२०१९ मध्ये स्थापना झालेले ‘अटल इनक्युबेशन सेंटर’ - ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी फाऊंडेशन’ने तीन वर्षातच प्रगतीचा टप्पा गाठला आहे. यात 70हून अधिक उद्योगतज्ज्ञ/ मार्गदर्शक आहेत, जे ‘स्टार्टअप्स’ना सतत मार्गदर्शन, साहाय्य प्रदान करतात. ‘स्टार्टअप’, नवोदित उद्योजक आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘इकोसिस्टीम’मधील १२ हून अधिक शैक्षणिक भागीदार आणि 20 हून अधिक संस्थांचा पाठिंबा आहे. ‘अटल इनक्युबेशन सेंटर’ने प्रमुख उपक्रमाअंतर्गत ‘न्यू इंडिया स्टार्टअप कॉन्क्लेव्ह’च्या दोन आवृत्त्या आयोजित केल्या. ‘ग्लोबल पार्ली’च्या सहकार्याने ‘अॅग्रीगेट’ नावाचा एक कार्यक्रमदेखील सुरू केला आहे.
मुंबई : डॉ. चिंतन वैष्णव, मिशन डायरेक्टर, एम- नीती आयोग यांनी नुकतीच ‘अटल इनक्युबेशन सेंटर’ , ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी फाउंडेशन’ला भेट दिली. त्यांनी ‘संवाद’ व्यासपीठाद्वारे ‘अटल इनक्युबेशन सेंटर ’च्या संबधित उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थितांना प्रेरणा मिळाली. कोरोनाच्या महामारीनंतर सगळे जग मागे पडले होते. मात्र, त्या काळातही कल्पक संकल्पनांच्या माध्यमातून उद्योग-व्यवसाय निर्माण करणार्या ‘स्टार्टअप’संबंधित व्यक्तींचे त्यांनी अभिनंदन केले. डॉ. वैष्णव यांनी यशस्वी ‘स्टार्टअप’ची उदाहरणे देऊन ‘स्टार्टअप’ला प्रोत्साहन दिले, तसेच धैर्य आणि चिकाटी ही यशाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले. शैक्षणिक भागीदारांशी चर्चा करताना त्यांनी शैक्षणिक ‘इकोसिस्टीम’ बदलण्याचे आणि ‘स्टार्टअप’ला अधिक अनुकूल बनवण्याचे महत्त्व सांगितले.
तसेच या ‘स्टार्टअप’संदर्भातील भागीदारांशी संवाद साधला. डॉ. वैष्णव यांनी ‘एआयसी-आरएमपी’च्या प्रयत्नांचे आणि तत्त्वज्ञानाचे कौतुक केले आणि केंद्राकडे प्रादेशिक केंद्र बनण्याची क्षमता असल्याचे अधोरेखित केले. यावेळी व्यासपीठावर नीति आयोगाच्या सल्लागार गरिमा उज्जैनिया होत्या.
यावेळी डॉ. वैष्णव यांनी ‘अटल इनक्युबेशन सेंटर’ - ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी फाऊंडेशन’ मधून पदवी प्राप्त केलेल्या पहिल्या गटातील ‘इनक्युबेट्स’चे कौतुक केले.
वैष्णव आणि अरविंद रेगे, व्यवस्थापकीय संचालक, ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी फाऊंडेशन’ यांच्याकडून पदवी प्रमाणपत्र घेण्यात आली.
त्यानंतर नीति आयोगाच्या पदाधिकार्यांनी उत्तन, भाईंदर (पश्चिम) येथील अत्याधुनिक कॅम्पस/सुविधेचा दौरा केला.
‘अटल इनक्युबेशन सेंटर’ - ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी फाऊंडेशन’च्या तीन समूहांद्वारे ४४ ‘स्टार्टअप्स’ (१५ + महिलांच्या नेतृत्वाखालील ‘स्टार्टअप्स’चा समावेश आहे) ‘इनक्युबेट’ केले आहेत. सुरुवातीच्या दोन गटांतील या स्टार्टअप्सनी ३०० हून अधिक नोकर्या निर्माण केल्या. या सगळ्या ‘स्टार्टअप्स’मध्ये भरपूर वैविध्य होते. काहींकडे केवळ संकल्पनेसंदर्भात कल्पनास्वरूपातले विचार होते, तर काही ‘स्टार्टअप्स’च्या कल्पना प्रत्यक्ष संकल्पना स्वरूपात तयार होत्या. उदहारणार्थ- ‘जव्हार टुरिझम’सारखे काही ‘स्टार्टअप’ अगदी सुरुवातीच्या संकल्पनांसह सहभागी झाले होते, तर ‘ओम्निक्युरीस’सारखे स्टार्टअप संकल्पनेवर काम करून स्टार्टअपमध्ये सहभागी झाले होते.