सावरकर जयंतीनिमित्त सामुदायिक व्रतबंध

"मी सावरकर’ आणि ‘स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थांचा उपक्रम

    24-May-2022
Total Views |

savarkar
 
 
 
 
 
पुणे : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ‘मी सावरकर’ आणि ‘स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थांच्या वतीने सकल हिंदू सामुदायिक व्रतबंध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यक्रम प्रमुख रवींद्र ढवळीकर यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे.
 
 
 
‘व्रतबंध’ हा हिंदू संस्कृतीमधील सोळा संस्कारांपैकी एक महत्त्वाचा संस्कार आहे. गुरुकुल पद्धतीत गुरुगृही शिक्षणासाठी जाणार्‍या आणि ज्ञानार्जनाचे वय झालेल्या शिक्षार्थींवर हा संस्कार केला जायचा. पूर्वी हिंदू संस्कृतीत काही विशिष्ट समाजामध्येच हा संस्कार केला जायचा. परंतु स्वा. सावरकरांनी सामाजिक समानतेचा पुरस्कार करुन काही सामाजिक सुधारणा घडवून आणण्यास सुरुवात केली. त्यांनी जातीभेदांना छेद देत सकल हिंदू समाजाकरीता मंदिरे उभारली आणि सर्व समाजातील मुलांच्या मुंजी ही लावल्या. सावरकरांच्या ‘कि घेतले व्रत न आम्ही अंधतेने’ या उक्तीनुसार हा व्रतबंध संस्कार व्यापक प्रमाणात करण्यात येणार आहे.
 
 
 
येत्या शनिवारी (२८ मे) सावरकर जयंती दिनी सकाळी ९ वाजता कर्वे रस्त्यावरील अश्वमेध मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. आतापर्यंत विविध समाजातील ३५ बटूंनी व्रतबंधासाठी नोंदणी केली आहे. सकाळी सर्व धार्मिक विधी संपन्न होतील. संध्याकाळी कार्यालयापासून म्हात्रे पुलाजवळील महादेव मंदिरापर्यंत भिक्षावळ यात्रा काढण्यात येणार आहे. तिथे मोहनबुवा रामदासी यांच्या हस्ते बटूंना भिक्षा दिली जाणार आहे.