स्वातंत्र्यवीर सावरकर हे खरे पुरोगामी तथा धर्मनिरपेक्ष

    25-May-2022
Total Views | 70
  
 
 
ss
 
 
 
मुंबई : “स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, हे खरे पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष होते. त्यांनी केवळ हिंदूंच्या अयोग्य रुढींवरच नव्हे, तर मुस्लीम-ख्रिश्चन या धर्माचा अभ्यास करून त्यांच्या कुप्रथांवरही प्रहार केले. ते श्रेष्ठ मानवतावादी होते,” असे प्रतिपादन मुंबई भाजपचे प्रभारी आणि आ. अतुल भातखळकर यांनी नुकतेच केले. तसेच, “ज्या काळात देशाला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, असा ठराव करणेही अवघड होते. त्यावेळी वीर सावरकरांनी अगदी बालवयात ’स्वातंत्र्यलक्ष्मी की जय’ अशा घोषणा दिल्या आणि या देशाच्या स्वातंत्र्याचा उद्घोष करत क्रांतिकार्‍याद्वारे त्यांनी भारतीय स्वातंत्र्याची चळवळ ही जागतिक पातळीपर्यंत नेली,” असेही गौरवोद्गार आ. अतुल भातखळकर यांनी काढले.
 
 
स्वा. सावरकर यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने शौर्य, विज्ञान आणि स्मृतीचिन्ह पुरस्कार, तसेच ‘शिखर सावरकर पुरस्कार’ २०२१ चे नुकतेच वितरण करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. अतुल भातखळकर बोलत होते.
 
 
भारतीय हवाईदलात लढावू विमानाचे वैमानिक म्हणून मोठा अनुभव असणारे ग्रुप कॅप्टन आणि मुंबई ‘एनसीसी’चे प्रमुख (ग्रुप कमांडर) निलेश देखणे हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. “नवीन पिढीला हुतात्म्यांची आठवण करून देण्यासाठीही काम करणार असल्याचे स्पष्ट केले. आपल्या वडिलांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आपण आपल्या मुलाला लष्करात दाखल करू, असा शब्द दिला आणि तो पाळला, ” असे त्यांनी सांगितले.
 
 
यावेळी स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सांगितले की, “वीर सावरकर यांचे लिखाण अत्यंत उत्कृष्ट आणि दर्जेदार आहे. स्वा. सावरकर यांचे विचार आपण जेवढे वाचाल, तेवढी आपली स्फूर्ती आणि प्रेरणा वाढत जाते.” स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यावेळी आपल्या भाषणात म्हणाले की, “वीर सावरकर यांनी मांडलेले विचार, जे आपण विसरत चाललो आहोत, ते वारंवार स्मरणात आणून देण्याचे कार्य सावरकर स्मारक करत आहे.”
 
 
पुरस्कार वितरण
 
 
पुरस्कार वितरणामध्ये ‘शौर्य पुरस्कार’ सुभेदार संतोष राळे यांना प्रदान करण्यात आला. संरक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे अतुल राणे यांचा ‘विज्ञान पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला. वीर सावरकरांच्या विचारांचा प्रसार करणार्‍या वडोदरा येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक केंद्रा’ला ‘स्मृतीचिन्ह पुरस्कार’ देण्यात आला.
 
 
त्याचप्रमाणे शिखर सावरकर मालिकेत गिर्यारोहण क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणारे सुशांत अणवेकर यांना ‘शिखर सावरकर युवा साहस पुरस्कार 2021’, तर रत्नागिरी येथील ‘रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स संस्थे’चा ‘शिखर सावरकर दुर्ग संवर्धन’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ‘शिखर सावरकर जीवनगौरव पुरस्कार’ हा एव्हरेस्टवीर पद्मश्री सोनम वांग्याल त्यांच्यावतीने राजू पाटील यांनी पुरस्कार, मानचिन्ह स्वीकारले.
 
 
सावरकर क्रीडाप्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये तायक्वांडोचे प्रशिक्षक राजेश खिलारी, तनवीर राजे, मौर्यांश मेहता, इशा शाह, ‘रायफल शूटिंग’चे रुचिता विनेरकर, ‘रायफल शूटिंग’ प्रशिक्षक विश्वजित शिंदे, ‘अनादी मी अनंत मी’ या गीतावर नृत्य करणारे गुरुराज कोरगावकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुरस्कार विजेत्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. तसेच, वडोदरा येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक केंद्राच्यावतीने अनिल कानिटकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुणाशंकर तिवारी आणि हेमा निकम यांनी केले. वंदे मातरम्ने समारंभाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी स्मारकाने तयार केलेल्या ‘सावरकरांच्या समाजक्रांतीची यशोगाथा’ या लघुपटाचे लोकार्पणही करण्यात आले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121