ठाणे : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मंगळवारी झालेल्या सोडतीत प्रस्थापितांचे गड शाबुत राहिले आहेत. कोपरी, वागळे प्रभागात ५० टक्के महिलाना संधी असली तरी उर्वरित ठाण्यात मात्र महिलाराज साठी मैदान मोकळे झाले आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आरक्षण सोडतीत महिलांसाठी ५ अनुसूचित जाती,२ अनुसूचित जमाती व १७ सर्वसाधारण प्रवर्गासाठी लहानग्यांच्या हस्ते चिठ्ठीद्वारे आरक्षण जाहिर करण्यात आले.
ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत एकूण लोकसंख्या १८ लाख ४१ हजार ४८८ इतकी असून, त्यामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या १ लाख २६ हजार, ००३ आणि अनुसूचित जमाती ४२ हजार ६९८ इतकी आहे. या निवडणुकीकरीता ४६ तीन सदस्यीय प्रभाग व चार सदस्यांचा १ असे एकूण ४७ प्रभाग आहेत. याची एकूण सदस्य संख्या १४२ आहे. ओबीसी आरक्षण नसल्याने १३ जागा एससी/एसटी प्रवर्गातील ७ जागा आणि उर्वरित १२९ पैकी ६४ जागा महिलांसाठी राखीव आहेत. राज्य निवडणूक आयोगाने १ ते ४७ प्रभागातील अ व ब जागेमधील ४७ जागा नेमून दिलेल्या आहेत. सर्वसाधारण महिलांकरीता आरक्षित करावयाच्या उर्वरित ३४ प्रभागाच्या ब जागेमधून सोडतीद्वारे १७ जागा सर्वसाधारण महिलांकरीता आरक्षित करण्यात आल्या आहेत.
'या' जागा महिलासाठी आरक्षित
अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक १२ अ, २३ अ, १५ अ, २९ अ आणि ३ अ आरक्षित तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ५ अ व २९ ब या दोन जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. तसेच १७ सर्वसाधारण महिला जागांसाठी प्रभाग १ ब, २ ब, १३ ब, १६ ब, १८ ब, २० ब, २१ ब, २५ ब, २६ ब, ३२ ब, ३६ ब, ३९ ब, ४१ ब, ४३ ब, ४५ ब, ४६ ब आणि ४७ ब प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत.