सेवाकार्याचे ‘उधाण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2022   
Total Views |
 
 
 
Page 8
 
 
 
 
 
महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच सामाजिक कार्याचा घेतलेला वसा जगदीश बोडके यांनी आजतागायत जपलेला आहे. त्यांनी स्थापन केलेल्या ‘उधाण युवा बहुउद्देशीय संस्थे’च्या माध्यमातून ते समाजातील वंचित, पीडित व तळागाळातील घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नरत आहे. ‘उधाण युवा बहुउद्देशीय संस्थे’च्या कार्याचा घेतलेला हा आढावा...
 
 
लहानपणापासून जगदीश पांडुरंग बोडके यांना घरातूनच समाजसेवेचे बाळकडू मिळत गेले. शालेय वयातही ते विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचे. कालांतराने समाजसेवा हाच त्यांचा छंद बनून गेला. महाविद्यालयाची पायरी चढल्यानंतरही त्यांची समाजसेवेची आवड तसूभरही कमी झाली नाही. उच्चशिक्षण घेत असताना विविध सामाजिक विषयांचा त्यांनी अभ्यास करत, त्यातील योग्य-अयोग्य यांचा विचार त्यांनी सुरू केला. त्यानंतर जगदीश यांना त्यांच्या समाजसेवेच्या छंदाला व्यापक रूप द्यावेसे वाटले. त्यासाठी त्यांनी एक सामाजिक संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा संस्था स्थापन करण्याचा विचार त्यांनी त्यांच्या मित्रांच्या कानावर घातला. सर्वसंमतीनंतर साली जगदीश आणि त्यांचे मित्र यांनी एकत्र येत ’उधाण युवा बहुउद्देशीय संस्थे’ची स्थापना केली. या संस्थेची स्थापना समाजसेवेसाठी केली असल्याने संस्थेची ‘टॅगलाईन’ त्यांनी ‘चला, सामाजिक बांधिलकी जपूया...’ अशी ठेवली.
 
 
 
त्यानंतर जगदीश यांनी या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्यास सुरूवात केली. अगदी महाविद्यालयात असतानाही त्यांनी सामाजिक उपक्रम राबविले. ‘उधाण युवा संस्थे’ने नाशिकमधील कुंभमेळ्यात अतिशय उल्लेखनीय कामगिरी बजावली. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे पार पडलेल्या या सिंहस्थ कुंभमेळ्यात महानगरपालिका व जिल्हा प्रशासनास ऑनलाईन स्वयंसेवक नोंदणीसाठी संस्थेतर्फे मदत करण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत तसेच सामाजिक माध्यमांच्या साहाय्याने जिल्ह्यातील युवकांना संस्थेने प्रशासनाच्या मदतीसाठी सामाजिक कार्यात सहभागी करवून घेतले. तसेच देश-विदेशातून आलेल्या भाविकांना तिन्ही शाही स्नानाच्या पर्वणीत मोफत अन्नदानाबरोबरच राहण्याची व्यवस्था पुरवण्यात आली. संस्थेतर्फे दरवर्षीचा ‘व्हॅलेंटाईन डे’ वृद्धाश्रमातील नागरिकांसोबत साजरा केला जातो. २०१६ साली गंगाघाट व रस्त्यावरील बेघर आणि अनाथ मुलांसाठी अन्नदानाची मोहीम राबविण्यात आली.
 
 
 
तसेच सन २०१६, २०१७ व २०१८ साली आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांसाठी सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने ३०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शालेय वस्तू वाटप करून अन्नदान उपक्रम राबवित त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. त्याचप्रमाणे पेठ आंबेगण आदिवासी भागात विद्यार्थ्यांना ‘ब्लॅकेट’ वाटप करण्यात आले. २०१७ साली ‘छत्रपतींचे व्यवस्थापन व तत्त्वे’ या विषयावरील पत्रक प्रकाशित करून ती युवकांना वाटण्यात आली. याद्वारे ‘मॅनेजमेंट’ स्वरूपाची शिवजयंती साजरी करण्याचा प्रयत्न संस्थेकडून करण्यात आला. याच दिवशी आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांसाठी अन्नदान करण्यात आले.राज्याचे साधनसंपत्ती जतन व संवर्धन तसेच राष्ट्रउभारणीच्या विकासासाठी साहाय्यभूत ठरण्यासाठी संस्थेने विविध उपक्रम राबवले. यात २०१५ व २०१८ ला दुष्काळजन्य परिस्थिती होती.
 
 
संपूर्ण राज्य पाणीटंचाईला सामोरे जात असताना नाशिक जिल्ह्यातील जनतेस पाणीबचतीसाठी आवाहन करणारे पत्रक वाटप करून त्याचा सोशल मीडियाद्वारे प्रचारप्रसार करून जनजागृतीपर उपक्रमही राबवण्यात आला. २०१६ ला रंगमंचमी आणि धुलिवंदन साजरे करताना पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी दुष्काळजन्य परिस्थिती अधोरेखित करणारी शेकडो ‘पोस्टर्स’ शहरातील विविध चौकांत व महाविद्यालयीन कॅम्पसमध्ये लावत जनजागृती करण्यात आली.
 
 
 
२०१८ साली रंगपंचमीनिमित्ताने नाशिककरांसाठी ‘कलरथॉन’मध्येही सहभाग नोंदवला. समाजातील दुर्बल घटक व अनुसूचित जाती-जमाती यांसाठी ‘उधाण’ संस्था नेहमीच कार्यतत्पर राहिली आहे. २०१४ ला महाराष्ट्र राज्यातील विविध परंपरा व संस्कृती लोकांसमोर मांडण्यासाठी ६० विद्यार्थ्यांना सोबत घेऊन ’महाराष्ट्राची लोकधारा’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. दरवर्षी दीपोत्सवात विविध सामाजिक उपक्रम संस्थेकडून आयोजित केले जातात. अनाथ, अंध शारीरिक व मानसिकदृष्ट्या दिव्यांग मुलांसोबत संस्था दीपोत्सव साजरा करते. समाज परिवर्तनासाठी विशेष मुलांसाठी ‘फॅशन शो’चे आयोजन करण्यात आले. २०१६ ते २०१८ या काळात शारीरिक विकलांग व मतिमंद मुलांसमवेत दिवाळी सण साजरा करण्यात आला. तसेच राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याच्या हेतूने मूकबधिर मुलांसाठी ’रॅम्पवॉक’चेही आयोजन करण्यात आले.
 
 
 
२०१७ साली रस्त्यावरील बेघर व अनाथ मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शालेय वस्तूंचे व कपडे वाटप करण्यात आले. आदिवासी दुर्गम भागात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी लोकसहभागातून एक ‘दप्तर मोलाचं’ या उपक्रमाच्या माध्यमातून २०१७ व २०१८ साली पेठ व त्र्यंबकेश्वर या दुर्गम आदिवासी भागातील शाळेमधील विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले. शिक्षण, प्रौढ शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान तंत्रज्ञान, व्यवसाय व महिला सक्षमीकरण, स्त्रीभ्रूणहत्या, व्यसनमुक्ती तसेच युवकांचा सर्वांगीण विकास यामध्ये संस्थेने भरीव कार्य करण्याचा प्रयत्न केला, जो आजतागायत सुरू आहे.
 
 
 
युवकांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण व्हावी, तसेच त्यांना मतदानाचे महत्त्व समजावे, यासाठी ‘मतदार जागृती अभियान’ राबवण्यात आले, ज्याला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. २०१५ ला पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा उपक्रम राबवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जिल्ह्यातील महाविद्यालयाच्या प्राचार्यांना व शहराला भेट देणार्‍या सिनेकलाकारांना संस्थेतर्फे रोपटे भेट स्वरूपात देण्यात आले. कामगार दिनी बालकामगार मुक्तीसाठी संस्थेने सामाजिक जनजागृती उपक्रम राबवत ‘बालकामगारी हटाव’चा नारा दिला. संस्कृती जपण्यासाठी जिल्हाभरात गुढीपाडवा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. महिला सक्षमीकरणासाठी महाविद्यालयातील युवतींसाठी खास दहीहंडीचे आयोजन करण्यात आले. नाशिकमध्ये पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या जागेसाठी तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठपुरावा करून जागा हस्तांतरणाचे यशही प्राप्त झाले. ‘एमबीए’च्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व शिष्यवृत्तीसाठी वृत्तपत्रांच्या माध्यमातून जगदीश यांनी आवाज उठवला. विद्यार्थ्यांच्या शुल्कामध्ये भरमसाठ वाढ करून होणारी आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी आंदोलन करण्यात आले. वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी त्यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून प्रयत्न केले.
 
 
 
२०१६ ला युवादिनानिमित्त युवकांमधील व्यसनाधिनतेला आळा बसावा, या उद्देशाने अमली पदार्थांची होळी करण्यात आली. पर्यावरणाचा समतोल राखून वृक्षतोड विरहीत होळी सण साजरा करण्यासाठी संस्थेने वेळोवेळी पुढाकार घेतला. ’संस्कृती जपूया, संस्कृती वाढवूया’ या उद्देशाने गुढीपाडवाही संस्थेतर्फे उत्साहात साजरा केला जातो. परिसरातील सर्व वयोगटातील व शारीरिक विकलांग मुलामुलींसाठी नवरात्रीत गरबा- दांडियाचे आयोजन करण्यात आले. २०१७ साली पशुपक्ष्यांना घातक ठरणार्‍या ‘नायलॉन’ मांजाबंदी व अवैध वापराबद्दल जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्यात आला. लहान मुलांमधील कलागुण विकसित व्हावे, या उद्देशाने उन्हाळी नृत्य शिबिराचे आयोजनही केले. २०१७ क्रीडा विभागाच्या ‘चला खेळूया’ उपक्रमातही संस्थेतील सदस्यांनी स्वयंसेवक म्हणून आपला सहभाग नोंदवला.
 
 
 
लोकांमध्ये अवयवदान जनजागृतीसाठीही संस्थेतर्फे विविध उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत ‘के. के.वाघ इंजिनिअरिंग महाविद्यालया’त ‘युवा महोत्सव’ २०१८ व २०१९ साली घेण्यात आला. राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्यासाठी संस्था नेहमीच अग्रेसर राहिली.
 
 
 
नागरी गलिच्छ वस्ती सुधारणा, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या, महिला सक्षमीकरण, साहस यांबाबतही संस्था जागरूक राहिली. २०१६ व २०१९ साली ऑगस्ट महिन्यात गोदावरीला आलेल्या महापुराने संपूर्ण नाशिक ठप्प झाले होते. गोदावरी महापुरातील पूरग्रस्त कुटुंबांना त्यावेळी संस्थेतर्फे आर्थिक मदत व घरगुती किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या या कार्याची दखल स्थानिक वृत्तपत्रे व न्यूज चॅनेलनेदेखील घेतली होती.
 
 
 
जागतिक महिला दिनी स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी व महिला सक्षमीकरणासाठी मुलींकरिता खास जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात आला. किल्ले संवर्धनासाठी ट्रेकिंगचे उपक्रमही राबवण्यात आले. परिसरातील समस्येला त्यांनी वृत्तपत्रातर्फे वाचा फोडल्याने त्यांना सदर वृत्तपत्राने ’बेस्ट सिटीझन रिपोर्टर’ म्हणून सन्मानित केले. सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या या संस्थेला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. तसेच, जगदीश बोडके यांना राज्य शासनाच्या ‘जिल्हा युवा पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. कोरोना काळातही संस्थेतर्फे अन्नदानासह प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. कोरोनाच्या भयानक साथीमध्ये जगदीश यांचे कुटुंब सापडले. कोरोना काळात वडील पांडुरंग बोडके यांच्या निधनाने जगदीश यांना मोठा धक्का बसला. जगदीश यांचे वडील काळाराम मंदिराचे गेल्या अनेक वर्षांपासून विश्वस्त होते. त्यांचेही सामाजिक कार्यात मोठे योगदान होते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत जगदीश समाजसेवेचे वसा पुढे चालवत होते. मात्र, त्यांच्या जाण्याने संस्थेलाही मोठा धक्का बसला. जगदीश आता सावरत असून संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्याला पुन्हा सुरूवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
 
समाजाने पाठ फिरवलेल्या वंचित घटकांसाठी व प्रत्येक व्यक्तीमधील सामाजिक बांधिलकीची भावना जागृत करण्यासाठी प्रत्येकाच्या मनात ही भावना रुजवण्यासाठी ‘उधाण युवा बहुउद्देशीय मित्रमंडळा’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. ‘उधाण’चे कार्य बघता बघता वटवृक्षाइतकेभव्य व विस्तीर्ण होऊ पाहते आहे.
 
 
  
‘उधाण’चा अर्थ उत्साही, भरती येणे, ओसंडणे. आपल्यातील समाजसेवेची भावना उत्साहाने व जोमाने राबवत त्याला गती देण्यासाठी या संस्थेची उभारणी करण्यात आली. सामजिक क्षेत्रात काम करण्याच्या आवडीमुळे संस्थेने आपली वाटचाल सुरु ठेवली. समाजासाठी चांगले काम करण्यासाठी योग्य ती पावले उचलणे आवश्यक असते व याबाबत प्रतिनिधित्व करण्याची भूमिका बजावली जाणार असल्याचे संस्थेच्या सभासदांनी स्पष्ट केले. ‘उधाण युवा बहुउद्देशीय संस्थे’ला त्यांच्या आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@