणकर्ता, क्रांतिसूर्यच जणू उदयास आला. महाराणा प्रतापसिंह यांच्या पिताश्रीचे नाव राणा उदयसिंह अन् मातोश्रीचे महाराणी जयवंता कुंवर हे होते. बाप्पा रावल, राणा खुमानसिंह, समरसिंह, राणा संग, राणा कुंभ, उदयसिंह यांचा वैभवशाली व शौर्याचा वारसा महाराणा प्रतापांनी जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत जपला. म्हणूनच ते क्रांतिसूर्य म्हणवले गेले. त्यांचा राज्याभिषेक गोगुंदा येथे संपन्न झाला. मेवाडच्या राजांचे आराध्य दैवत एकलिंग महादेव असून, हे मंदिर राणा बाप्पा रावल यांनी उदयपूर येथे आठव्या शतकात उभारले. मेवाड व चितोड म्हणजेच अखंड राजपुताना अकबर बादशहाच्या हुकूमतपासून सुरक्षित ठेवण्यासाठी राणा प्रतापांनी आपलं सारं आयुष्य पणाला लावलं.
 
 
 
 
 
 
‘प्राण गेला तरी बेहत्तर, पण कोणा शत्रूपुढे झुकणार नाही’ हे त्यांचे जीवनध्येय होते. पारतंत्र्याच्या साखरभातापेक्षा, मला माझ्या स्वातंत्र्यातली मीठभाकरी, कंदमुळे प्रिय आहेत. जंगलात वास्तव्याला असताना कोणाचीही लाचारी न पत्करता, घासाच्या बियांची भाकरी करून ते खात असत. दरम्यान, आपल्या कुटुंबीयांसाठी त्यांनी कोणापुढे हात पसरले नाहीत. यालाच खर्‍या अर्थाने स्वाभिमानी बाणा जपणं म्हणतात. यास्तव महाराणा प्रताप यांना जयंती दिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा!
 
 
 
अकबर बादशहाच्या तुलनेत सैन्यबळ व युद्धसामग्री अत्यल्प असूनही महाराणा प्रताप हे १५७६ ते १५८६ या दशकात मोगल सैन्याशी प्राणपणाने लढले. हळदीघाट अन् खमनौरच्या युद्धांत भिल्ल धनुष्यधारींच्या साहाय्याने अकबर बादशाह व त्याच्या सैन्याला जेरीस आणून त्यांना रणांगणातून माघारी जाण्यास भाग पाडलं. या युद्धादरम्यान भिल्ल समाजाच्या सैनिकांनी राणा प्रतापांना मोलाची मदत केली. पहाडी क्षेत्रात युद्ध करण्याचे तंत्र केवळ भिल्लांनाच माहीत असल्याने त्यांनी पहाडी युद्धतंत्राबाबत अनभिज्ञ असलेल्या मोगल सैनिकांना रणांगणावरून सळो की पळो करून सोडलं. वास्तवात 16व्या शतकातही गनिमी कावा या युद्धतंत्राचा प्रयोग केला होता की काय, असे जाणवते.
 
 
 
 
या युद्धादरम्यान पाठीमागून वार करणार्‍या एका मोगल सरदारावर राणा प्रतापांनी अशा शिताफीने तलवारीचा प्रतिवार केला की, त्या सरदाराचे मुंडके अन् त्याच्या घोड्याचे मुंडके एकाच वेळी धडापासून वेगळे होऊन जमिनीवर पडले. यावरून हे दृष्टोत्पत्तीस येते की, राणा प्रताप यांच्या तलवारीच्या एका वारामध्ये किती प्रबळ शक्ती होती. राणा प्रतापांनी आपल्या राजचिन्हावर एका बाजूला राजपूत सैनिकाची, तर दुसर्‍या बाजूला भिल्ल सैनिकाची प्रतिमा कोरली आहे. वास्तवात हे बंधुत्वाचे प्रतीक आहे. यावरून महाराणा प्रतापांची भिल्ल समाजाप्रति असलेली कृतज्ञतेची भावना दृष्टोत्पत्तीस येते.
 
 
 
शतकानुशतके भारतीयांच्या हृदयात मानाचं स्थान ग्रहण करणार्‍या महाराणा प्रतापसिंह सिसोदिया यांनी एक शपथ घेतली होती की, मी बाप्पा रावल यांचा वंशज. माझ्या मातृभूमीला शत्रूपासून मुक्त केल्याशिवाय मी महालात राहणार नाही. सोन्या-चांदीच्या ताटात भोजन करणार नाही. राजमहालाच्या शयनगृहात झोपणार नाही, तर वृक्षांची छाया हाच माझा महाल, गवत हाच माझा बिछाना अन् झाडांची पानं हीच माझी भोजनाची भांडी राहतील. खरंतर, राणा प्रतापांचे भारदस्त व्यक्तिमत्त्व कोणाच्याही मनाला भावणारं होतं. उंच शरीरयष्टी (साडेसात फूट) श्वेतवर्ण, भेदक डोळे, लांब मिशा, पिळदार भुजा अन् निधडी छाती अशी त्यांची बलदंड देहयष्टी होती. युद्धाच्या वेळी त्यांच्या अंगावर चिलखत तसेच भाला, तलवार आदी युद्ध साहित्याचे वजन सुमारे २०८ किलो असायचे.
 
 
 
 
 
यावरून त्यांच्या शारीरिक बळाचा अंदाज येतो. हे अवाढव्य रूप पाहिल्याने अकबर बादशहाने आपल्या जीवनात कधीही राणा प्रतापांसमोर युद्ध करण्याचे धाडस दाखविले नाही. त्यांच्या जागी अकबर बादशाह नेहमी मोगल सरदार राजा मानसिंह किंवा पुत्र सलीम (जहांगीर) यांना युद्धभूमीवर महाराणासमोर उभा करायचा. मात्र, स्वतः कधीच महाराणांसमोर थेट युद्ध करण्यास उभे ठाकले नाहीत. यावरून हे सिद्ध होते की, अकबर बादशहाच्या मनात राणा प्रतापांबद्दल केवढं मोठं भय होतं. हा तर खरा करिश्मा होता राणा प्रतापांच्या युद्धकौशल्याचा!
 
 
या युद्धात राणा प्रतापांचे अंगरक्षक हकीमखां सूर आणि जालौरचा ताजखां या मुस्लीम सरदारांनी, तर चूनावत कृष्ण दास, झाला मानसिंह, झाला बिजा, राणा पुंजा भिल, भीमसिंह रावत सांगा, रामदास, भामाशाह ताराचंद, रामशाह व त्यांचे सुपुत्र शालिवाहन, भगवानसिंह, प्रतापसिंह आदी शूरवीर योद्ध्यांनी मोलाची कामगिरी केली.दरम्यान, राणा भामाशाह यांनी राणा प्रतापांना पडतीच्या काळात सैन्य दलाची नव्याने उभारणी करण्यासाठी अन् राष्ट्ररक्षणार्थ आपली संपूर्ण संपत्ती अर्पण केली. यावरून भामाशाहचे औदार्य अन् निस्सीम राष्ट्रप्रेम दृष्टोत्पत्तीस येते.
 
 
राणा प्रताप व त्यांच्या कुटुंबीयांचे रानावनात वास्तव्य असताना भिल्ल वनवासींनी त्यांचे जागोजागी स्वागत करून त्यांच्या राहण्याची-भोजनाची व्यवस्था केली. त्यांच्या कुटुंबीयांसाठी रात्रंदिवस पहारा देत डोळ्यात तेल घालून शत्रूपक्षापासून रक्षण केलं. महत्त्वाचे म्हणजे राणा प्रतापांना युद्धाच्या वेळी पावलोपावली मदतीचा हात दिला. उल्लेखनीय म्हणजे, महाराणा प्रतापांचा धारदार भाला, राजपुतांची तळपती तलवार अन् भिल्ल शिकारींच्या तीरकामट्यांच्या वर्षावाने मोगल सैनिकांची रणभूमीवर दाणादाण उडाली. खरंतर, राणा प्रतापांना त्यांच्या संक्रमण काळात भिल्ल समाजाने निष्ठापूर्वक अन् सेवाभावीवृत्तीने सर्वतोपरी मदत केल्याची इतिहासात नोंद घेतल्याचे निदर्शनास येते. यासाठीच मेवाडच्या राजचिन्हावर भिल्ल व राजपूत सैनिकाची प्रतिमा कोरून दोन्ही समाजातल्या बंधुत्वाचं प्रतीक प्रतिबिंबित केलं, याला मेवाड-चितोडचा इतिहास साक्षीदार आहे.
 
 
 
हळदीघाट व अन्य युद्धात संपादन केलेल्या विजयात राणांच्या ‘चेतक’ अश्वाचादेखील मोलाचा वाटा राहिला. रणांगणावर संकटसमयी स्वतःचा जीव धोक्यात टाकून धन्याचे प्राण वाचविणार्‍या ‘चेतक’ची स्वामिनिष्ठा अतुलनीय व अवर्णनीय आहे. म्हणूनच राणा प्रताप हे ‘चेतक’ला आपल्या गळ्याचे ताईत मानत असत. स्वतः जखमी अवस्थेत असूनही ६० फूट लांबीच्या नाल्यावरून उडी मारून धन्याचे प्राण वाचविण्याची महान कामगिरी ‘चेतक’ने केली. कृतज्ञतेच्या भावनेतून राणा प्रतापांनी ‘चेतक’चे जारोळ येथे स्मृतीस्मारक उभारले. ‘चेतक’ची धन्याबद्दलची अपार निष्ठा, निस्सीम भक्ती तसेच त्याच्या असामान्य पराक्रमाची नोंद भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली. गेल्या कालखंडात ‘चेतक’च्या शौर्य, धाडस अन् स्वामिनिष्ठेवर अनेक ग्रंथ लिहिले गेलेत. हीच खरी त्याच्या बलिदानाची पावती होय.
 
 
 
 
 
 
एक प्राणी असून ‘चेतक’ हा स्वामिनिष्ठा राखू शकतो, पण मानसिंह हा मनुष्य असूनही स्वामिनिष्ठा राखू शकत नाही, यापेक्षा मोठं दुर्दैव काय! राजगादीच्या आमिषापोटी राजपुतांचा त्याग करून अकबराचं मांडलिकत्व पत्करलं, त्या गद्दार मानसिंहच्या सोबत पंगतीत कोणीही मेवाडच्या नागरिकानं बसू नये, असे फर्मानच राणा प्रतापांनी काढले होते. गद्दार व विश्वासघातकी माणसांबद्दल राणा प्रतापांना भयंकर चिड होती, हे यावरून प्रत्ययास येते. राणा प्रतापांना स्त्रियांबद्दल नितांत आदरभाव होता. युद्धामध्ये ताब्यात घेतलेल्या शत्रूपक्षाच्या माता-भगिनींना त्यांनी सन्मानपूर्वक त्यांच्या राज्यात पोहोचविले. स्त्रीसन्मान या भारतीय परंपरेच्या पैलूचा त्यांनी मान राखला, हे सिद्धीस येते.
 
 
 
मेवाडचे महाराणा प्रतापसिंह यांच्या शौर्यगाथेबद्दल आपल्या ‘भारताचा शोध’ या कादंबरीत पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात, “राणा प्रताप हे संकटाचे स्वागत करणारे योद्धे होते. म्हणून जोपर्यंत पृथ्वीवर वीरांची पूजा होत राहील, तोपर्यंत राणा प्रतापांचं चिरस्मरण लोकांना राष्ट्रप्रेम व देशाभिमानाचे धडे देत राहील.”‘मोडेन पण वाकणार नाही’ हा बाणा जीवनभर जपून, राणा प्रतापांनी अकबराचे मांडलिकत्व कधीच पत्करलं नाही. सरदार मानसिंहसह अनेक सरदार हे महाराणा प्रताप यांच्याशी बोलणी करण्यासाठी अकबराने पाठविले. परंतु, सर्वच जण आल्या वाटेनं खाली हात परतले. अर्ध राज्य देण्याचं आमिष अकबराने दाखवूनही महाराणा तसूभरही विचलित झाले नाहीत. वास्तवात यालाच म्हणतात, खरा आत्मसन्मान अन् राष्ट्राभिमान!
 
 
 
महाराणा प्रताप एके दिवशी शिकारीला गेले असताना झालेल्या दुर्घटनेत जबर जखमी झाले.त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडतच गेली. परिणामी त्यांचे ९ मे, १५९७ रोजी चावंड येथे दुःखद निधन झालं अन् भारतमाता एका राष्ट्रप्रेमी शूर योद्ध्याला कायमची मुकली. राणा प्रतापांच्या निधनाची खबर जेव्हा अकबर बादशहाच्या कानी पडली, त्या क्षणीच तो ताडकन सिंहासनावरून उठला अन् निःशब्द होऊन उभा राहिला. त्या दुःखद घडीला त्याचे डोळे पाणावले होते. अकबर बादशहा आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाला, “मेवाडचा राजा महाराणा प्रताप हा अपराजित राजा होता. तो आयुष्यात कोणापुढे झुकला नाही. अशा शूरवीर योद्ध्याला मी सलाम करतो.”ज्याच्या शौर्यगाथेची मित्रांसह शत्रूनेदेखील स्तुती केली, अशा महापराक्रमी क्रांतिसूर्य महाराणा प्रतापसिंह सिसोदिया यांना मी त्रिवार वंदन करतो.जय राजपुतांना!
 
- रणवीरसिंह राजपूत