७० हजार कोटींच्या फायद्यासाठी मुंबईतील ऐतिहासिक दर्जा असलेल्या वास्तू विकासकांच्या घशात

आ. अ‍ॅड. आशिष शेलार यांचा आरोप

    25-May-2022
Total Views |
 
 
 

shelar 
 
 
 
मुंबई : “मुंबई शहरातील राज्य सरकार नियुक्त हेरिटेज कमिटी अस्तित्वात असतानासुद्धा ‘हेरिटेज’ श्रेणी तीनमधील वास्तू या ‘हेरिटेज कमिटी’च्या परवानगीवीना मुंबई महापालिका आयुक्तांनी परस्पर तोडण्यासाठी परवानगी दिली आहे,” अशी माहिती देताना भाजपचे आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी “यातून विकासकांना ७० हजार कोटींचा फायदा करून देण्यात येत असून, ऐतिहासिक वास्तू तोडून विकासकांच्या घशात या ऐतिहासिक वास्तू आणि जागा घातल्या जात आहेत,” असा आरोप केला. आ. अ‍ॅड. आशिष शेलार मंगळवार, दि. २४ मे रोजी भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधत होते.
 
 
मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे
 
 
मुंबईत श्रेणी तीनमध्ये २५० इमारती आणि ‘स्ट्रक्चर’ आणि १३ परिसरांमध्ये तोडकाम करण्याची परवानगी आयुक्तांनी परस्पर दिली असून, ही कुणाच्या सांगण्यावरून दिली, पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार्‍या या वास्तू तोडण्याची परवागनी दिली जाते, याकडे पर्यटनमंत्र्यांचे लक्ष आहे का, मुंबई आमचीच असा कांगावा करणारे आता या विरोधात का बोलत नाहीत, असे सवाल अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केला असून, याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
 
 
...अन्यथा न्यायालयात
 
 
शिवसेनेचे नगरसेवक व युवा सेनेच्या एका नेत्याच्या जवळचे असलेल्या अमेय घोले नामकम नगरसेवकांनी ‘हेरिटेज कमिटी’ परवानग्या देत नाही, म्हणून ‘हेरिटेज कमिटी’च बरखास्त करा, अशी मागणी केली आहे. हे महाभंयकर आहे. या विषयात मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, आयुक्तांना कायद्याची आठवण करून देतो, अन्यथा, मुंबईच्या सौंदर्यात भर घालणार्‍या वास्तूंच्या संरक्षणासाठी आम्ही न्यायालयात जाऊ,” असा इशारा अ‍ॅड. आशिष शेलार यांनी दिला आहे.
 
 
‘हेरिटेज कमिटी’ अज्ञानात!
 
 
वांद्रे बॅडस्टॅण्ड येथील सरकारी भूखंडावर असणारे असेच ऐतिहासिक ‘स्ट्रक्चर’ तोडण्याची परवानगी आयुक्तांनी दिली याचे प्रकरण आम्ही नुकतेच उघड केले आहे. ‘हेरिटेज कमिटी’ याबाबत स्वत: आयुक्तांनी लिहून कळवते आहे की, एवढी प्रकरणे आमच्या परवानगी शिवाय मंजूर कशी होत आहेत, असा सवालही कमिटीच करते आहे. या कमिटीमधील तज्ज्ञ स्वत: सांगत आहेत की, आम्हाला बाजूला ठेवून हे निर्णय घेतले जात आहेत. तरीही मुंबई महापालिका आयुक्त ऐकायला तयार नसल्याचे अ‍ॅड. आशिष शेलार यांनी सांगितले.