स्मशानशांततेत क्रांती करणारा अवलिया

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2022   
Total Views |

Atish Sirsat
 
 
 
स्वतः झोपडपट्टीत राहूनही त्याने आपले आयुष्य रस्त्यावरील मनोरूग्ण, बेवारस आणि निराधारांसाठी वाहून घेतले. जाणून घेऊया सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ता आतिश सिरसट याच्याविषयी...
 
 
 
लापूर शहरातील झोपटपट्टीमध्ये जन्मलेल्या आतिश लक्ष्मण सिरसट याचे वडील सोलापूर मनपामध्ये सफाई कामगार. मात्र, तुटपुंज्या पगारात घर चालवणे मुश्किल असल्याने आई कविता धुणीभांडी करत. रासचंडक हायस्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करताना त्याला देशपांडे गुरूजींच्या मार्गदर्शनाने वाचनाची गोडी लागली. आईवर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे डोक्यावर कर्जाच्या बोजामुळे आतिशची दहावीची २५० रूपये फी वडिलांनी पैशांची जमवाजमव करून भरली. या गोष्टीवरून धडा घेत त्याने दयानंद महाविद्यालयामध्ये प्रवेश घेत एका रुग्णालयात रिसेप्शनिस्टची नोकरी सुरू केली. बारावीनंतर ‘बीए’साठी प्रवेश घेत पोलीस भरतीसाठी सराव सुरू केला. मात्र, त्यात अपयश आले. महाविद्यालयात त्याची नेतृत्व करण्याची क्षमता उभारून आली. मानसशास्त्राचे प्राध्यापक सेवानिवृत्त झाल्याने पद रिक्त होते. परीक्षा जवळ आल्या होत्या. त्यावेळी आतिशच्या आंदोलनाने रिक्त पद भरले गेले. यानंतर आतिश सोलापूर महापालिकेशी निगडीत एका खासगी कंपनीत नोकरी करू लागला. दरम्यान, जेवणानंतर आतिश फेरफटका मारायला जात. त्यावेळी एके दिवशी त्याला मनोरूग्ण तरूणी दिसली. त्याने तिला एक वडापाव दिला, पण त्या मनोरूग्ण तरूणीने तो बाजूला ठेवून दिला. २०-२५ दिवस खायला देऊनही ती तरूणी काहीही खात नव्हती. एके दिवशी आतिशने तिचे गाठोडे उघडून पाहिल्यानंतर त्यात अन्नाची साठवणूक केल्याचे आढळून आले. एकदा आतिशने तिला तलावातील गढूळ पाणी पिताना पाहिले आणि तो अस्वस्थ झाला. पुरूष असल्याने आतिशला तिची मदत करणे अवघड झाले. पोलीस, सामाजिक संस्था, रुग्णालयांकडूनही सकारात्मक प्रतिसाद आला नाही. शेवटी एका काकडी विकणार्‍या महिलेच्या साहाय्याने मनोरूग्ण तरूणीला अंघोळ घातली गेली. बाहेरून आणलेलं काहीही खात नसल्याने आतिशने तिला घरचं जेवण आणलं. मात्र, ती तेही खात नव्हती. तेव्हा आतिशने घरून डबा नेला आणि दोन-तीन घास तिच्यासमोर खाल्ले. तेव्हा त्या तरूणीने डबा हिसकावून अधाशासारखा संपवला. आतिशच्या पाणावलेल्या डोळ्यांसमोर तिच्या पुनर्वसनाचा प्रश्न होता. त्याने मनोरूग्णांसाठी काम करणार्‍या संस्थांचा शोध सुरू केला.
 
 
 
तेव्हा, त्याची कोल्हापूरच्या अमित प्रभा वसंत यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांच्या संदर्भाने आतिशने कर्जतच्या ‘श्रद्धा पुनर्वसन केंद्रा’शी संपर्क साधत त्या तरूणीला तिथे हलवले. एका महिन्यात आतिश तिला पुन्हा भेटायला गेला. तेव्हा त्या तरुणीने आतिशला स्वतःच्या हाताने बनवलेली पोळी खाऊ घातली. एका मनोरूग्ण तरुणीचा इतका कायापालट झाल्याने आतिश समाधानी होता. अधिक चौकशीनंतर त्या तरुणीला कर्नाटकातील बागलकोटला तिच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आले. यानंतर आतिशने आठ मनोरूग्ण महिलांचा शोध घेतला. यामध्ये नग्न, जखमी, कचराकुंडीत राहणार्‍या महिलांचा समावेश होता. त्यांचेही पुनर्वसन करण्यात त्याला यश आले. आतिशचे नाव जिल्ह्यात परिचित झाले. आक्रमक स्वभावामुळे मनोरूग्णांना जेवण मिळत नाही, त्यामुळे तो आणि तिची पत्नी राणी हे दोघेही पगारातील काही पैसे बाजूला काढून मनोरूग्णांना मोफत जेवण देऊ लागले. संस्थेची नोंदणी नसल्याने आतिशला या कामात अडचणी आल्या. तेव्हा तो संस्थेची नोंदणी करायला गेला. मात्र, झोपडपट्टीत राहत असल्याने सातबाराअभावी तो प्रयत्न असफल झाला. तेव्हा दीपा देशमुख आणि सुनीता क्षीरसागर यांच्या सहकार्याने आतिशने ‘असंभव फाऊंडेशन’ची नोंदणी केली. २०१७ साली केंद्र शासनाच्या ‘शेल्टर होम’ प्रकल्पासाठी पालिकेने आतिशची मदत घेतली. त्यावेळी आतिशने ६६४ जण शोधले आणि त्यातील २५० लोकांचे पुनर्वसन झाले. हळूहळू आतिशसोबत अनेक सहकारी जोडले गेले.
 
 
 
एकदा सातरस्ता भागातील रात्री एक मनोरूग्ण प्रचंड जखमी अवस्थेत आढळला. त्याच्या जखमा पाहण्यासाठी त्याला निर्मनुष्य ठिकाणी नेऊन स्वच्छ करणे आवश्यक होते. मात्र, त्याला नेणार कुठे हा प्रश्न होता. शेवटी आतिशने त्याला जवळच्या स्मशानभूमीत नेऊन अंघोळ घातली. त्याच्या शरीरावर पूर्णतः अळ्यांचा वावर होता. त्यानंतर त्याचेही पुनर्वसन करण्यात आले. जी संस्था मनोरूग्णाला घेण्यास तयार होते, तिथे आतिश रुग्णाला पाठवतो. आतापर्यंत आतिशने २५० मनोरूग्णांचे पुनर्वसन करूनस त्यातील १२० जणांना त्यांच्या घरी पाठवले. एकदा त्याच्या डोक्यात मनोरूग्णाने दगड घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, आतिश वाचला. आतिशला आकाश बनसोडे, ब्रिजेश कासट, नुसरत खान, अंजली वाघमारे, सपना हैदराबादवाले, अस्मिता गायकवाड, रूपाली हुंडेकरी, योगेश पवार यांचे सहकार्य मिळते. तत्कालीन पोलीस आयुक्त हरिष बैजल यांनीही आतिशला अनेकदा त्यांची गाडी याकामी दिली. मनोरूग्णांसाठी हक्काचा निवारा उभारण्याचा आतिशचा मानस आहे. वेळप्रसंगी कर्ज काढून, दागिने गहाण ठेवून, उपाशी राहून मनोरूग्ण, बेवारस आणि निराधारांसाठी आधार बनणार्‍या आतिशला आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा!
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@