
मुंबई : रस्त्यांवरच्या अपघातात मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसून येत आहे. त्याचबरोबर रोड रोमियो, छपरी, सोनसाखळीचोर हे दुचाकीवरून सुसाट वेगात पळून जातात. त्यामुळे त्यांना पकडणे पोलिसांना शक्य होत नाही. या सगळ्या प्रकारावर मुंबई वाहतूक पोलिसांनी एक नवा नियम लागू करण्यात आला आहे.
मुंबईच्या रस्त्यांवर दुचाकी चालवत असाल तर, हा नवा नियम तुम्हाला लागू होऊ शकतो. मुंबईकरांना दुचाकी चालवताना आता पुढच्यासह मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. या नव्या नियमामुळे रोड रोमियो, छपरी, सोनसाखळीचोर अशा लोकांवर चाप बसू शकतो. या नियमाचा भंग झाल्यास पुढील १५ दिवसांनंतर मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल. असे मुंबई वाहतूक पोलीस यांनी सादर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
मुंबईकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा नियम लागू करण्यात आला आहे. मोटार वाहन कायदा - १९८८ सह १९४ (ड) अन्वये नियम बंधनकारक असणार आहे. जर ह्या नियमाचे उल्लंघन झाल्यास हेल्मेट शिवाय दुचाकी चालविल्यास मोटार वाहन कायद्यानुसार ५००/- दंड तसेच ३ महिन्यांसाठी लायसन्स निलंबित करण्यात येईल. मुंबईकरांना या नियमाचा भंग करण्यापूर्वी आता विचार करावा लागणार आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांनी दुचाकी चालक तसेच त्याच्या पाठी बसून प्रवास करणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट घालून प्रवास करावा लागणार आहे. तसे न झाल्यास येत्या १५ दिवसात दुचाकी चालक आणि त्याच्या मागे बसलेली व्यक्ती या दोघांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मुंबईकरांना रस्त्यावर सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे.