मुंबई: ईडीकडून कारवाई सुरु झाल्यानंतर दापोलीतील रिसॉर्टशी माझा कोणताही संबंध नाही, असा दावा करणारे शिवसेना नेते अनिल परब यांच्याविरुद्ध भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नवे पुरावे समोर आणले आहेत.
अनिल परब दापोलीतील रिसॉर्ट माझ्या मालकीचे नसून हे रिसॉर्ट सदानंद कदम यांचे असल्याचा दावा करत आहेत. मग डिसेंबर २०२० मध्ये अनिल परब यांनी या रिसॉर्टच्या जागेचा मालमत्ता कर का भरला, असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. ते शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली. हे दोन्ही नेते नाटकी आणि खोटारडे आहेत. महाराष्ट्राने आजवर असला लुच्चा मुख्यमंत्री पाहिला नसल्याचेही सोमय्या यांनी म्हटले. ईडीच्या धाडीनंतर अनिल परब म्हणतात, ते कशासाठी आले होते ते माहिती नाही. यावेळी सोमय्या यांनी अनिल परब यांनी १७ डिसेंबर २०२० रोजी मुरूड ग्रामपंचायतीमध्ये अनिल परब यांनी रिसॉर्टच्या जागेसाठी मालमत्ता कर भरल्याची पावती सादर केली. याशिवाय, डिसेंबर २०१९ मध्येही अनिल परब यांनी रिसॉर्टच्या जागेचा मालमत्ता कर, घरपट्टी आणि दिवाबत्ती कर भरल्याचे पुरावे सोमय्या यांनी सादर केले. हे रिसॉर्ट सदानंद कदम यांच्या मालकीचे असेल तर मग अनिल परब यांनी मालमत्ता कर भरलाच का, असा सवाल सोमय्या यांनी विचारला.
उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांना माफियागिरी आणि फसवणूक करण्यासाठी नोबेल पुरस्कार मिळायला पाहिजे. मुरूडमधील घर क्रमांक १०६२ हे अनिल परब यांच्या नावावरच आहे. हा भूखंड १६८०० स्क्वेअर फुटांचा असून त्याची बाजारभावानुसारची किंमत तब्बल २५ कोटी रुपये इतकी आहे. २ मार्च २०२० रोजी करोनाची साथ असताना अनिल परब यांनी या रिसॉर्टसाठी वीजेचा मीटर मिळवण्यासाठी महावितरणकडे अर्जही केला होता. अनिल परब यांना आता तुरुंगात बसून हा सगळा कबुलीनामा लिहावा लागेल. तुरुंगात जाणारा पुढचा नेता कोणता, असे तुम्ही मला नेहमी विचारता. आता मी सांगू इच्छितो की, आता या कारवाईची सुरुवात यशवंत जाधव यांच्यापासून होणार आहे. कंपनी मंत्रालयाने यासंदर्भात गुन्हे नोंदवून कारवाईला सुरुवात केल्याचे सोमय्या यांनी म्हटले.