सामाजिक समरसतेचा दीपस्तंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-May-2022   
Total Views |

सामाजिक समरसतेचा दीपस्तंभ
 
 
 
प्रत्येक समाजातील बांधवांना आपल्याच समाजातील वाटणारे गणेश मोकाशी हे मुंबई क्षेत्र सामाजिक समरसता प्रमुख. महाराष्ट्र, गोवा राज्यात समरसतेचे कार्य करणार्‍या गणेश यांच्या कार्याचा घेतलेला हा मागोवा...
 
 
 
भिवंडीमधले गोरक्षासंदर्भातले विषय घेऊन गणेश त्या वकिलांकडे जायचे, जे वकील वकिलीपेशाच्या चौकटीपलीकडे आत्मियतेने त्यासंदर्भात न्यायालयीन कामकाज करायचे. मात्र, त्या वकिलांचा खून झाला. कारण, एकच, भिवंडीसारख्या परिसरात हिंदू समाजाला अभिप्रेत असलेल्या विषयांसाठी ते काम करायचे. या वकिलांच्या खूनाने गणेश यांच्या वैचारिक कार्याला आणखीन धार आली. धर्मसमाजाच्या मूल्यांसाठी जीव गमावणार्‍या या व्यक्तींच्या बलिदानामुळे गणेश यांच्या मनात निश्चयाचे बीज रूजले. त्यांनी ठरवले धर्मकार्यात माघार नाही, समाजहिताचे कार्य करताना समाजातही जागृती करायची. खरे तर धर्म आणि समाजसेवेत अखंड कार्य करता यावे, म्हणून तर गणेश विश्व हिंदू परिषदेशी जोडले गेले. विश्व हिंदू परिषदेच्या विविध संघटनात्मक जबाबदार्‍या त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे सांभाळल्या. ते मुंबईतील विविध भागांत संघटनमंत्री होते. ठाणे शहराचे संघटनमत्री तसेच गोव्याचेही संघटनमंत्री होते. सध्या ते विश्व हिंदू परिषद मुंबई क्षेत्र, महाराष्ट्र आणि गोव्याचे सामाजिक समरसता प्रमुख आहेत. तसेच, नागपूर येथे गुरूकुल आश्रम शाळेचे संचालक आहेत.
 
 
 
जातीपातीपलीकडे आपण हिंदू आहोत आपला भूतकाळ, आपले संस्कार आणि आपली मातृभूमी एक आहे, याचा जागर करत ते समाजात देशनिष्ठेचे अमृत पेरत आहेत. महाराष्ट्र आणि गोव्यामधल्या वस्तीपातळीवरीलविविध समाजातील लोक गणेश यांना ‘दादा’ म्हणत, त्यांच्याशी सुखदुःखाच्या अनुभवाची देवाणघेवाण करतात. इतकेच काय, अठरापगड जातीत विभागलेल्या प्रत्येक समाजाला गणेश त्यांच्याच समाजातले वाटतात. दुधात साखर विरघळावी, असे समाजबांधवांत समरस झालेले गणेश. प्रत्येक समाजाचे प्रश्न, त्याचे परिणाम आणि काय केल्याने या प्रश्नांना सोडवता येईल हे गणेश जाणतात. त्यांच्यासोबत समरस समाजाचे अनेक दूत साथीला आले, तर सामाजिक समरसतेसाठी तीन दशक कार्य करणार्‍या गणेश मोकाशी यांची प्रेरणा काय असावी? माणिक आणि शकुंतला मोकाशी या कुटुंबाचे सुपुत्र गणेश. हे कुटुंबामुळेच श्रीपूर गावचे, तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर. माणिक हे खासगी साखर कारखान्यात काम करायचे, तर शकुंतला बाईही घरासाठी राबराब राबायच्या. सकाळी उठून घरच आवरून त्या चार घरची धुणीभांडी करायला जायच्या. तिथून परतल्या की, कुणाच्या तरी शेतात मजुरी करायच्या संध्याकाळी घरी परतून पुन्हा घरचे काम आहेच. पण, या कष्टमय आयुष्यातही त्यांनी मुलांना चांगले संस्कार दिले. मोकाशी दाम्पत्य इतके कष्ट करूनही दोन वेळचे अन्न इतकीच मिळकत त्यातून होई. महाविद्यालयात जाईपर्यंत गणेश यांनी कधीही नवीन कपडे घातले नसतील. आईला कुणीतरी आपल्या मुलांचे वापरलेले कपडे द्यायचे, तेच कपडे घालून प्रत्येक सणवार साजरा केला जाई. शिक्षण घेणे आणि देान घटका उसंत घेऊन जगणे हीसुद्धा ऐशच वाटावी, अशी परिस्थिती. याच कालावधीत गणेश हे रा. स्व. संघाच्या शाखेत जाऊ लागले. तिथे त्यांचा संपर्क संघ प्रचारकांशी आला. त्यांच्या विचारकार्यातून गणेश यांना प्रेरणा मिळाली की, देश आणि समाजाच्या विकासासाठी व्यक्तीचा स्वतःचा नैतिक आणि सामाजिक विकास महत्त्वाचा. त्यावेळी तालुका संघ प्रचारक महादेव गोरे यांच्यासोबत गणेश अनेक वस्त्यांमध्ये जायचे. प्रचारक गणेश यांच्याशी वस्त्यांबाबत चर्चा करायचे. या सगळ्यातून गणेश यांना एक सत्य उलगडत गेले ते म्हणजे, समाजाचे प्रश्न सोडवायला बाहेरून कुणी येणार नाही, तर समाजाचे घटक म्हणून प्रत्येकाने यात पुढाकार घेतला पाहिजे.
 
 
 
असो. पुढे गणेश यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नोकरीनिमित्त ते पुण्यात आले. पुण्यात त्यांच्या घराच्या बाजूलाच विश्व हिंदू परिषदेचे कार्यालय होते. तिथे त्यांचा परिषदेचे प्रांत संघटनमंत्री महेंद्र वेदक यांच्याशी संपर्क झाला. त्यानंतर गणेश पहिल्यांदा विश्व हिंदू परिषदेच्या शिबिराला अयोध्येला गेले. तिथे संघचालक बाळासाहेब देवरस, दत्तोपंतजी ठेंगडी, मुरली मनोहर जोशी, अशोक सिंगल, साध्वी रूतंबरा यांचे विचार ऐकले. तिथूनच गणेश यांनी विश्व हिंदू परिषदेच्या आयामातून समाजकार्याची धुरा खांद्यावर घेतली. या सगळ्या कालखंडात देशात सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अनेक घडामोडी घडल्या. पण, या सगळ्या घडामोडींमध्ये समाजाने हिंदू म्हणून एकसंध राहावे, यासाठी गणेश अक्षरशः पायाला भिंगरी लावून समाजात फिरत असतात. आयुष्यात समाधानाची गोष्ट कोणती सांगताना गणेश म्हणतात की, “राममंदिर निधी समर्पणसाठी नागपूरचे वाल्मिकी समाजबांधव आले. त्यावेळी मी आणि देवजीभाई रावत (केंद्रीय मंत्री, विश्व हिंदू परिषद) सोबत होतो. वाल्मिकी समाजबांधवांनी आम्हाला निवेदन दिले की, रामललाचे मंदिर बांधले जाणार म्हणून अत्यानंद आहे. पण, रामललांच्या बाजूला महर्षी वाल्मिकींचे पण मंदिर असायला हवे. रामायण लिहिणारे वाल्मिकी महाराज आहेत. आम्ही ते निवेदन रामजन्मभूमी न्यासाकडे दिले. न्यासाने रामललांसोबत वाल्मिकी महाराजांचे मंदिर बांधण्याचीही तयारी केली आहे. हे केवढे माझे भाग्य!” तर असे धर्मसमाजकार्यात अग्रेसर असलेलेगणेश मोकाशी. गणेश मोकाशी म्हणजे सामाजिक समरसतेचे दीपस्तंभच!
 
 
@@AUTHORINFO_V1@@