बहुआयामी व्यक्तिमत्त्व : डॉ. योगेश जोशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2022   
Total Views |

yogesh
 
 
 
अनेक नावीन्यपूर्ण संकल्पना मांडून त्या तितक्याच ताकदीने यशस्वी करण्याचे काम डॉ. योगेश विजय जोशी करीत आहे. त्यांनी कोणकोणत्या संकल्पना प्रत्यक्षात उतरविल्या आहेत यावर टाकलेला प्रकाश.
 
 
 
 
 
जोशी यांनी ‘वाचन प्रेरणा दिना’निमित्ताने एकाच दिवसामध्ये ११,१११ पुस्तकांचे विनामूल्य वाटप, सलग ८५ तास १,१०० कवींना घेऊन मांडलेला कवितेचा जागर, मुलांना वाचनप्रवृत्त करण्यासाठी राबविलेले २५ उपक्रम आणि प्रत्येक उपक्रमात किमान पाच हजार विद्यार्थ्यांचा सहभाग, अधिक महिन्याच्या निमित्ताने ३३ सामाजिक संस्थांना वाण असे एक ना अनेक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवल्या आहेत.
 
 
 
 
१० मे, १९७२ रोजी योगेश जोशी यांचा जन्म झाला. वयाच्या अकराव्या वर्षापासून योगेश यांनी कविता, लेख, कथा लेखनास सुरुवात केली. स्थानिक वृत्तपत्रांतून विविध विषयांवर लेखन व सदरे शालेय जीवनापासून प्रसिद्ध झाली. लहानपणापासून ‘किशोर’, ‘चांदोबा’, ‘चंपक’, ‘लोकप्रभा’ बालसाहित्य विशेषांक आदी मासिकांमधून सातत्याने लेख, तर ‘टॉनिक’, ‘आनंद’, ‘ठकठक’ या मासिकांमधून विविध विषयांवर सदरे व विविध विषयांवरील पुरवणी विशेषांकाचे संपादन त्यांनी केले आहे. ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’च्या अनुदान योजनेतून त्यांचा ’टिल्लू-पिल्लू’ हा बालकविता संग्रह महाविद्यालयीन जीवनात प्रकाशित झाला. त्यानंतर ‘अक्षरमंच’, ‘अक्षरशिल्प’, ‘यशवंतांचे अंतरंग’, ‘व्याकरण झाले सोपे’, ‘विवेकानंद संस्कार कथा’, ‘कौन बनेगा ज्ञानपती’, ‘कहाणी एका मिसाईल मॅनची’, ‘व्यक्तिमत्त्व विकासाची ३६५ सूत्रे’ आदी विषयांवर त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘अक्षरमंच प्रकाशना’चे समन्वयक म्हणून ते कार्यरत आहेत.
 
 
 
 
 
 
स्वतः ‘एमबीए’व्यवस्थापन क्षेत्रातील पदवीधर असलेले योगेश जोशी यांनी देश-विदेशात १०० हून अधिक उपक्रमांचे व कार्यक्रमांचे व्यवस्थापन निमंत्रक व स्वागताध्यक्ष या नात्याने केले आहे. शिक्षक साहित्य संमेलन, बालसाहित्य संमेलन आदी उपक्रमांचे आयोजन ते सातत्याने करीत असतात. ’बालजल्लोष’ या उपक्रमाअंतर्गत मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी मुलांच्या उपजत गुणांना त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ‘सारेगमप लिटील चॅम्प्स’मधील बालगायक, विविध नाट्यअभिनेते, जादूगार, गायक, लेखक, चित्रकार कलाकारांचा सहभाग असलेल्या या उपक्रमात प्रत्येक वेळी एक हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी होत असतात. ‘लॉकडाऊन’मध्येही या उपक्रमात खंड पडला नाही. १ मे ते ३१ मे असे सलग ३१ दिवस ऑनलाईन पोर्टल विशेषांक प्रकाशित करण्यात आले होते.
 
 
 
सेवानिवृत्त होणार्‍या शिक्षकांच्या सत्कार समारंभात व षष्ट्यब्दीनिमित्त ग्रंथतुलेचे आयोजन करून पुस्तकांचे विनामूल्य वाटप, रक्षाबंधनाच्या निमित्ताने वनवासी पाड्यांवर रक्षाबंधन आयोजित करून त्यांना धान्य वाटप, आवश्यक वस्तूंचे वाटप, कोरोना काळात हजारो भावांचे रक्षण करणार्‍या सिस्टर-(नर्स) डॉक्टर यांच्यासोबत रक्षाबंधन, विविध वनवासी पाड्यांवर दीपावली साजरी करणे, मिठाई व फराळाचे साहित्य यांचे वाटप करणे आदी अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन त्यांनी केले आहे. अधिकमासात जावयाला ३३ वस्तू भेट देण्याची परंपरा आहे. पण कोरोना काळात आलेल्या अधिक मासात त्यांनी ३३ सामाजिक संस्थांना ३,३३३ वस्तूंचे वाटप आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था व ‘मथुराई संतोष सामाजिक संस्था’ यांच्यावतीने केले होते. ठाणे येथील ‘संकल्प इंग्लिश स्कूल’मध्ये दि. १८ एप्रिल ते २१ एप्रिल, २०१९ सलग ८५ तास ‘पोएट्री मॅरेथॉन’ या उपक्रमाचे आयोजन त्यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. यामध्ये १,१०० कवींनी अखंड काव्यज्योत तेवत ठेवली होती. या ‘पोएट्री मॅरेथॉन’ची दखल ५० वृत्तपत्रे, २० न्यूज चॅनेल आणि दहा ‘रेकॉर्ड बुक्स’नी घेतली. देश-विदेशातील अनेक नामवंत कवी या उपक्रमात सहभागी झाले होते.
 
 
 
योगेश जोशी उत्तम निवेदक असून मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन त्यांनी केले आहे. विविध मान्यवर संस्था आणि नामवंतांच्या कार्यक्रमात त्यांनी सूत्रसंचालन करून कार्यक्रमास रंगत आणली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, समाज सेवाव्रती प्रकाश बाबा आमटे, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री निशिगंधा वाड, अभिनेते मोहन जोशी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी अनेक नामवंतांनी त्यांच्या सूत्रसंचालनाचे कौतुक केले आहे. ‘लॉकडाऊन’पूर्वी सलग तीन वर्षे सिंगापूर, मॉरिशस, थायलंड येथील आंतरराष्ट्रीय कार्यक्रमातून यांनी सूत्रसंचालन केले होते. ‘लॉकडाऊन’मध्येही अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कवी संमेलने, परिषदा यांच्यासाठी ऑनलाईन सूत्रसंचालन करून कार्यक्रम गाजविले आहेत. ‘सी इंडिया’ या चॅनेलवरून ‘आठवणीतील कविता’ या मालिकेचे लेखन आणि निवेदनही त्यांनी केले होते. ‘शेअर मार्केट’ आणि इतर गुंतवणूक पर्याय या विषयांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. त्या विषयांवर त्यांचे सातत्याने लेखन व मार्गदर्शन सुरू असते. साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांच्या कर्तृत्वाची दाखल घेऊन ‘कल्याण- डोंबिवली गौरव पुरस्कार’, ‘महाराष्ट्र लक्षवेध पुरस्कार’, ‘साहित्य संस्कृती संवर्धन पुरस्कार’, ‘साहित्य भूषण पुरस्कार’, ‘कवयित्री शांता शेळके काव्य पुरस्कार’, ‘इंदिरा संत काव्यरत्न पुरस्कार’, ‘साहित्य गौरव पुरस्कार’, ‘गोल्डन ग्लोब अवॉर्ड’, ‘महात्मा गांधी दर्शन पुरस्कार’, ‘प्राईड ऑफ नेशन अवॉर्ड’ अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
 
 
स्वतःचा सर्वांगीण विकास करता करता आपल्यासोबत असलेल्या सर्व सहकारी मित्रांना ते केवळ व्यासपीठ उपलब्ध करून देत नाहीत, तर त्यांना पुढे जाण्यासाठी ते प्रोत्साहित करत असतात. डॉ. योगेश जोशी म्हणजे अनेक चरित्रात्मक लेखांचे व पुस्तकांचे लेखक, उत्तम सूत्रसंचालक, संकल्पनाकार, इव्हेंट मॅनेजर आणि अनेक विशेषांकाचे संपादक अशी बहुआयामी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. शब्दांवर आणि माणसांवर प्रेम करणार्‍या योगेश यांच्याबद्दल सांगायचे झाले तर,
 
 
 
 
बहु कलांचा व्यासंग
अद्वितीय ज्ञानाचे भांडार...
गौरवावे तुम्हा किती
करावा किती जागर...
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@