अग्निशिखा येसूवहिनी...

    27-May-2022
Total Views |

veer savarkar

 
 
 
येसूवहिनींची पुण्याई म्हणावी की प्रारब्ध हे कळत नाही, पण वयाच्या १३ व्या वर्षी पूर्वाश्रमीची सरस्वती फडके सावरकरांच्या घराण्याची सून झाली. पुण्याई यासाठी, कारण सावरकरांकडे वतनदारी होती. त्यामुळे सधन कुटुंबात येसूवहिनींचा गृहप्रवेश झाला. मात्र, प्रारब्ध यासाठी, कारण गृहलक्ष्मीने प्रवेश केल्यानंतर काही काळातच वैभवलक्ष्मीने सावरकरांच्या घराकडे पाठ फिरवली. मात्र, या दोन्ही स्थितीत ही माऊली आदर्श गृहिणी, आदर्श पत्नी आणि त्याही पुढे जाऊन सांगायचे, तर आदर्श वहिनी ठरली. वहिनी केवळ सावरकर बंधूंचीच नाही, तर अखिल महाराष्ट्राची, भारत देशाची! अशा या अग्निशिखा येसूवहिनींविषयी...
 
 
माहेरचे अंगण सोडून सासरी आलेल्या येसूवहिनींवर संपूर्ण घराची जबाबदारी होती. विनायक भावजी समवयस्क होते, तर नारायण धाकट्या भावासारखे. पती गणेश सावरकर उर्फ बाबाराव यांच्या वयात अंतर असल्याने बोलण्यात फारशी मोकळीक नव्हती. पण, आदरयुक्त भीती होती. बाबारावांनी ‘सरस्वती’ नाव असलेल्या फडकेंच्या कन्येचे सासरचे नाव ‘यशोदा’ ठेवले आणि हीच यशोदा पुढे ‘येसूवहिनी’ झाली.
 
 
 
त्यांचा आणि बाबारावांचा संसार सर्वसाधारण नाहीच. बाबारावांना योगअभ्यासामुळे विरक्ती आली होती. परंतु, त्याच दरम्यान ‘प्लेग’ची साथ आली आणि सासर्‍यांना देवाज्ञा झाली. संसाराचा भार बाबारावांवर येऊन पडला, तर दिरांच्या संगोपनाची जबाबदारी येसूवहिनींवर! त्यामुळे बाबारावांचे पाय संसारात स्थिरावले आणि येसूवहिनींचा जीव भांड्यात पडला. सासर्‍यांच्या मृत्यूनंतर वतनदारी धोक्यात आली. नाशिकच्या घरावर जप्ती आली. गाव सोडावे लागले आणि गाठ पडली ती अठराविश्वे दारिद्य्राशी!
 
 
 
घरात क्रांतीचे वारे वाहत होते. बाबारावांना ठरावीक उत्पन्न नव्हते. अशातच दोन्ही दिरांचे शिक्षण सुरू होते. त्यात खंड पडू नये आणि दोन वेळच्या जेवणाची आबाळ होऊ नये, म्हणून येसूवहिनींनी एकेक करून आपले माहेरचे सगळे दागिने मोडले. शेवटी शेवटी तर नारायणरावांच्या वैद्यकीय शिक्षणाच्या वेळी नथ विकावी लागली. दागिने तर गेलेच होते. परंतु, सौभाग्याची खूण म्हणून हातात असलेल्या काचेच्या हिरव्या बांगड्या स्वदेशी नाहीत, म्हणून त्यांनी काळ्या मण्यांची पोत दोर्‍यात गुंफून मनगटावर बांधली.
येसूवहिनींचे चरित्र म्हणजे ब्रिटिशांनी न सुनावलेली, परंतु नियतीने दिलेली काळ्या पाण्याची शिक्षाच! बाबाराव आणि तात्यारावांप्रमाणे त्यांनीही ती निमूटपणे सोसली. त्यांच्या वाट्याला आलेले दु:खाचे डोंगर सरता सरत नव्हते. सुखाच्या आशेपायी त्यांनी कित्येक नवसायास केले, पूजाअर्चा केली. परंतु, त्यांच्या सुखाला ग्रहण लागले होते. त्याही परिस्थितीत त्या धैर्य एकवटून जगत होत्या. आयुष्य कंठत होत्या...
 
 
 
बाबारावांचा एक पाय घरात तर दुसरा तुरुंगात. तुरुंगातून सुटका झाली, तरी घरी आल्यावर पुढच्या स्वातंत्र्यलढ्याची मोर्चेबांधणी सुरू! त्यामुळे ब्रिटिशांची पाळत सतत त्यांच्यावर असे. ते कमी म्हणून की काय, तात्यारावांनी ’अभिनव भारत’, ’मित्रमेळा’ अशा क्रांतिकारी संघटना सुरू केल्या. विलायतेत जाऊन वकिलीचे शिक्षण आणि त्याचबरोबर तेथील क्रांतिकारकांची मोट बांधायची असे ठरवले. परदेशात जाण्यासाठी आर्थिक पाठबळ देणारे सासर लाभले आणि यमुनाबाई सावरकर यांच्या रुपाने येसूवहिनींना जाऊ नव्हे, तर धाकटी बहीण आणि हितगुज करणारी मैत्रीण मिळाली. तात्याराव परदेशात गेले असताना, येसूवहिनींनी यमुनेचा अर्थात माईंचा प्रेमाने सांभाळ केला. माईसुद्धा अतिशय लाघवी असल्याने त्यांची येसूवहिनींशी छान गट्टी जमली. दोघींची एकमेकींना सोबत होती.
 
 
 
माईंचे माहेर सधन होते, त्या तुलनेत सासरची परिस्थिती अगदी उलट! या गोष्टीचे येसूवहिनींनाच जास्त वाईट वाटे. त्या कोंड्याचा मांडा करून घरच्यांना जेवायला वाढत आणि स्वत:साठी काही शिल्लक राहिले नाही की, कधी एकादशीचा, तर कधी संकष्टीचा, तर कधी वार सांगून उपास घोषित करत. आपली कूस रिकामी झाली, तरी माईंच्या मांडीवर प्रभाकर आला, त्याचा येसूवहिनींनाच कोण आनंद! त्याला न्हाऊ घालण्यापासून मऊ भात भरवण्यापर्यंत सगळ्या गोष्टी येसूवहिनी आनंदाने करत असत. मात्र, प्रभाकर अल्पकाळातच ’देवाघरी खेळायला’ गेला तेव्हा येसूवहिनींनी पोटच्या पोराला गमावल्यासारखा आक्रोश केला.
 
 
 
ब्रिटिशांचे सावट होतेच. कवी गोविंद यांचा कवितासंग्रह प्रकाशित केल्याबद्दल बाबारावांना अंदमानची कोठडी मिळाली. त्यावेळेस तात्याराव परदेशात आणि नारायणराव भूमिगत असताना या दोन मानी स्त्रिया बेघर झाल्या. अशात माईंना त्रास होऊ नये, म्हणून येसूवहिनींनी त्यांना माहेरी पाठवले. मात्र, येसूवहिनींनी आपल्या एकुलत्या एक मामाकडे आश्रय मागितला असता, त्यांना घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यावेळेस दारोदार भटकत येसूवहिनी मंदिराच्या पायरीवर विसावल्या.
 
 
 
येसूवहिनींची शिक्षणाची ओढ पाहून तात्यारावांनी त्यांना अक्षरओळख करून दिली होती. त्याचेच फलित म्हणून येसूवहिनींनी देशकार्यात सहभाग घेतला. त्यांच्यासारख्याच स्वातंत्र्यसेनानींच्या एकाकी पडलेल्या स्त्रियांना संघटित करून ’आत्मनिष्ठ युवती संघा’ची स्थापना केली. ३०० -३५०  जणींनी एकत्र येऊन ‘स्वदेशी मालाचा पुरस्कार’, सुतकताई, देशभक्तीपर गीते, ‘केसरी’तील अग्रलेखांचे वाचन इ. उपक्रम राबवले. या चळवळींमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना कधी कधी वैयक्तिक दु:खाचा विसर पडे.
मात्र, अन्नान्न दशा होऊनही येसूवहिनींनी कधीच देवाला किंवा दैवाला दूषणे दिली नाहीत. आपले प्रत्येक कार्य ईश्वराला साक्ष ठेवून त्या सचोटीने करत राहिल्या. या काळात कित्येक दिवस बाबारावांचे दर्शनही घडत नसे. एके दिवशी एका तुरुंगातून दुसर्‍या तुरुंगात बाबारावांना स्थलांतरित करणार असल्याची वार्ता कळली, तेव्हा क्षणिक दर्शन मिळेल या आनंदात त्या डोळ्यांत प्राण एकवटून वाट पाहू लागल्या. मात्र, ब्रिटिश सरकारने बाबारावांना तोंडावर काळे फासून गाढवावार धिंड काढणार असल्याचे कळले, तेव्हा येसूवहिनींनी आपली पंचेंद्रिये आक्रसून घेतली.
 
 
 
बाबारावांना सुटका मिळावी म्हणून त्यांच्या देवघरातील देवांना कितीतरी वेळा पाण्याखाली मुक्काम करावा लागला. मात्र, बाबारावांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली, तेव्हा त्याही स्थितीत त्या कर्तव्याला चुकल्या नाहीत. आज ना उद्या परिस्थिती बदलेल, या आशेवर त्या जगत होत्या. धाकट्या नारायणरावांचे शांताबाईंशी लग्न लावून दिले. स्वतः मात्र बाबारावांच्या भेटीसाठी तिष्ठत राहिल्या.
 
 
 
या सर्व परिस्थितीत त्यांच्या आरोग्याची प्रचंड हेळसांड झाली. जगण्याची उमेद संपली होती. फक्त डोळे मिटण्यापूर्वी बाबारावांची भेट घडावी, हे त्यांचे शेवटचे मागणे होते. त्यानुसार ब्रिटिशांकडे कित्येक आवेदनं केली. मात्र, ते फोल ठरले. शेवटच्या काळात तर त्यांना बाबाराव आल्याचे भास होत असत. अंगात त्राण नसतानाही त्यासारख्या दाराकडे झेपावत. धाकट्या जावांना आरतीचे ताम्हन आणायला सांगत. बाबारावांच्या नावाचा जप करत, दाराकडे डोळे लावत वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी त्या पंचतत्त्वात विलीन झाल्या. त्यांच्या मृत्यूपश्चात ब्रिटिशांनी क्रूर थट्टा केल्यागत त्यांना बाबारावांच्या भेटीची संमती देणारे पत्र पाठवले.
बाबाराव आणि येसूवहिनींचा संसार सुखासुखी होऊ शकला नाही. परंतु, त्यांनी केवळ स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नारायणराव यांचेच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांचे संसार मार्गी लावले.
 
 
 
देशप्रेमाने भरलेली आणि भारावलेली ही मंडळी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी संसारावर तुळशीपत्र ठेवून हुतात्मा झाली. त्यांचे बलिदान व्यर्थ ठरू नये आणि त्यांचे कार्य विस्मरणात जाऊ नये, ही आपली जबाबदारी, अशा या स्वातंत्र्यसमर थरार नाट्याच्या रंगमंचावरील आणि पडद्यामागील समस्त कलाकारांना शत शत प्रणाम!
 
 
- भैरवी गाडगीळ