लाखभर हरवलेले लोक गेले कुठे?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-May-2022   
Total Views |

mexico
 
 
जेथे अपहरण केलेल्या व्यक्तींच्या सुटकेसाठी कर्ज मिळेल.’ हो, मेक्सिको हा एक असा देश आहे, तिथे अपहरण केलेल्या व्यक्तींच्या सुटकेसाठी गुन्हेगारांनी मागितलेल्या खंडणीसाठी कर्ज दिले जाते. अपहरण केलेल्या व्यक्तींसंदर्भात पोलीस स्थानकात तक्रारीही केल्या आहेत. पण, २००६ ते आजपर्यंत मेक्सिकोमध्ये एक लाखांपेक्षा जास्त लोक हरवले आहेत, त्यांचे अपहरण झाले. पण, त्यांचा अद्याप मागमूसही नाही. दि. १ मे रोजी मेक्सिकोमध्ये हजारो लोकांनी हरवलेल्या नातेवाईकांसाठी मोर्चा काढला. कुणाचे मूल, तर कुणाचे चक्क आईवडील हरवले आहेत. या हरवलेल्या लोकांना शोधण्यासंदर्भात पोलीस स्थानकात तक्रारीही नोंदवल्या. पण, त्यापैकी कुणीच मिळाले नाही.
आपले हरवलेले नातेवाईक जीवंत नसावेतच, असे सगळ्यांना वाटते. किंबहुना, ते जीवंत नसू देत. कारण, जीवंत असतील, तर इतके वर्षे त्यांना कोणत्या नरकयातनेला सामोरे जावे लागेल देव जाणे, असे नातेवाईकांना वाटते. पण, ते मृत तरी आहेत का, हे जाणून घेण्यासाठीसुद्धा हे सगळे मेक्सिकन नागरिक रस्त्यावर उतरले. तसे ते दरवर्षीच उतरतात. पण, इतक्या मोठ्या प्रमाणात या देशात नागरिक बेपत्ता होण्याचे कारण काय असावे? तर कारण आहे म्हणजे नशेचा व्यापार. मेक्सिको नशेच्या व्यापाराचे केंद्रच आहे आणि अनेक गुन्हेगारांचे गट यामध्ये सक्रिय आहेत. कोणत्या शहरात कोणी ड्रग्जचा व्यापार करावा, यासाठी हे गट एकमेकांवर कुरघोडी करत असतात. एकमेकांना शहकाटशह देण्यासाठी क्रूर कृत्य करत असतात. त्यातूनच मेक्सिकोमध्ये हत्यांचे सत्र सुरू झाले.देशात कायदा-सुव्यवस्थेचे १२ वाजले आणि या नशेच्या व्यापार्‍यांनी देशात समांतर सरकारच चालवले.
या सगळ्याला आळा बसावा म्हणून २००६ साली मेक्सिकोचे राष्ट्रपती फेलीप कालडेरोन यांनी लष्करालाच रस्त्यावर उतरवले. कारण, पोलीस या ड्रग्ज माफियांसमोर हतबल झाले होते. ‘सिनालोआ कार्टेल’ आणि ‘जालिस्को न्यू जनरेशन’ या दोन संघटनांनी मेक्सिकोला जेरीस आणले होते. लष्कराने कारवाई करण्यास सुरुवात केली. मग या दोन संघटनांना खुलेआम ड्रग्ज विकणे मुश्किल झाले. त्यांनी अपहरण करणे हा धंदा सुरू केला. तसेच, ड्रग्ज विकण्यासाठी लहान मुलांचं आणि लष्कर किंवा पोलिसांना संशय येणार नाही, अशा लोकांचा या धंद्यासाठी वापरणे सुरू केले. चांगल्या घरची मुले आणि प्रतिष्ठित घरचे युवक-युवती तसेच सरकारी यंत्रणांतील अधिकारी यामध्ये गुंतवले गेले. या सगळ्यांना फसवून नशेची लत लावली गेली. जेव्हा ते पूर्णतः जाळ्यात अडकले, तेव्हा त्यांच्याकडून नशेची खरेदी-विक्री, देहव्यापार किंवा खूनही करवून घेण्यात येऊ लागले. या लोकांचा कुणाला संशय आलाच, तर त्यांचा खून केला जाऊ लागला. खून झाला तरी त्यांचे मृतदेह तरी मिळायला हवेत. पण, ते सुद्धा मिळत नसत. याचे गौडबंगाल उघडकीस आले.
 
 
या ड्रग्जमाफियांच्या कचाट्यातून सुटलेल्या एका मुलाने सांगितले की, ड्रग्जमाफिया लोकांचे अपहरण करतात. ते केवळ खंडणीसाठीच नाही, तर त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्य करवून घेण्यासाठी. हजारो लोकांना या माफियांनी वेठबिगार गुलाम बनवले. गुलामांचे काम काय तर ड्रग्जमाफियांंनी शत्रूचा खून केला किंवा निरुपयोगी झालेल्या अपहृत व्यक्तीचा खून केला, तर त्या मृत व्यक्तीच्या शरीराची वासलात लावायची. त्या मृतदेहाचे नखाइतके तुकडे करायचे, ते भाजायचे आणि ते छोटे छोटे तुकडे कोणत्या तरी चिखल-गाळात किंवा दुर्लक्षित जागी मातीत मिसळायचे किंवा या छोट्या तुकड्यांना ‘अ‍ॅसिड’मध्ये टाकून त्या तुकड्यांचे विघटन करायचे. त्यामुळेे हे अपहरण केलेले किंवा हरवलेले लोक पुन्हा त्यांच्या नातेवाईकांना जीवंत किंवा मृत स्वरूपात कधीच भेटले नाहीत. हे दुःख या नातेवाईकांसाठी खूप मोठे होते.
 
 
 
२०१९ साली मेक्सिकन सरकारने निर्णय घेतला की, लष्कर आता ड्रग्ज माफियाविरोधात रस्त्यावर उतरणार नाही. पोलीसच ड्रग्जमाफियांविरोधात कारवाई करतील. त्याच काळात मेक्सिकन सरकारने हरवलेल्या लोकांना शोधण्यासाठी एक समिती गठित केली. या समितीने शेकडो लोकांना शोधलेही. पण, ही लोकं भेटली कुठे तर, कुठच्यातरी कचर्‍याच्या ढिगार्‍यात तुकड्याच्या स्वरूपात किंवा कुठच्यातरी दलदलीत ‘अ‍ॅसिड’च्या स्वरूपात. हे सगळे भयानक आणि दुःखदच. या सगळ्या हरवलेल्या लोकांच्या स्मृतीसाठी मेक्सिकन नागरिकांनी दि. १ मे रोजी मोर्चाचे आयोजन केले. जगाच्या पाठीवर असेही भयंकर घडत आहे...
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@