न्यू नॉर्मल’ची नवलाई

Total Views |
 
LEKH
 
 
 
सामाजिक अंतर राखण्यापासून ते रोज मुखपट्टी वापरत वावरण्याच्या जीवनपद्धतीमुळे आणि मनमोकळेपणे आपल्या दूरवर पसरलेल्या कुटुंबीय, नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना नैसर्गिक स्नेहाने भेटण्यास असमर्थ होतो तेव्हापासून आपले जीवन बदललेले आहे. जरी दु:खाच्या छायेत आपण गढूळलेल्या मनाने त्या काळात वावरलो होतो, तरी आज अनेक गोष्टी ‘नवीन सामान्य’मध्ये बदललेल्या आहेत. त्याचा खरेतर मानवजातीला फायदाच झाला आहे.
 
 
'कोविड’च्या महामारीने संपूर्ण जगात आपल्या दैनंदिन जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निश्चितपणे बदलला आहे. या काळात आपण सगळ्यांनीच बर्‍याच अकल्पित गोष्टींचा अनुभव घेतला. आपले जीवन जरी या महामारीच्या पूर्वीच्या सामान्य स्थितीत जसेच्या तसे पुन्हा येऊ शकत नाही, तरी आपल्याला एक ‘नवीन सामान्य’ मात्र सापडले आहे. त्यामुळे आपल्याला अनपेक्षित काही फायदे नक्कीच मिळणार आहेत. महामारीच्या साथीत जीवनशैलीशी निगडित असे बरेच फायदे आपल्याला याआधी झालेले आहेत. आपल्यापैकी जवळजवळ सगळेच 2020 आणि 2021च्या पहिल्या सहा महिन्यांच्या काळाकडे पाहतो, तेव्हा त्या काळाला आपण ‘डिलिट’ करू इच्छितो. सामाजिक अंतर राखण्यापासून ते रोज मुखपट्टी वापरत वावरण्याच्या जीवनपद्धतीमुळे आणि मनमोकळेपणे आपल्या दूरवर पसरलेल्या कुटुंबीय, नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना नैसर्गिक स्नेहाने भेटण्यास असमर्थ होतो तेव्हापासून आपले जीवन बदललेले आहे. जरी दु:खाच्या छायेत आपण गढूळलेल्या मनाने त्या काळात वावरलो होतो, तरी आज अनेक गोष्टी ‘नवीन सामान्य’मध्ये बदललेल्या आहेत. त्याचा खरेतर मानवजातीला फायदाच झाला आहे.
 
 
 
 
तंत्रज्ञान आणि तांत्रिक कौशल्यांना नवीन मार्ग मिळालेला आहे. पूर्ण जगात कंपन्यांनी समोरासमोर बसून मीटिंग घेण्यासाठी ‘झूम’, ‘गुगल’ आणि इतर अनेक तंत्रज्ञान वापरण्याचा मार्ग स्वीकारला आहे. आभासी बैठका सर्व लोकांना कामानिमित्त एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. जनजीवनाचा वेग मंदावला आहे. अजून कोरोनाच्या संसर्गापासून आपण सावध राहावयाचे आहे. मधून मधून हा विषाणू आपलं रुपडं बदलतो व साथीला सशक्त बनवतो. पण, त्यासाठी आपला बचावात्मक पवित्रा ठरलेला आहे. आपल्याला कुठे जाण्यासाठी कमी ठिकाणे आणि सुरक्षित राहण्यासाठी उतावळे न होता, एकंदरीत बाहेरच्या गोष्टी कमी करायला लागतात. या सगळ्याकडे आपण शांतचित्ताने आणि प्रगल्भ मनाने विचार करतो तेव्हा खरंच सर्व काही वाईट घडले आहे का, तर नक्कीच नाही. आपल्यापैकी बर्‍याच जणांना या विषाणूच्या साथीने थोडी मंद होण्याची आणि आपल्या आयुष्यातील आवश्यक गोष्टींवर लक्ष केंद्रित करायची संधी दिली आहे. आपण या साथीपूर्वी अत्यंत वेगवान जीवनात भरकटले जात होतो, हरवले जात होतो. आपल्या जीवनात आपण आपल्याला प्रिय वाटणार्‍या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करू शकत नव्हतो. कारण, आपल्याकडे वेळ नव्हता, पण आता ते आपल्या लक्षात आले आहे. आपल्या कुटुंबाबरोबर विशेषत: पत्नी व मुलांबरोबर अधिक दर्जेदार वेळ घालवायचा असो वा खूप काळापासून आपली भेट न झालेल्या मित्र परिवाराला आणि नातेवाईकांना फोन करण्यासाठी, वेळ काढणे असो किंवा सुट्टीच्या दिवसांत मित्रमंडळी आणि जवळच्या वा दूरच्या नातेवाईकांशी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’ करणे असो, पण या सगळ्यांना पुन्हा भेटण्याचा योग आज सर्वांना मिळत आहे. आजकाल आपण काही वर्षे न भेटलेल्या आपल्या सुहृदयांशी बराच वेळ बोल शकतो. शेवटी आपल्या माणसांबरोबर संपर्क वाढवण्याची गोड संधी आपल्याला मिळू लागली आहे. त्यासाठी आभासी माध्यमे आहेत.
 
 
 
 
अत्यंत महत्त्वाची गोष्ट, जी आपण धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात शिकलो आहोत, ती म्हणजे, आपल्यासाठी कोण, काय आणि किती महत्त्वाचे हे समजून घ्यायची क्षमता. आपण बर्‍याच काळांसाठी ज्या लोकांशी बोललो नाही आहोत, त्यांच्याशी संपर्क साधून ठेवला आहे, त्याशिवाय आपल्याला आरामात बसून आपल्या जीवनासाठी काय आवश्यक आहे, कुठल्या तडजोडी करायल्या हव्यात, या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत आहोत. अनेक लोकांसाठी अगदी अत्यंत महत्त्वाची गोष्टी जी आपण करायलाच हवी ती म्हणजे, शारीरिकदृष्ट्या आणि त्यासाठी हा अतिरिक्त वेळ आता आपण देऊ शकलो. इतरांनी विशेषतः भगिनींनी कदाचित नवीन पाककृती तयार केल्या असतील आणि पौष्टिक अन्न कसे बनवायचे व खायचे, हेही शिकले असेल. ‘कॉर्पोरेट’ विभागातल्या अनेकांना आपला ताण कसा घालवायचा वा त्याचे नियोजन कसे करायचे, याचा सखोल अभ्यास करायची संधी मिळाली असेल. आपल्या आरोग्याची स्वनियंत्रित काळजी कशी घ्यायची, यासारख्या अनेक गोष्टी लोकांनी याच काळात शिकल्या आहेत म्हणजे महामारीच्या निमित्ताने का होईना, आपण स्वतःबद्दल जागृत झालो आहोत. स्वत:साठी काही महत्त्वाचे वा खास छंद विकसित करू शकलो आहोत. या अनमोल फायद्यासाठी आपल्याला या महामारीची आभार मानावे तितके कमीच!
महामारीच्या त्या काळात आपण स्वत:पेक्षा जास्त विचार केला आहे. आपण या काळात काही बातम्या वाचल्या आहेत, ऐकल्या आहेत की लोकांनी या साथीच्या जंतुसंसर्ग पलीकडे जाऊन एक मोठे चित्र पाहायचा प्रयत्न केला आहे. अन्नदानापासून रक्तदानापर्यंत मोहिमा सातत्याने राबवल्या आहेत. अडचणीच्या काळात माणूस घोर निराशेमध्ये जाऊ शकतो. किंबहुना, ते सोप्पे आहे, पण या काळात इतरांसाठी काही करण्याच्या सेवा देण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे. किंबहुना, यात गेल्या वर्षभरात ऐतिहासिक वाढ झालेली आहे. ही ‘जग हे सुखाचे दिव्या घेतल्याचे’ या संकल्पनेपलीकडची खूप मोठी गोष्ट आहे. या विश्वबंधुत्त्वाची भावना विश्वासाठी अजरामर ठरते. (क्रमश:)

 
 
डॉ. शुभांगी पारकर

प्रो. डॉ. शुभांगी रघुनाथ पारकर

प्रोफेसर डॉ शुभांगी रघुनाथ पारकर, या एमबीबीएस, एमडी, पीएचडी, ज्येष्ठ मनोचिकीत्सक आणि आंतरराष्ट्रीय संशोधक असून. केईएम हॉस्पिटल, मुंबई येथे माजी अधिष्ठाता होत्या. जागतिक पातळीवर संशोधन लेखनासाठी त्याना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मनोविकार, मानसिक आरोग्य आणि सकारात्मक मानसशास्त्र या विषयांवर विविध वृत्तपत्रांत आणि दिवाळी अंकात विपुल लेखन करत जनजागृती करत असतात.