मुंबई महापालिकेभोवती नव्या वादाचे कोंडाळे!

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणखी अडचणीत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा काँग्रेसचा इशारा

    08-May-2022
Total Views |
 
 
 
sandpani
 
 
 
 
 
मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनातर्फे उभ्या केल्या जाणार्‍या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या संदर्भात भाजपपाठोपाठ आता महाविकास आघाडीतील घटकपक्ष काँग्रेसने जोरदार आक्षेप नोंदवले असून, त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही आता काँग्रेस नेते आणि महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या कारभाराभोवती वादाचे नवे कोंडाळे निर्माण झाले आहे. त्यापूर्वी महापालिकेच्या या प्रकल्पात प्रक्रिया करण्यात येणार्‍या सांडपाण्याच्या दर्जाबाबत आणि एकंदर प्रक्रियेच्या विरोधात राष्ट्रीय हरित लवादामध्ये एक याचिका नितीन देशपांडे यांच्यावतीनेदाखल करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला असून, राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयाचे पालन करण्याचे आदेश मुंबई महापालिका प्रशासनाला दिले आहेत.
 
 
 
नेमका प्रकल्प काय?
शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा पालिकेचा मानस
एकूण सात ठिकाणी प्रकल्पाची उभारणी होणार
वर्सोवा, भांडुप, घाटकोपर, धारावी, वरळी, वांद्रे आणि मालाड अशा एकूण सात ठिकाणी हे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे पालिकेकडून निश्चित करण्यात आले आहे.
मुंबईतील एकूण २४६४ दशलक्ष लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया होणार
 
 
 
मुंबई महापालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा :
भाजप आणि काँग्रेस नेत्यांची टीकायाच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या निविदेची किंमत २०२० साली १६ हजार, ४१२ कोटी होती. मात्र, अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीनंतर काढण्यात आलेल्या निविदेची किंमत २३ हजार, २४७ कोटींवर जाऊन पोहोचली. २०२२ सालच्या निविदेत मालाड येथील प्रकल्पाची नव्याने भर... प्रकल्पाची किंमत २९ हजार, ६५२ कोटींवर!
अवघ्या दीड वर्षांच्या कालावधीत प्रकल्पाच्या खर्चात तब्बल ४२ टक्क्यांनी वाढ कशी झाली? विरोधकांचा आरोप
निविदा प्रक्रियेत मोठा घोटाळा निविदेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार; काँग्रेसचा आक्रमक पवित्रा
 
 
 
‘सीबीआय’ चौकशीची भाजपची मागणी
दरम्यान, मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या भोवती वादंग निर्माण झालेले आहे. काँग्रेसने या प्रकल्पातील निविदेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे, तर दुसरीकडे महापालिकेतील पहारेकरी असलेल्या भाजपने या प्रकरणाची थेट ‘सीबीआय’ चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात ‘सीबीआय’ची ‘एंट्री’ होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
 
 
 
महापालिकेच्या स्पष्टीकरणावर विरोधकांची नाराजी
भाजप आणि त्या पाठोपाठ काँग्रेसने केलेल्या आरोपांवर महापालिकेचे आयुक्त आणि विद्यमान प्रशासक इकबालसिंह चहल यांनी काही माध्यमांशी संवाद साधताना यावर स्पष्टीकरण दिले आहे. आयुक्त म्हणाले की, “एकाच प्रकल्पाच्या किंमतीत वाढलेल्या किंमती हा रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाचा परिणाम आहे. तसेच कोरोनाकाळात घडलेल्या काही घटना आणि इंधन दरांमध्ये झालेली मोठी दरवाढ या बाबी निविदेतील किंमत वाढण्यास कारणीभूत ठरल्या आहेत.” मात्र, महापालिका आयुक्तांनी दिलेल्या या स्पष्टीकरणावर भाजप आणि काँग्रेसने नाराजी व्यक्त करत हा खुलासा अमान्य केला आहे.