आजपर्यंत आपण माणसांसाठी रुग्णवाहिका पाहिलेली आहे. मात्र, पशू आणि पक्ष्यांसाठीही आधुनिक उपचार, चिकित्सेच्या साहित्यासह सुसज्ज अशी रुग्णवाहिनी ‘समस्त महाजन’ संस्थेच्या ‘अर्हम अनुकंपा’ उपक्रमाअंतर्गत सुरू झाली आहे. या उपक्रमाचे प्रमुख आहेत परेश शहा. उपक्रमाला ५३ दिवस पूर्ण झाले असून आजपर्यंत ४१३ पशू-पक्ष्यांनी या उपचाराचा लाभ घेतला आहे. जाणून घेऊया या भूतदयेच्या अद्वितीय उपक्रमाबाबत...
मध्यंतरी ‘समस्त महाजन’ संस्थेने एक पोस्टर प्रकाशित केले होते. त्यामध्ये डोळ्यांत अत्यंत करुणादायी भाव असलेला एक कुत्रा होता. पोस्टरवर लिहिलेले होते, “मी रात्रभर रडलो, भुंकलो म्हणून तुम्ही सगळे त्रासलात. पण मी उपाशी आहे, मला जखम झाली आहे, मी आजारी आहे. मला वेदना होतात. मी ते कसे आणि कुणाला सांगू?” ते पोस्टर पशू-पक्ष्यांची व्यथा सांगत होते. खरेच आहे मानवाला बोलता येते, विविध माध्यमांतून तो आपल्या भावना व्यक्त करू शकतो. मात्र, पशू-पक्ष्यांचे काय? त्यांच्या वेदना कोण आणि कशा जाणणार? पूर्वीचे लोक म्हणायचे की, प्राण्यांना कधी सर्दी, ताप किंवा त्यांचे कधी पोट किंवा हातपाय डोके दुखते का? त्यांना कधी उलट्या-जुलाब होतात का? पण ज्यांच्या घरी पाळीव प्राणी आहेत, त्यांना माहिती आहे की, हे सगळे प्राण्यांनाही होते. जे हौसेने पशू-पक्षी पाळतात, ते त्या आजारी पशू पक्ष्यांवर उपचारही करतात. पण रस्त्यावरच्या पशू-पक्ष्यांचे काय? त्यांच्या वेदनांचे आजाराचे आणि जखमांचे काय? या सगळ्यांचा विचार करून ‘समस्त महाजन’ संस्थेने मार्च महिन्यात ‘अर्हम अनुकंपा’ हा उपक्रम सुरू केला.
अनुकंपा कृषा ज्ञेया सर्वसत्त्वेष्वनुग्रहः।
मैत्रीभावोऽथ माध्यस्थं नैःशल्यं वैरवर्जनात् ॥
भारतीय धर्मसंस्कृतीमध्ये अनुकंपा तत्त्वाला मोठे चिंतन आहे. दुसर्यांच्याप्रति मैत्रीभाव, दयाभाव, करुणा भाव राखणे हे धर्माचे तत्त्वज्ञान आणि सार आहे. या अनुकंपेच्या तत्त्वावरच हा उपक्रम आधारित आहे. ही अनुकंपा, दया केवळ मनुष्यप्राण्यांप्रति नाही, तर सजीवसृष्टीतील पशू-पक्ष्यांच्या प्रतिचीही आहे. ‘अर्हम अनुकंपा’ या उपक्रमाचे प्रमुख परेश शहा सांगतात- ”प्रत्येक जीवसृष्टीत ईश्वरी अंश आहे. माणूस काय आणि पशू काय? माणसाला काही झाले, तर माणूस सांगू शकतो, बोलू शकतो. अगदी तो बोलू शकला नाही, तरी त्याचे नातेवाईक, शेजारीपाजारी कोणी नाही, तरी अपरिचित व्यक्तीसुद्धा दया येऊन त्याला मदत करू शकते. पण पशू-पक्ष्यांचे तसे नसते. त्यांच्यातले कुणी आजारी पडले किंवा अपघात झाला, तर ते त्या मदतीची गरज असलेल्या पशू किंवा पक्ष्याला मदत करू शकत नाहीत. त्याला मदत करा, असे कुणाला सांगू शकत नाही. त्यामुळे अशा पशू-पक्ष्यांना आरोग्याची सेवा द्यायलाच हवी, असे ‘समस्त महाजन’ संस्थेने ठरवले. ‘अर्हम अनुकंपा’ या उपक्रमातून आम्ही अशा पशू-पक्ष्यांना आरोग्य सेवा देतो.”
पुढे परेश शहा यांच्याशी या उपक्रमाबाबत बोलताना कळले की, माणसासाठी उपलब्ध असलेली अत्याधुनिक रुग्णवाहिका २० ते २१ लाख रुपयांपर्यंत उपलब्ध होते. मात्र, ‘अर्हम अनुकंपा’अंतर्गत उपयोगात असलेली रुग्णवाहिका २६ लाख रुपयांची आहे. या रुग्णवाहिकेत असे काय वेगळेपण आहे? तर या रुग्णवाहिकेचे वैशिष्ट्य हे की, ही रुग्णवाहिका पशू-पक्ष्यांना उपचारासाठी कोणत्या पशुचिकित्सा दवाखान्यात नेत नाही. उपचाराची गरज असलेल्या पशू-पक्ष्यांवर या रुग्णवाहिकेतच उपचार केले जातात. शस्त्रक्रियाही केल्या जातात. त्यामुळे शस्त्रक्रिया आणि औषधोपचारासहित सुसज्ज अशी ही रुग्णवाहिका असल्याने तिची किंमत जास्त आहे.
ही रूग्णवाहिका बोरिवली येथून कामाला सुरुवात करते. बोरिवली ते अंधेरी या भागात सध्या रुग्णवाहिका जाते. ‘अर्हम अनुकंपा’ उपक्रमासंदर्भात पहिल्यांदा अंधेरी ते बोरिवली भागात जाहिरात करण्यात आली. महत्त्वाच्या गल्ली-चौकात याबाबत पत्रके वाटण्यात आली. छोटे-छोटे बॅनर-स्टिकर्स लावण्यात आले. यामध्ये या रुग्णवाहिकेची माहिती देण्यात आली. आजारी, अपघात झालेले विकलांग पशू-पक्षी आढळल्यास संपर्क करण्यासाठी संपर्क क्रमांकही देण्यात आले, तसेच विनामूल्य उपचार केले जातील, यासंदर्भात जागृती करण्यात आली. श्री नम्रमुनीजी महाराज यांच्या आशीर्वादाने हा उपक्रम मार्च महिन्यात सुरू झाला. उद्घाटनाला सुनील केदार, महाराष्ट्र पशूपालनमंत्री उपस्थित होते. खा. गोपाळ शेट्टी, खा. कपिल पाटील, आ. आशिष शेलार, आ. सुनील राणे, आ. पराग शहा या भाजप खासदार-आमदारांनीही वेळोवेळी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
दररोज सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत ही रुग्णवाहिका काम करते. यात एक डॉक्टर, एक सहकारी असतात. आवश्यकता असेल, तर परेश शहा स्वत:ही रुग्णवाहिकेसोबत पशू-पक्ष्यांच्या मदतीला जातात. दरदिवसाला सरासरी ३० ते ३५ लोक पशू-पक्ष्यांच्या उपचारासाठी संपर्क करतात. त्यापैकी ज्या पशू-पक्ष्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे, तिथे ही रुग्णवाहिका जाते. एकदा तर महापौर निवासातून या रुग्णवाहिकेला संपर्क करण्यात आला होता. महापौर निवासाबाहेर एक आजारी मांजर होते. त्यावर उपचार करा म्हणून संपर्क करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईभरातील वस्त्यांमध्ये या प्राणिमात्रांचे काय होत असेल, हा विचार करून असे काम करणार्या आणखी रुग्णवाहिका सुरू कराव्यात, असे ‘समस्त महाजन’ संस्थेने ठरवले आहे. त्यानुसार भाईंदर आणि विरार इथेही अशा प्रकारे दोन रुग्णवाहिका सुरू करण्यात येणार आहेत.