मुंबई : महिन्याभरात पूर्ण होणारे रस्तेदुरूस्तीचे काम, तीन महिने उलटून गेले तरी पूर्ण झालेले नाही. कामातील या दिरंगाईमुळे दहिसर पश्चिम येथील प्रभाग क्र. ७ मधील नागरिकांबरोबरच स्थानिक व्यापार्यांनाही व्यापारामध्ये नुकसानाला सामोरे जावे लागत आहे, अशी माहिती तेथील स्थानिकांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना दिली.
ज्या रस्त्याच्या कामाला केवळ एक महिना पुरेसा होता, ते काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या रस्त्याच्या कामामुळे ये-जा करण्यासही त्रास होत आहे. तसेच, परिसरात धुळीमुळे अनेक जण आजारीही पडत आहेत. स्थानिक व्यापार्यांनाही येथे सुरू असणार्या कामामुळे त्यांची दुकाने बंद ठेवावी लागतात. जरी दुकान उघडले, तरी या रस्त्याच्या कामामुळे उडणार्या धुरळ्यामुळे आम्हाला दुकानात जाण्यास अडचण येते, अशी तक्रार येथील स्थानिकांनी व्यक्त केली. यासंदर्भात अनेकदा स्थानिक लोकप्रतिनिधींशी संवाद साधूनही यावर कोणतीही पावले उचलण्यात येत नसल्याचेही नागरिकांनी स्पष्ट केले.
स्थानिकांकडूनच पैसे घेत दुरूस्ती
काम सुरू असतानाच पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनदेखील एकदा फुटली होती. मात्र, ही पाईपलाईन विकासकाकडून दुरूस्त करून न घेता, यासाठी स्थानिकांकडूनच पैसे घेण्यात आले होते. त्याचबरोबर येथे काम करणारे कर्मचारीही एक दिवस काम करून पुन्हा तीन-चार दिवस दिसत नाहीत, असे येथील स्थानिकांनी सांगितले. याप्रकाराचीही लोकप्रतिनिधींकडे आम्ही तक्रार केली. परंतु, लोकप्रतिनिधी आमच्याकडे लक्षच देत नाहीत, असा आरोप स्थानिक करत आहेत.
...तर स्थानिकांनी येऊन तक्रार करावी!
परिसरातील रस्ते साधे डांबराचे न बनवता सिमेंट आणि काँक्रिटचे बनवण्यात येत आहेत. मुंबई महापालिकेने दिलेल्या मुदतीनुसार रस्त्याचे काम नऊ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. कारण, सिमेंट आणि काँक्रिटचे रस्ते बनवत असताना रस्त्याखालील पाईपलाइन्स्देखील बदलण्यात येतात. तेव्हा नागरिकांनी हे समजून घ्यावे. तसेच, जर आमच्या माणसांनी नागरिकांकडून पैसे घेतले असतील, तर त्यासंबंधात रीतसर तक्रार पालिकेत किंवा पोलिसांत नागरिकांनी का केली नाही, नागरिकांकडून आम्ही कोणतेही पैसे घेत नाहीत आणि जर तसे झाले असेल, तर स्थानिकांनी येऊन तक्रार करावी.
- शीतल म्हात्रे, माजी नगरसेवक, शिवसेना