मुंबई : मोठा गाजावाजा करत ‘एमएमआरडीए’ प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, सांताक्रुझ ते प्रबोधनकार ठाकरे उड्डाणपूल, वांद्रेपर्यंत सुशोभीकरण आणि जाहिरातीचे कंत्राट मे. ‘लक्ष्य मीडिया लिमिटेड’ला दिले होते, पण आजपर्यंत २० महिने उलटूनही एक दमडीही ‘लायसेन्स फी’ अदा केली नसल्याची धक्कादायक कबूली ‘एमएमआरडीए’ प्रशासनाने ‘आरटीआय’ कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिलेल्या माहितीत दिली आहे. सद्यःस्थितीत ‘एमएमआरडीए’ला मे. ‘लक्ष्य मीडिया लिमिटेड’ने २४ कोटीला चुना लावला आहे.
‘एमएमआरडीए’ प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, सांताक्रुझ ते प्रबोधनकार ठाकरे उड्डाणपूल, वांद्रेपर्यंत सुशोभीकरण आणि जाहिरातीचे कंत्राट दिले असून,आजपर्यंत प्रलंबित ‘लायसेन्स फी’बाबत माहिती ‘आरटीआय’ कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ‘एमएमआरडीए’ प्रशासनाला विचारली होती. ‘एमएमआरडीए’ प्रशासनाने अनिल गलगली यांना सर्व कागदपत्रे देत स्पष्ट केले की, निविदेमध्ये नमूद केल्यानुसार मे. ‘लक्ष्य मीडिया लिमिटेड’ यांच्यामार्फत १.३३ कोटी रुपयांची बँक गॅरंटी प्राधिकरणास प्राप्त झालेली आहे. परंतु, अद्यापपर्यंत मे. ‘लक्ष्य मीडिया लिमिटेड’ यांच्यामार्फत प्राधिकरणास ‘लायसेन्स फी’ भरणा करण्यात आलेली नाही. ‘एमएमआरडीए’ प्रशासनाने दि. २८ सप्टेंबर, २०२० रोजी वर्षांसाठी ‘ऑफर’ पत्र दिले.
याबाबत ‘एमएमआरडीए’ प्रशासनाने दि. ४ मार्च, २०२० रोजी निविदा जारी केली होती. दि. ७ डिसेंबर, २०२० रोजी मे. ‘लक्ष्य मीडिया लिमिटेड’ला कार्यादेश देण्यात आले. यात ८२ ठिकाणी ३,१९९.८४ चौरस मीटरच्या जाहिरातीची परवानगी देण्यात आली. प्रत्येक वर्षी पाच टक्के वाढ, या शर्तीवर १५ वर्षांचा करार करण्यात आला. ‘लायसेन्स फी’ १३ कोटी, ३० लाख, ३३ हजार, ३९० रुपये निश्चित करण्यात आली. आजपर्यंत मे. ‘लक्ष्य मीडिया लिमिटेड’तर्फे एक दमडीही भरली गेली नाही.
अनिल गलगली यांनी मे. ‘लक्ष्य मीडिया लिमिटेड’ला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ‘एमएमआरडीए’चे अध्यक्ष एकनाथ शिंदे आणि ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त श्रीनिवास यांना पत्र पाठविले आहे. “मागील २० महिन्यांपासून एक दमडीही न भरणार्या मे. ‘लक्ष्य मीडिया लिमिटेड’वर कोणाची मेहरबानी आहे, याची चौकशी करत व्याजासह पैसे वसूल करत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा,” अशी मागणी अनिल गलगली यांनी केली आहे.