‘वर्ल्ड रेकॉर्ड्स’मधील समाजशीलता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2022   
Total Views |

sushama
 
 
 
समाजातल्या गुणवंत व्यक्तींपर्यंत पोहोचून त्यांच्यातले गुण जगासमोर मांडणार्‍या सुषमा तांबाडकर-नार्वेकर यांच्या विचारकार्याचा घेतलेला मागोवा...
 
‘अंधेराही नसीब हैं तो क्या
अंधेरे को ही सुरज बना लिये’
 
 
समाजात खूप कमी जण अशा लढवय्या आणि सकारात्मक मानसिकतेचे असतात. त्यांच्या सत्कार्याबद्दल त्यांना काहीच मिळणार नसते, ना आर्थिक ना सामाजिक काहीच फायदा होणार नसतो. तरीही हे लोक तटस्थ आणि व्रतस्थ वृत्तीने काम करतात. या काही लोकांपैकी एक म्हणजे सुषमा नार्वेकर, पूर्वाश्रमीच्या सुषमा तांबाडकर. कला शाखेतूनपदवी, त्यापुढे ‘एज्युकेशनल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅडमिनीस्ट्रेशन’मध्ये पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतले आहे. सुषमा ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स इंंडिया’ च्या सिनिअर ‘अ‍ॅडज्युडीकेटर’ आणि ‘एचओडी’ आहेत. त्या ‘काऊंसिल फॉर मीडिया सॅटेलाईट अ‍ॅण्ड ब्राडकास्टिंग’च्या ‘स्टेट अ‍ॅडवायझरी कमिटी’च्या उपाध्यक्ष आहेत. तसेच त्या ‘संजीवनी सोशल फाऊंडेशन’च्या विश्वस्त आहेत.
 
 
 
 
‘वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया’च्या माध्यमातून त्यांनी मुंबई उपनगरातील सेवावस्तीमध्ये दडलेल्या कितीतरी गुणवान मुलामुलींना शोधून त्यांचे गुणकौशल्य जगासमोर आणले. सुषमा या पलीकडे जाऊन काम करतात. त्याचे एक उदाहरण म्हणजे एक व्यक्ती रस्त्यावर ‘रस्ते का माल सस्तेमें’च्या रुपात कपडे विकत. त्यांच्याकडून सुषमांना कळले की, त्यांच्या मुलीला बॉक्सिंगमध्ये खूप रस आहे. पण, ‘गरिबाची बेटी’ हे कसे शिकणार? तरीही तिला एका खासगीट्रेनरकडे बॉक्सिंग शिकायला पाठवले आहे. सुषमा या मुलीला भेटल्या. तिच्यात गुणवत्ता होती. सुषमा यांनी विशेष मेहनत घेत, त्या मुलीचे पहिल्यांदा समुपदेशन केले. जिंकण्यासाठीची मानसिकता तयार केली. तिच्या प्रशिक्षकालाही मार्गदर्शन आणि त्या मुलीच्या प्रशिक्षणासाठीचे शुल्क दिले. बॉक्सिंग सरावासाठी विशेष कपडे आणि शुज दिले. तिची तयारी करून घेतली. त्यानंतर मग मुलीचे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ म्हणून नामाकंन दाखल केले. त्या मुलीने ठरल्याप्रमाणे तो रेकॉर्ड केला. या मुलीसारखेच अनेक गुणवंत मुलामुलींचे भवितव्य सुषमा यांनी घडवले आहे. सुषमा यांना हे सगळे करावेसे का वाटले? तर त्यासाठी त्यांचा जीवनपट समजून घेऊया.
 
 
सुषमा यांचे वडील गोविंद आणि आई शेवंता तांबाडकर हे मुळचे कोकणातले. कामानिमित्त मुंबईच्या वडाळा परिसरात वास्तव्यास होते. गोविंद एका खासगी कपंनीत कामाला. त्यांची कन्या सुषमा. सुषमा यांचे लहानपण चारचौघांसारखेच गेले. आपण मोठेपणी डॉक्टर व्हावे, असे त्यांना वाटे. त्यांनी दहावीनंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. पण, त्या बारावीमध्ये शिकत असताना त्यांच्या वडिलांचे काम बंद पडले. त्यावेळी त्यांना कंपनीने काही रक्कम दिली. पण, त्याचकाळात गोविंद यांच्या मित्राच्या मुलाला कर्करोग झाला. मित्र गरीब होता. गोविंद यांनी कंपनीतून मिळालेल्या रकमेतली ८० टक्के रक्कम मित्राच्या मुलाच्या उपचारावर खर्च केली. ते म्हणत पैसे आपल्याकडे ठेवून काय होणार? गरजूंच्या उपयोगी पडणे महत्त्वाचे. अशा संस्कारात सुषमा घडत होत्या. याच काळात घरची आर्थिक स्थिती खालावली. गोविंद यांची नोकरी गेली,दुसरे काम करायला तर त्यांच आरोग्य साथ देईनासे झाले. अशावेळी सुषमा यांनी घरची आर्थिक कमान सांभाळली. त्या सकाळी महाविद्यालयात शिकायला जात. दुपारी २ ते संध्याकाळी ६ घरी खासगी शिकवणी घेत आणि रात्री ७ ते १० एका खासगी क्लासमध्ये शिकवणी घ्यायला जात. त्यांच्या मनात डॉक्टर व्हायचे होते, पण आर्थिकतेमुळे ते शिक्षण घेणे शक्य नव्हते. मग बारावीनंतर त्यांनी कला शाखेतून शिक्षण सुरू केले. शिकवणी घेता घेता त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
 
 
त्या एका ठिकाणी नोकरी करू लागल्या. कष्ट आणि घरच्या जबाबदार्‍या यामध्ये त्यांची वैयक्तीक स्वप्नांना जागा नव्हतीच. पण, त्यांनी ठरवले की, ज्यांना शिकवणीची गरज आहे, अशा होतकरू मुलांसाठी विनाशुल्क शिकवणी घ्यायची. ज्या मुलांनी शाळा अर्धवट सोडली, ज्या मुलांनी मार्गदर्शनाअभावी, वाईट संगतीअभावी शिक्षण सोडले, अशा मुलांपर्यंत सुषमा पोहोचू लागल्या. संध्याकाळी कामावरून सुटल्या की, त्या अशा मुलांच्या घरी जात. त्यांच्या पालकांना आणि त्यांनाही समजवत. शिकण्याशिवाय पर्याय नाही शिका सांगत. या सगळ्या मुलांना एकत्रित करत त्यांची दररोज संध्याकाळी शिकवणी घेत. हॉटेलमध्ये काम करणारे वेटर, बारअटेंडर, सफाई कामगार अशा २५० जणांना त्यांनी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यातून त्यांच्या मनाला समाधान वाटू लागले. हे काम करतानाच आणि नोकरी करतानाच मग सुषमा यांनी पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. त्यावेळी काही लोक म्हणत, “आता शिकून काय करायचे आहे? पण, सुषमा म्हणत शिकण्याच्या वयात नाही शिकता आले, तर काय पुढे शिकायचेच नाही का?”
 
 
 
असो. सुषमा यांच्या सामाजिक कार्याची माहिती ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स’च्या प्रमुखांना कळली. त्यांनाही मुंबईच्या उपनगरातून लपलेल्या गुणवान व्यक्तींचे रेकॉर्ड्स नोंद करायचे होते. सुषमा हे काम करू शकते, असे त्यांना वाटले आणि त्यांनी सुषमाला संस्थेसोबत काम करण्यासाठी आमंत्रण दिले. सुषमाने त्यांचा विश्वास सार्थ केला. पुढे त्यांचा विवाह संजय नार्वेकरांसोबत झाला. त्यांनी सुषमाला समाजकार्यात नेहमीच प्रोत्साहन दिले. विविध आयामातून सुषमा कार्य करू लागल्या. मुंबईतील कितीतरी जणांना त्यांनी ‘वर्ल्ड रेकॉर्ड’च्या नोंदीवर आणले. याबरोबरच सुषमा महिला सक्षमीकरणाचेही काम करतात. कोरोना काळातही त्यांनी खूप समाजकार्य केले. गुणवान लोकांना शोधणार्‍या सुषमा म्हणतात की, ”आयुष्यात गुणवंतांना योग्य वेळी योग्य जागी संधी मिळणे गरजेचे असते. गुणवत्तेच्या मूल्यमापनातून दिलेली संधी हाच खरा समतेचा पाया आहे.”सुषमा यांना आयुष्यभर समाजातल्या अत्यंजाच्या दिप्तीमान भविष्यासाठी काम करायचे आहे, तर सेवावस्तीत लपलेल्या गुणवंत हिर्‍यांना प्रकाशात आणणार्‍या सुषमा! त्यांच्या विचारकार्याला शुभेच्छा.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@