मनसेच्या धास्तीने ठाण्यात भोंग्याविना नमाज पठण

सुमारे ३५० जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई

    04-May-2022
Total Views |

Loudspeakers
 
 
 
ठाणे : भोंगे उतरले नाही तर मशिदींसमोर दुप्पट आवजात हनुमान चालीसा लावण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्यानंतर बुधवारी (दि. ४ मे) पहाटेपासून ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील सर्व मशिदींसमोर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी कलम १४९ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ६८ अन्वये तब्बल १ हजार ७७५ जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली. तर, आयुक्तालय क्षेत्रातील सुमारे ३५० जणांना ताब्यात घेण्यात आले. मशिदीच्या विश्वस्तांना पहाटेच्या वेळी भोंग्याचा वापर करून नमाज पठण करू नये असे आवाहन पोलिसांनी केल्याने पहाटे काही मशिदींमध्ये भोंग्याचा वापर करणे टाळण्यात आले. परंतु दुपारच्या वेळेत काही मशिदींवर भोंग्याद्वारे कमी आवाजात नमाज पठण करण्यात आले. दरम्यान, मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मंदिरातील पुजाअर्चा आणि आरत्या पहाटेपूर्वी उरकण्याचे निर्देश दिल्याने ठाण्यात संताप व्यक्त केला. मात्र सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
 
 
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टीमेंटम नंतर ठाणे पोलीस कामाला लागले. त्यानुसार, ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील मुस्लीम बहुल असलेल्या ठाणे, भिवंडी आणि कल्याण भागातील क्षेत्रात पोलिसांनी करडी नजर ठेवली होती. सुमारे आठ हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी या शहरात तैनात केला होता. यामध्ये राज्य राखीव दलाच्या तुकड्या, शीघ्र कृती दलाचा सामावेश होता. बुधवारी पहाटे मशिदींमध्ये नमाज पठण केले जाते. त्यामुळे पहाटेच्या सुमारास पोलिसांनी सर्वच मशिदींसमोरही कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तसेच पोलिसांनी मशिदींचे विश्वस्त, धर्मगुरू यांची बैठक घेऊन त्यांना पहाटेच्या वेळेत नमाज पठण करताना भोंग्याचा वापर टाळण्याचे आवाहन केले होते. त्याचा आदर राखुन भोंग्याविना नमाज पठण करण्यात आले.
 
 
 
ठाण्यातील वागळे इस्टेट भागात एका मशीदीसमोर पहाटे मनसेच्या कार्यकर्त्याने ध्वनीक्षेपकावर हनुमान चालीसा वाजविली. त्याच्याविरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तर भिवंडी येथील टेमघर भागात मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. कल्याणमध्येही शांतता राखण्यासाठी पोलीस यंत्रणेने प्रयत्न केले होते. येथील मशिदींसमोर मंगळवारी रात्रीपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात होता. पहाटे येथे भोंग्याविना नमाज पठण करण्यात आले. बदलापूरमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. अशी माहिती पोलिसांनी दिली.
 
 
 
ठाणे पोलिसांनी ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील मनसेचे कार्यकर्त्यांना महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार आणि १४९ कलमांतर्गत नोटीसा बजावण्यास सुरूवात केल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी १ हजार ७७५ जणांविरोधात प्रतिबंधात्कम कारवाई केली. तर ३५० हून अधिक जणांना ताब्यात घेतले होते.
 
 
 
भोंग्याविना नमाज पठण
ठाणे शहरातील राबोडी, मुंब्रा, वागळे इस्टेट भागात सुमारे १५० मशिदी आहे. यातील अनेक मशिदींमध्ये सकाळी भोंग्यांविना नमाज पठण करण्यात आले. भिवंडीमध्येही १८१ मशिदी आहेत. यातील सुमारे ४० टक्के मशिदींमध्ये पहाटे भोंग्याचा वापर करण्यात आला नाही. दरम्यान, दुपारच्या नमाजाच्या वेळेत बहुतांश मशिदींमध्ये भोंग्यांचा वापर करण्यात आला. पोलिसांनी या मशिदींच्या विश्वस्तांना आवाजाची पातळी मर्यादित ठेवण्याचे आवाहन केल्याने मशिदीतील विश्वस्तांनी आवाजाची पातळी कमी ठेवली होती. पोलिसांकडूनही मशिदींच्या परिसरात यंत्रांद्वारे आवाजाची पातळी मोजण्यात आली.
 
 
 
पोलिसांकडुन मंदिरेही लक्षकेंद्रित
मनसेने मुंब्र्यात पहाटे ५ वाजता मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्याचा अट्टहास केल्याने पोलिसांनी संपूर्ण ठाणे शहरातील मंदिरांनाही लक्ष केले. पोलिसांनी त्यांच्या हस्तकाकरवी अनेक मंदिरांच्या विश्वस्त व पुजाऱ्यांना फोनाफोनी करून पहाटेपूर्वीच पूजाअर्चा व आरत्या उरकुन मंदिरे बंद करण्याचा अजब सल्ला दिल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला.