मुंबई : "मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या जवळचा मंत्री अनिल परब हे मातोश्रीचे खजिनदार आहेत. सचिन वाझेच्या माध्यमातून कलेक्शन जमा करून ते मातोश्रीवर पोहोचवण्याचे काम परब करत होते. ईडीने केलेल्या कारवाईमुळे याच गोष्टीचा आता भांडाफोड होणार आहे. मराठी माणसांच्या टाळूवरचं लोणी खाणारे अनिल परब गजाआड होणार असे म्हटले तर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे कारनामेही लवकरच बाहेर निघतील.", अशी प्रतिक्रिया भाजप आमदार रवी राणा यांनी दिली. गुरुवार, दि. २६ मे रोजी अनिल परब यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली. त्यादरम्यान रवी राणा यांनी सोशल मिडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओद्वारे ते बोलत होते.
सकाळी ६.३० च्या सुमारास अनिल परब यांच्या पुणे आणि मुंबईतील ७ ठिकाणांवर ईडीकडून कारवाई करण्यात आली. परबांवर कोट्यवधींची लाच घेतल्याचा आरोप असल्याने ईडीने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ईडीने त्यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला आहे. ईडीने अनिल परब यांचे शासकीय निवासस्थान ‘अजिंक्यतारा’ आणि वांद्रेतील खासगी निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर छापेमारी केल्याचे उघड झाले आहे.
रवी राणांनी दिला 'हा' इशारा
"एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अनिल परबांमुळे अंधारात गेली. नवनीत राणांसारख्या महिला खासदाराला परबांनी जेलमध्ये टाकलं. मराठी माणसांच्या टाळूवरचं लोणी खाणारा अनिल परब गजाआड होणार, असे म्हटले तर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे कारनामेही लवकरच बाहेर निघतील.", असा इशारा रवी राणा यांनी सोशल मिडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओद्वारे दिला.