आपले आराध्य दैवत प्रभू रामचंद्र महापराक्रमी तर आहेतच. त्यांच्या पुढे उभे राहायला काळालाही भीती वाटते. पण, एवढ्याने त्याचे वर्णन होत नाही. विश्वातील जे जे काही उत्तम गुण आहेत, ते सारे रामाच्या ठिकाणी एकवटले आहेत. पराक्रम, चारित्र्यसंपन्नता, न्यायप्रियता, भक्तांचे रक्षण, दुष्टदुर्जनांचा संहार हे गुण रामाला पाहता क्षणीच जाणवतात. समर्थांच्या काळी म्लेंच्छांच्या विध्वंसक कारवायांमुळे सर्वत्र हिंदू समाजाची वाताहत झालेली होती.
राज्यसत्ता म्लेंच्छांकडे असल्याने तक्रार तरी कोणाकडे करायची? त्या राज्यकर्त्यांकडून न्यायाची अपेक्षा करता येत नव्हती. अन्याय-अत्याचार सहन करत, नशिबी आहे ते मुकाट्याने सहन करणे एवढाच मार्ग होता. सर्व बाबतीत हिंदू प्रजेचा आत्मविश्वास हरवला होता. अशावेळी शिवछत्रपतींचा उदय झाला. त्यांनी विश्वासू मावळे एकत्र करून मुसलमानी राजवटीला आव्हान देत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. गडकिल्ले परत मिळवायला सुरुवात केली. महाराष्ट्रातील हिंदूप्रजेचा आत्मविश्वास हळूहळू परत येऊ लागला. इकडे समर्थ रामदासांनी स्वामिनिष्ठ मराठे तयार करण्यासाठी हरिकथा निरुपणातून लोकांना एकत्र आणायला सुरुवात केली. लोकांना राम व हनुमानाच्या उपासनेला लावले. ‘समर्थचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे?’ असे सांगून येऊ पाहणार्या निर्भयतेला आत्मविश्वासाला तात्त्विक आधार मिळवून दिला.
हे तात्त्विक अधिष्ठान शिवछत्रपतीच्या सैनिकांपेक्षा सामान्यजनांना आवश्यक होते. मुसलमानांची धाड आली की, ते लुटालूट, तोडफोड, विध्वंस करून जात. त्यामुळे सामान्यजनांच्या मनात असा संभ्रम होता की, आपला देव आपल्यासाठी काही करत नाही. पण, हे म्लेंच्छ अनन्वित अत्याचार करीत असूनही त्यांचा देव मात्र त्यांना पाठीशी घालतो. अशा प्रसंगी हिंदू देवदेवता पराक्रमी व न्यायी असून ते आपल्या भक्तांकडे दुर्लक्ष करीत नाहीत, असे सांगणे जरुरीचे होते. तेही एखाद्या चारित्र्यसंपन्न सदाचारी व प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेल्या महान पुरुषाने सांगितले तरच लोक ऐकतील, अशी स्थिती होती. समर्थ रामदास त्यासाठी योग्य होते.
म्हणून समर्थांनी लोकांना सांगितले की, थोडा धीर धरा. आपले आराध्य दैवत प्रभू रामचंद्र महापराक्रमी आहे. ते आपल्याला या संकटातून बाहेर काढायला मदत करील. भक्तांचे रक्षण करणे हे त्यांचे ब्रीद आहे. आपण मात्र त्याच्यावर श्रद्धा ठेवून अनन्यभावे त्यांचे भक्त झाले पाहिजे. ते आपल्याला सामर्थ्य देतील. ते देवांचेही रक्षणकर्ते आहेत. मग, आपले रक्षण करणार नाही का? आपला देव आपल्यासाठी काही करत नाही, हा गैरसमज मनातून काढून टाका. पुढील श्लोकातून हे लोकांच्या मनावर बिंबवण्याचा समर्थ प्रयत्न करीत आहेत.
महा संकटीं सोडिले देव जेणें।
प्रतापें बळें आगळा सर्व गूणें।
जयातें स्मरे शैलजा शूळपाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥31॥
आपले आराध्य दैवत प्रभू रामचंद्र महापराक्रमी तर आहेतच. त्यांच्या पुढे उभे राहायला काळालाही भीती वाटते. पण, एवढ्याने त्याचे वर्णन होत नाही. विश्वातील जे जे काही उत्तम गुण आहेत, ते सारे रामाच्या ठिकाणी एकवटले आहेत. पराक्रम, चारित्र्यसंपन्नता, न्यायप्रियता, भक्तांचे रक्षण, दुष्टदुर्जनांचा संहार हे गुण रामाला पाहता क्षणीच जाणवतात. या रामाने देवांना मोठ्या संकटातून सोडवले आहे. मदोन्मत्त रावणाला त्याच्या शक्तीचा गर्व होता. कुणीही देव त्याला मारू शकणार नाही, असा वर रावणाला प्राप्त झाला होता. मानवाला तर तो कस्पटासमान समजत होता. त्यामुळे कोणी मानव त्याला मारू शकणार नाही, याची त्याला खात्री होती. रावणाने सर्व देवांना आपल्या बंदिवासात ठेवून त्यांना आपल्या सेवेत लावले. अशा वेळी परमात्म्याने राम अवतार घेऊन मानवी देह धारण केला आणि रावणाचा वध केला.
रामाने पराक्रम करून दुराचारी रावणाचा अंत केला आणि देवांना बंदिवासाच्या महासंकटापासून मुक्त केले. पराक्रमी राम हा सर्व गुणांनी युक्त असल्याने हातात त्रिशूल धारण करणारे महादेव शिवशंकर आणि त्यांची पत्नी पार्वती हे रामाचे नित्य स्मरण करीत असतात. रामनामाचे महत्त्व भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितले आहे. दोघेही रामनाम घेत असतात, असे पुराण सांगते. असे हे राम आपल्या दासाची उपेक्षा करीत नाही. रामाला नेहमी आपल्या दासाचा अभिमान असतो. समर्थांना हा संदेश तत्कालीन समाजात पोहोचवयाचा होता की, आपण सामर्थ्यशाली रामाचे दास बनून राहिलो, तर तो आपल्याला सामर्थ्य देऊन दुष्ट दुर्जन म्लेंच्छांपासून वाचवील. त्या संकटापासून आपली मुक्तता केल्याशिवाय तो राहणार नाही.
दासाभिमानी राम आपल्या दासांत, भक्तांत कधी भेदभाव करीत नाही. या पुढील श्लोकात स्वामी अपराधी अहिल्या उल्लेख करतात आणि हेच सांगतात-
अहिल्या शिळा राघवें मुक्त केली।
पदीं लागता दिव्य होऊनि गेली।
जया वर्णितां सीणली वेदवाणी।
नुपेक्षी कदा राम दासभिमानी ॥32॥
अहिल्या ही गौतम ऋषींची पत्नी होती. तिच्या सौंदर्यांवर मोहित होऊन इंद्राने कपट करुन तिला फसवले. त्यावर संतापलेल्या गौतम ऋषींच्या शापाने ती शिळा होऊन पडली. पण, नंतर गौतम ऋषींनी शांतपणे विचार केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, या सर्व प्रकारात अहिल्येचा काही दोष नाही. पण, शापवाणी तर निघून गेली होती. तेव्हा त्यांनी अहिल्येला उ:शाप दिला की, “प्रभू रामचंद्र जेव्हा या वाटेने जातील, तेव्हा त्यांच्या पदस्पर्शाने तुझा उद्धार होईल.” त्या निर्बीड अरण्यात ती शिळा होऊन अनेक वर्षे पडून राहिली. पुढे रामचंद्र विश्वामित्रांबरोबर सीता स्वयंवरासाठी मिथिलेला जात असताना वाटेत त्यांंना गौतमांचा आश्रम दिसला. विश्वामित्रांच्या सांगण्यावरून रामांनी त्या शिळेला पदस्पर्श करताच अहिल्या देह धारण करुन रामाच्या चरणी लागली. ती पतित, शापित होती, हा विचार न करता रामांनी तिचा उद्धार केला. राम आपल्या भक्तांत भेदभाव न करता अनाथांना संकटांपासून सोडवतो.
देव अनाथांचा कैपक्षी।
नाना संकटांपासून रक्षी। (दासबोध)
पापी भक्तांचाही राम तिरस्कार न करता उद्धार करतो. राम हा परब्रह्मस्वरुप असल्याने त्याचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात. परब्रह्माचे वर्णन वेदही करू शकले नाहीत. हे नाही, ते नाही असे करत करत वेदही परब्रह्माचे वर्णन करताना थकून जातात. अखेरीस वेदांनाही ‘नेति नेति’ असेच म्हणावे लागते. असा हा परब्रह्मरुप राम आपल्या भक्ताची कधी उपेक्षा करीत नाही. या भगवंताची लीला अगाध आहे. त्याचे वैभवही अफाट आहे. सृष्टीकडे नजर टाकली, तर त्याच्या वैभवाची, कर्तृत्वाची खात्री पटते.
वसे मेरुमंदार हे सृष्टिलीळा।
शशी सूर्य तारांगणे मेघमाळा।
चिरंजीव केले जनी दास दोन्ही।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥3॥
हे सारे भगवंताने निर्माण केले असल्याने, त्याचे वैभव आहे. मेरू मंदार यासारखे पर्वत त्यानेच निर्माण केले. पृथ्वीवर असलेला प्रचंड पाण्याचा साठा भगवंतानेच निर्माण केला आहे. पृथ्वीच्या बाहेर नजर टाकावी, तर ईश्वरीलीलेच्या कितीतरी गोष्टी नजरेत भरतात. ही अथांग विश्वाची पोकळी. त्यात असणारे चंद्र, सूर्य, असंख्य तारका, सारे एकमेकांशी अज्ञात बंधनाने बांधलेले आहेत. भले आपण त्याला गुरुत्वाकर्षण म्हणत असू, पण आकाशातील ग्रह तार्यांचे अचूक फिरणे अद्भुत म्हणावे लागेल. त्यांच्या गतीत क्षणाचाही फरक पडत नाही. हे वर्षानुवर्षे चालू आहे. सूर्य अनेक वर्षांपासून प्रकाश व उष्णता देत आहे. त्यात खंड पडत नाही. सूर्याच्या उष्णतेनेच समुद्रातील पाण्याचे ढग होतात. हे प्रचंड ढग पर्वताप्रमाणे भासतात. हा सारा सृष्टिचमत्कार म्हणजे भगवतांची लीला आहे. जोपर्यंत हे चंद्र-सूर्य-सृष्टी आहे तोपर्यंत रामांनी आपल्या दोन दासांना चिरंजीव करुन ठेवले आहे.तो भाग पुढील लेखात पाहता येईल...(क्रमश:)
- सुरेश जाखडी