सिंधुदुर्गातून चतुराच्या नव्या जातीचा शोध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-May-2022   
Total Views |
drag

मुंबई (उमंग काळे): सिंधुदुर्गातील चौकुळ गावातून चतुराच्या नव्या जातीचा शोध लावण्यात आला आहे. या बाबतचा शोधनिबंध ‘झूटॅक्सा या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये दि. ५ मे २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आला आहे.

स्पाइनी हॉर्नटेल – (बर्मागोम्फस चौकुळेन्सिस) ही प्रजात भारतातून शोधली गेलेली नव्या चतुराची जात ठरली आहे. या पूर्वी १९२० च्या दशकात या प्रजातीतील ३ इतर जातींची नोंद झाली आहे. चतुर आणि टाचण्या या एकत्रितपणे ओडोनेटा या वर्गात मोडतात. या वाहत्या झऱ्यांच्या किनाऱ्यावरील दगडांवर अधिवास करतात. या जीवांचे अस्तित्व गोड्या पाण्याच्या उत्तम गुणवत्तेचे निर्देशक आहेत. पश्चिम घाटात चतुरांच्या सुमारे २०० हून अधिक प्रजाती आढळतात. त्यापैकी जवळपास ४० टक्के प्रजाती या प्रदेशनिष्ठ आहेत. म्हणजेच त्या जगात इतरत्र कुठेही आढळून येत नाहीत.

 
drag1
 
 

२०२१ मध्ये आंबोलीचे फुलपाखरू तज्ञ आणि निसर्ग संशोधक हेमंत ओगले यांनी चौकुळ गावाजवळच्या ओढ्याकाठी एका वेगळ्या काळ्या-पिवळ्या चतुराचा फोटो काढला. फोटोचे निरीक्षण केल्यावर लक्षात आले की, या जातीचे वर्णन इतर कोणत्याच प्रजातीशी सलग्न नाही आहे. नमुने गोळा करून पुढील अभ्यास करण्यात आला. नमुन्याचे विच्छेदन आणि आकारशास्रीय अभ्यासाअंती ही प्रजात वेगळी असल्याचे सिद्ध झाले. यानंतर या बाबतचा शोध निबंध शंतनू जोशी, हेमंत ओगले, आणि दत्तप्रसाद सावंत यांनी लिहला. तो नुकताच ‘झूटॅक्सा या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

 

drag2 

"गोम्फिडी हे चतुरांचे कुळ अभ्यासासाठी कठीण आहे. कारण, या कुळातल्या प्रजातींमध्ये बरेचसे साम्य असते. शिवाय हे चतुर दाट जंगलांच्या बाहेर फारसे येत नाहीत. यांचा आढळ हा अतिशय कमी कलावधीकरिता असतो," असे नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस, बंगळुरू येथील रिसर्च कलेक्शनमध्ये चतुरांचा क्युरेटर असलेला शंतनू जोशी सांगतो.

"आम्हाला आधी ही प्रजात म्हणजे लेडलॉचा हॉर्नटेल (बर्मागोम्फस लेडलॉवी) असावी असे वाटले होते. मात्र अधिक अभ्यास केल्यावर आम्हाला नवनवीन माहिती मिळत गेली आणि ही प्रजात सर्व जगासाठी नवीन असल्याचे आमच्या लक्षात आले," असे केईएम रुग्णालयात डॉक्टर असलेला आणि चतुरांचा अभ्यास करणारा दत्तप्रसाद सावंत नमूद करतो.

"बर्मागोम्फस चौकुळेन्सिसचा शोध हा खास आहे, कारण या प्रजातीचा शोध सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सिंधुदुर्गाच्या स्थानिक संशोधकांनी लावलाय. केवळ आंबोलीचा भाग हा जैवविविधतेने समृद्ध नसून आजूबाजूचा परिसरही तितकाच विलोभनीय आहे हेच यातून दिसून येते." प्रथितयश फुलपाखरू तज्ञ आणि ज्यांनी हा चतुर प्रथम पहिला ते हेमंत ओगले सांगतात.

 
drag3
 
@@AUTHORINFO_V1@@