नवी दिल्ली : भारतीय सुरक्षा दलांनी पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरमध्ये होणारा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. पाकिस्तानकडून ड्रोनच्या माध्यमातून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला जात होता. या पाकिस्तानी ड्रोनच्या माध्यमातून काश्मीरमध्ये घातपात घडवण्याचा पाकिस्तानचा हेतू होता पण भारतीय जवानांच्या सजगतेने हा प्रयत्न निष्फळ झाला आहे. जम्मू काश्मीरच्या कठुआ भागात हा घुसखोरीचा प्रयत्न चालू होता.
या ड्रोनला ७ अंडर बॅरेल ग्रेनेड लॉन्चर आणि ७ मॅग्नेटिक बॉम्ब लावण्यात आले होते. राजबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा ड्रोन घिरट्या घालत होता, हा ड्रोन पाडल्यानंतर याची कसून चौकशी करण्यात आली आणि त्यातून ही माहिती उघड झाली. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाकिस्तानकडून सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न केले जात असल्याचे उघड झाले आहे. भारतीय सुरक्षा दलांच्या सतर्कतेने आतापर्यंत असे अनेक प्रयत्न हाणून पाडले गेले आहेत.