गाओ यूशेंग हे चीनचे युक्रेनमधील राजदूत म्हणून काम करत होते. नुकतेच त्यांनी रशिया-युक्रेन युद्धाबद्दल त्यांचे स्वतःचे मतप्रदर्शन केले होते. मात्र, गाओ युशेंग यांचा ब्लॉग प्रसिद्ध होताच, पुढील ३० मिनिटांमध्ये तो मागे घेण्यात आला. पण त्या ब्लॉगमधील मजकुराची अनेकांनी नोंद घेऊन ठेवली होती. गाओ युशेंग यांच्या त्या ब्लॉगवरील लेखातील त्यांची निरीक्षणे लक्षवेधी आणि माहितीपूर्ण असल्याचे दिसते. तीच निरीक्षणे खाली नोंदविली आहेत.
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला आता अडीच महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. पण या युद्धामध्ये कोण जिंकते आहे, कोणाचे किती नुकसान झाले आहे, याबद्दल वेगवेगळ्या बातम्या येताना दिसतात. अमेरिकन आणि युरोपियन माध्यमे यांची जास्त चलती असल्याने रशिया कसा या युद्धामध्ये अडकला गेला आहे, यासंदर्भात तावातावाने बोलताना दिसतात. रशियाचे किती सैनिक या युद्धात मरण पावले आणि रशियाची किती शस्त्रास्त्रे युक्रेनच्या सैनिकांकडून जप्त करण्यात आली, याचेच वर्णन करताना दिसतात. दुसरीकडे रशियाच्या विविध माध्यमांतील प्रचारयंत्रणा अमेरिका आणि त्यांच्या युरोपातील मित्रदेशांच्या तुलनेत खूप मागे पडत असल्याचे दिसून येते. रशियाच्या ‘आरटी’ अर्थात ‘रशियन टेलिव्हिजन’ या आंतरराष्ट्रीय इंग्रजी वाहिनीचे काम, तर अनेक दिवस बंदच पडलेले दिसून आले होते.
रशियाचे एक जहाज बुडविण्यात युक्रेन कसा यशस्वी झाला, त्याबद्दल पाश्चिमात्य माध्यमे जोरकसपणे बोलताना दिसतात. रशियाकडून अनेक प्रतिदावे केले जातात. मारियोपॉल रशियाने कसे जिंकले, याबद्दलही बातम्या येताना दिसतात. पण रशियाने गेल्या नोव्हेंबरपासून युक्रेनच्या सीमेवर लष्कराची जमवाजमव सुरू केली होती आणि त्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी म्हणजे फेब्रुवारीत या युद्धाला तोंड फुटले, हे सर्व जगाने बघितले होते. रशियाने ज्या अपेक्षेने या युद्धाला तोंड फोडले होते आणि त्याला ज्या गतीने चढाई यशस्वी करावयाची होती, त्याचा अंदाज बांधण्यात रशियाची गफलत झाली का, असे अनेकांना प्रश्न पडलेले आहेत.
चीन हा रशियाचा निकटतम सहकारी देश असल्याचे भासवत असला आणि त्याची रशिया-युक्रेन युद्धाबद्दल काहीही जाहीर मते असली, तरी चीनमधील कम्युनिस्ट पक्षाचे रशिया आणि त्याचे युक्रेनवरील आक्रमण किती यशस्वी झाले, याबद्दल वेगळी मते असावीत, असे दिसते. एरवी चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या ओठातील आणि पोटातील असणारी मतमतांतरे शोधावयाची, तर कोणी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा पदाधिकारी चुकूनमाकून एखाद्या माध्यमात व्यक्त झाला तर चीनच्या कम्युनिस्ट पक्षातील अंतर्गत मतप्रदर्शनातील विरोध समोर येताना दिसतो. चीनचेही या युद्धाकडे पहिल्यापासून बारीक लक्ष आहेच. पुढेमागे तैवानवर आक्रमण करावयाचे असेल तेव्हा जगातील अमेरिका, युरोप आणि इतर देशांचा काय प्रतिसाद असेल, कोणकोणते निर्बंध लागू शकतात, याचा चीनकडून अभ्यास केला जात असेलच. युद्धामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रत्यक्ष युद्धभूमीपेक्षा इतर कोणकोणती आयुधे वापरावी लागतील आणि तसेच आंतरराष्ट्रीय निर्बंधांना तोंड देण्यासाठी कशी तयारी करावी लागेल, याचा एक चांगला वस्तुपाठ चीनला मिळाला असेल.
सध्या चीनकडून रशिया-युक्रेन युद्धाबद्दल बर्यापैकी सोईस्कर मौन बाळगलेले दिसून येते. संयुक्त राष्ट्रांची संघटना असो की, इतर आंतरराष्ट्रीय मंचावर चीन रशियाच्या मागे ठामपणे उभा असलेला दिसतो. गाओ यूशेंग हे चीनचे युक्रेनमधील राजदूत म्हणून काम करत होते. ७५ वर्षांचे अनुभवी मुत्सद्दी म्हणून ते ओळखले जातात. नुकतेच त्यांनी रशिया-युक्रेन युद्धाबद्दल त्यांचे स्वतःचे मतप्रदर्शन केले होते. हे मतप्रदर्शन त्यांनी त्यांच्या एका अंतर्गत वेबिनारमध्ये केले होते. ‘चायना इंटरनॅशनल फायनान्स ३० फोरम’ आणि ‘चायनीज अकॅडमी ऑफ इंटरनॅशनल सायन्सेस’ या चीनमधील संस्थांनी या वेबिनारचे आयोजन केले होते.
त्यांनी या वेबिनारमध्ये मांडलेले मुद्दे त्यांच्या चीनमधील संकेतस्थळावर एका ब्लॉगच्या रूपात प्रसिद्ध केले. गाओ युशेंग यांना खरोखरच त्यांचे हे मतप्रदर्शन प्रसिद्ध करावयाचे होते की नाही, हे स्पष्ट नाही. पण एका निमसरकारी वृत्त चित्रसंस्थेने या मतप्रदर्शनाचा सारांश प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये त्यांनी रशिया आणि युक्रेन युद्धाबद्दल त्यांची स्वतःची निरीक्षणे नोंदविली होती. चीनमध्ये वैयक्तिक मते मांडावयाला परवानगी नसते. जी भूमिका चीनच्या कम्युनिस्ट पक्षाची त्याच भूमिकेशी चिकटून राहावे लागते. गाओ युशेंग यांचा ब्लॉग प्रसिद्ध होताच, पुढील ३० मिनिटांमध्ये तो मागे घेण्यात आला. पण त्या ब्लॉगमधील मजकुराची अनेकांनी नोंद घेऊन ठेवली होती. गाओ युशेंग यांच्या त्या ब्लॉगवरील लेखातील त्यांची निरीक्षणे लक्षवेधी आणि माहितीपूर्ण असल्याचे दिसते. तीच निरीक्षणे खाली नोंदविली आहेत.
१. सोव्हिएत रशियाचा पाडाव झाल्यापासून आणि त्याची शकले होऊन जे अनेक देश तयार झाले तेव्हापासून रशियाची अधोगती सुरू असून तो अधिकाधिक आक्रसत चालला आहे. मग त्यासाठी आंतरराष्ट्रीय आर्थिक निर्बंध असोत की इतर काही. त्यामुळे पुतीन यांच्या नेतृत्वाखाली रशियाचे पुनरुत्थान अवघड आहे. रशियाच्या अर्थव्यवस्थेचा आकार आणि त्यांची लष्करी क्षमता यांचा मेळ बसत नाही.
२. रशियाकडून ज्या वेगाने युद्ध जिंकणे अपेक्षित होते, त्यापेक्षा आता इतका वेळ युद्धाच्या आघाडीवर लागत असेल तर रशिया हे युद्ध हरल्यात जमा आहे. इतक्या लांबत चाललेल्या युद्धाला रशिया तोंड देऊ शकत नाही.
३. रशियाच्या लष्करी ताकदीला युक्रेन आणि त्याच्या मित्रपक्षांनी समर्थपणे तोंड दिलेले आहे. थोडक्यात, रशियासाठी युक्रेनवरील आक्रमण म्हणजे हा ‘केक वॉक’ नव्हता, हे सिद्ध झालेले आहे.
४. सध्याचे युद्ध हे एकाचवेळी विविध आघाड्यांवर लढावे लागते आणि त्या प्रत्येक आघाडीवर सारख्याच क्षमतेने उभे राहावे लागते. जमिनीवरील लष्कराची हालचाल, लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, शत्रूची आर्थिक नाकाबंदी, आंतरराष्ट्रीय संबंधातील मुत्सद्देगिरी, सामान्य जनतेचा प्रतिसाद, प्रचाराचे तंत्र आणि त्यावरील हुकूमत, खात्रीचा माहितीस्रोत उपलब्ध असणे, युद्धाला कधी विराम देणे आणि युद्धातून बाहेर पडणे याबद्दल तयार नसणे यामुळे रशिया हे युद्ध हरल्यात जमा आहे, अशी टिप्पणी करण्यात आलेली आहे.
५. रशियाने त्याचे स्वतःचे सामरिक महत्त्व आणि नेतृत्व गमावले आहे.
६. रशियासाठी हे युद्ध म्हणजे ’जड झाले ओझे’ अशी स्थिती आहे.
या युद्धानंतर रशिया लष्करीदृष्ट्या दुर्बळ झालेला दिसेल, असे गाओ युशेंग म्हणतात. या मतप्रदर्शनाचे आपल्यासाठी महत्त्व एवढेच की, चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या पोलादी भिंतीआड कशाप्रकारे विचार केला जातो, तसेच भविष्यात चीनकडून विस्तारवादाच्या आडून आक्रमण होत असताना चीनकडून किती विविध अंगांनी विचार केला जातो, याची माहिती व्हावी एवढेच. पण बीजिंगने जाहीरपणे रशियाच्या बाबतीतील त्यांची वेगळी दिखाऊ भूमिका कायम ठेवलेली दिसते आहे. बाहेरून चीन आणि रशिया ही दोस्त राष्ट्रे वाटत असली, तरी या मतप्रदर्शनानंतर दोन्ही देशांच्या संबंधातील गुंतागुंत दिसून येते. या युद्धानंतर पश्चिमेकडील देशांचा जागतिक प्रभाव वाढेल आणि संयुक्त राष्ट्रांच्या संरचनेत बदल झालेला दिसून येईल, असे ते म्हणतात. रशिया हा चीनचा कनिष्ठ सहकारी झालेला यापुढील काळात दिसून येईल, असे ते म्हणतात. पण चीनच्या कम्युनिस्ट पक्षातील अनेक मुत्सद्द्यांचा रशियाला भरपूर पाठिंबा आहे.
- सनत्कुमार कोल्हटकर