नवी दिल्ली: भारत आणि बांगलादेश दरम्यान धावणारी 'मिताली एक्सप्रेस' या ट्रेनचे वेळापत्रक रेल्वेने जाहीर केले असून, दोन्ही देशांमधली प्रवासी रेल्वे सेवा १ जूनपासून सुरु होणार आहे. ही ट्रेन आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे. आगामी काळामध्ये 'मिताली एक्सप्रेस' भारत आणि बांगलादेशमधले संबंध अधिक दृढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
मार्च २०२० मध्ये कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून कोलकाता आणि बांगलादेश शहरांदरम्यानची रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. २९ मे रोजी ढाका ते कोलकाता धावणाऱ्या फ्रेंडशिप एक्स्प्रेस आणि बंधन एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने जारी केले आहेत.
या संदर्भात माहिती देताना रेल्वेचे सीपीआरओ सब्यसाची डे म्हणाले की, भारतीय रेल्वे ही ट्रेन सेवा सुरू करण्यास तयार आहे. कायमस्वरूपी इमिग्रेशन चेकपोस्ट स्थानकावर स्थापित करण्यात आले आहे. प्रवाश्यांच्या सुरक्षिततेसाठी मेटल डिटेक्टर गेट आणि लगेज स्कॅनरची व्यवस्था करण्यात आली आहे.