व्यक्तिचित्रणातील उगवता ‘प्रकाश’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-May-2022   
Total Views |

babasaheb
 
 
 
मुंबईला आपलेसे करत त्याने आपल्या व्यक्तिचित्रणाच्या आवडीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. जाणून घेऊया राज्य शासन पुरस्कारप्राप्त चित्रकार प्रकाश बाबासाहेब कुर्‍हे याच्याविषयी...
 
 
 
अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील राघो हिवरे या गावी जन्मलेल्या प्रकाश बाबासाहेब कुर्‍हे याचे प्राथमिक शिक्षण जि. प. शाळेत झाले. घरच्या हलाखीच्या परिस्थितीतही आई मजुरी, तर वडील शेती करून कुटुंब चालवत होते. चौथीत असताना प्रकाश यांनी हरिनाम सप्ताहाच्या पत्रिकेवरील राम-सीतेचे चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला. दोन-तीन दिवसांच्या प्रयत्नानंतर चित्र जमले आणि त्याला शिक्षकांची कौतुकाची थाप मिळाली. यानंतर प्रकाशला चित्रकलेची आवड निर्माण झाली. आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण मोहोज खुर्द येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पूर्ण केले.
 
 
 
यावेळी शिस्तप्रिय कळमकर गुरूजींना प्रकाशच्या चित्रकलेविषयी समजले. त्यामुळे ते सतत प्रकाशला प्रोत्साहन देत. मात्र, कळमकर गुरुजींच्या आदरयुक्त भीतीपोटी ‘इंटरमिजिएट’ आणि ‘एलिमेन्ट्री’ परीक्षेच्या तासिकांना प्रकाशने अनेकदा दांडी मारली. अखेर प्रकाश दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाला. आठवीत प्रकाशसमोर शिकविणार्‍या गुरूजींचे हुबेहूब चित्रे काढायचा. त्यावेळी वर्गातील मुले त्याला ‘पेंटर’ म्हणून चिडवत. चित्रकलेच्या शिक्षणाविषयी माहिती नसल्याने प्रकाशने कला शाखेत जाण्याची इच्छा असूनही कुटुंबीयांच्या आग्रहामुळे विज्ञान शाखेला प्रवेश घेतला.
 
 
 
mahatma
 
 
 
बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रकाशने ‘ब्रह्मा’ चित्रपटात गोविंदा चित्र काढत असल्याचा सीन पाहिला आणि त्याने चित्रकलेतच करिअर करण्याचा निश्चय केला. यातच त्याची ‘डिप्लोमा इंजिनिअरिंग’साठी प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली होती. याचदरम्यान त्याने वृत्तपत्रात प्रगत कला महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेची जाहिरात वाचली. त्यानंतर याठिकाणी चौकशी केली असता प्रवेश संपले होते. मात्र, प्रकाशने चित्रकला महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आग्रह धरला. यानंतर मोठ्या प्रयत्नांनंतर पाथर्डी तालुक्यातील ‘ज्ञानेश्वर माऊली चित्रकला’ महाविद्यालयात संस्थापक अंबादास जाधव गुरूजींच्या प्रयत्नांतून त्याने प्रवेश घेतला. दोन महिने उशिरा प्रवेश घेतल्याने प्रकाश अभ्यासक्रमात मागे पडला. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला अनिवार्य असलेली राज्य शासनाची चित्रकला स्पर्धा जवळ आली होती. त्यावेळी प्रकाशने अवघ्या काही दिवसांत चित्रकलेचे धडे घेतले.
 
 
 
 
 
bai
 
 
फाऊंडेशनसाठी प्रवेश घेतल्याच्या केवळ दोन महिन्यांतच प्रकाशने राज्य पुरस्कार आपल्या नावावर केला. त्यानंतर प्रकाशने ‘एटीडी’साठी प्रवेश घेतला. त्यावेळी प्रकाशला पहिल्या आणि दुसर्‍या वर्षीही राज्य पुरस्कार मिळाला. दुसर्‍या वर्षाला असताना त्याने ‘जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’ला प्रवेश घेण्यासाठी ‘सीईटी’ दिली. त्यावेळी परीक्षेला तो मुंबईत आला आणि त्याला मुंबई आवडली नाही. त्याचवेळी त्याने मुंबईत न येण्याचा निर्णय घेतला. निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश यादीत प्रकाशची निवड झाली. मात्र, त्याने ते कुणालाही कळवले नाही आणि प्रवेशही घेतला नाही. यानंतर त्याने रेल्वे विभागाची काही कामे केली. भित्तीचित्रे काढण्याची अनेक कामेही त्याने हाती घेतली. त्यातच कोरोनामुळे ‘लॉकडाऊन’ जाहीर झाले आणि प्रकाशला निवांत वेळ मिळू लागला. म्हणून त्याने व्यक्तिचित्रे रेखाटण्यास सुरुवात केली. त्याने सोशल मीडियावर एका चित्राचा फोटो पोस्ट केला आणि तो प्रचंड ‘व्हायरल’ झाला. त्यामुळे प्रकाशला अनेक कामे मिळू लागली. हे चित्र पाहून प्रकाशला अंबादास जाधव यांचा फोन आला आणि त्यांनी त्यांच्या आईचे पोट्रेट काढण्यास त्याला सांगितले. आईचा फोटो अस्पष्ट असल्याने याआधी एका चित्रकाराने चित्र चुकवले होते. त्यामुळे जाधव यांनी प्रकाशला चित्र काढण्यास सांगितले. प्रकाशने हे चित्र अप्रतिम रेखाटल्याने जाधव यांनी त्याला पुन्हा ‘सीईटी’ देण्याचा सल्ला दिला. त्यानुसार प्रकाश पुन्हा ‘सीईटी’ परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि ‘जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’मध्ये प्रवेश घेतला. सध्या याचठिकाणी प्रकाश फाऊंडेशनसोबत शिल्पकलेचेही धडे घेत आहे.
 
paint
 
 
 
 
दरम्यान, याच वर्षी जानेवारी महिन्यात राज्य चित्रकला स्पर्धा जाहीर झाली. त्यावेळी शेवटचे दोन दिवस उरले असता रात्री उठून प्रकाशने समोर एशियन पेंटचा पडलेल्या डब्याचे चित्र रेखाटले. याच चित्राला राज्य पुरस्कार जाहीर झाला आणि त्याला मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ‘वॉल पेंटिंग’ करताना लोकांच्या नकारात्मक प्रतिक्रियांनी प्रकाश खचला होता. ‘लॉकडाऊन’मध्ये त्याला जाणीव झाली की, आपण व्यक्तिचित्रण उत्तमरित्या साकारू शकतो. अनेक लोकांनीही त्यांना ‘वॉल पेंटिंग’ऐवजी व्यक्तिचित्रणावर भर देण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्याने चित्रकलेचे धडे घेण्यासाठी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. सध्या प्रकाशला राज्याबाहेरूनही चित्र काढून देण्यासाठी ‘ऑर्डर’ येतात. ज्याच्याकडे निरीक्षणशक्ती उत्तम आहे, तो चित्रकलेत नक्कीच यशस्वी होऊ शकतो. ‘डिजिटल’ माध्यमांमुळे अनेक चित्रकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. पूर्वीसारखा चित्रकारांना मान सन्मान मिळत नाही, असे प्रकाश सांगतो. वडील बाबासाहेब आणि आई मिरा कुर्‍हे यांनी जीवनाच्या प्रत्येक वळणावर साथ दिल्याने आज इथपर्यंत पोहोचल्याचे प्रकाश सांगतो. व्यक्तिचित्रणात आपल्या अनोख्या शैलीने ठसा उमटविणार्‍या प्रकाश कुर्‍हेला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वकशुभेच्छा...
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@