बीज अंकुरे अंकुरे

    24-May-2022
Total Views |
Ayurved

विविध स्त्री अवयव विशेष व्याधींबद्दल आपण या लेखमालिकेतून सविस्तर माहिती घेत आहोत. विविध दोष-दुष्टींमुळे हे रोग उद्भवतात. दोष-धातु व मल यांचा समतोल बिघडल्यास विकृती व समतोल साधल्यास प्रकृती, असे आयुर्वेदशास्त्र सांगते. बरेचसे स्त्री विशेष व्याधी हे गर्भाशय, स्त्रीबीज, नलिका व अंडाशय या अवयवांशी संबंधित आहेत. हे सर्व अवयव ओटीपोटात स्थित आहेत. आयुर्वेदशास्त्रात विविध चिकित्सा उपक्रम सांगितले आहेत. या अवयव विशेष चिकित्सेबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
 
शमन चिकित्सा व शोधन चिकित्सा हे चिकित्सेचे मुख्य दोन भेद होतात. (शोधन म्हणजे, दूषित, वाढलेले दोष ज्यांमुळे व्याधी उत्पन्न झाली आहे, अशांचे शरीरातून निष्कासन करणे होय. यासाठी मुख्यत्वे करून पंचकर्म केले जाते.) व जेव्हा दोषांची दुष्टी खूप अधिक प्रमाणात नसते, त्यांची समस्थिती औषधोपचाराने साधता येणे शक्य असते, अशा वेळेस शमन चिकित्सा केली जाते. तसेच, बाह्य चिकित्सा व आभ्यंतर चिकित्सा, असे देखील शमन चिकित्सेचे दोन भेद आहेत. बाह्य चिकित्सेमध्ये वेगवेगळे लेप (प्रदेह, आलेप इ.), स्नेहन, उद्घर्षण, स्वंदन (वाफ देणे, शेकणे इ.), धावन, धूपन, प्रतिसारण, निर्लेखन इ. चिकित्सा प्रकारांचा अंतर्भाव होतो. यातील स्त्री विशेष अवयवांची चिकित्सा करताना शोधन चिकित्सा व शमन चिकित्सा तर करावी लागतेच. त्याचबरोबर स्थानिक चिकित्साही कराव्या लागतात. यामध्ये योनि धावन, योनि प्रशालन, पिचू धारण, धूपन, सार प्रतिसारण, परिषेक इ. बाह्य चिकित्सांचा अंतर्भाव होतो. त्याबद्दल जाणून घेऊयात.
 
 
स्त्री शरीरातील बाह्य चिकित्सेतील वरील उपक्रम महत्त्वाचे आहे. श्वेतप्रदर, रक्तप्रदर इ. तक्रारींमध्ये योनि धावनाचे विशेष कार्य दिसून येते. योनि हा भाग अतिस्रावामुळे दमट राहिल्यास योनि कुपू व पिटीका (फोड येणे) संभावतात. तसाच हा स्राव संक्रमित झाल्यास दुर्गंधित स्राव होऊ लागतो. यामुळे इतर इन्फेक्शन्सचीशक्यताही वाढते. मग अंगात कणकण येणे, अंगदुखी, स्थानिक योनि प्रदेशी खाज इत्यादीने त्रस्त होणे, हे बर्‍याच महिलांमध्ये आढळणार्‍या तक्रारी आहेत. आभ्यंतर शमन चिकित्सेचा फायदा होतो. पण, त्याचबरोबर योनि धावन केल्यास लवकर आराम पडतो. श्वेतप्रदर, रक्तप्रदर, अत्याधिक चिकट स्राव इ. तक्रारींमध्ये अंतःवस्त्र ही नेहमी सूतीची असावीत. गुह्यांग स्वच्छ व कोरडे असावे. अनावश्यक व अतिरिक्त केसांचे कर्तन करावे. सकाळ-संध्याकाळ शौच-शुद्धि व कपडे बदलणे हे कटाक्षाने पाळावे.
 
 
योनि धावन म्हणजे ’तरसळपरश्र थरीह’होय. त्रिफळा, लोध्र, पंचवल्कल, पाठा-धमासा इ. विविध औषधी वनस्पतींचा वापर या योनि धावनासाठी केला जातो. रुग्णांची प्रकृती व रोगामध्ये असलेल्या दोषांच्या स्थितीनुसार ही औषधी वनस्पती निवडली जाते. या वनस्पती ओल्या/ताज्या किंवा वाळल्यावर त्याची भरड अशा दोन्ही स्वरुपात वापरता येतात. ही भरड पाण्यात थोडावेळ भिजवावी व नंतर त्याचा काढा करावा. म्हणजे पाण्यात भरड घालून उकळावे व पाणी निम्मे होईपर्यंत आटवावे. नंतर काढा गाळून त्याने योनि धावन करावे. योनि धावनासाठी काढा खूप गरम नसावा. पण, एकदम थंडही नसावा. वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली योनि धावन करतेवेळी विशेष पिचकारीने ही क्रिया केली जाते तेव्हा तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली खालीच योनि धावन करावे.
 
 
योनि प्रशालन - योनि धावनासारखेच प्रशालनसुद्धा केले जाते. पण, हे थोडे बाह्यतः 'सुपरफिशीयली' केले जाते. हे रुग्णास शिकवून तिने घरच्या घरी करता येण्यासारखे कर्म आहे. यामध्ये देखील वरील सांगितल्याप्रमाणे विविध वनस्पती (एकेरी किंवा काही एकत्र संयोजनामध्ये निवडून) वापरली जातात. योनि धावन हे गर्भाशय मुखापर्यंत (उर्शीींळु) केले जाते, तर योनि प्रशालन हे बाह्य योनिच्या आसपास केले जाते, हा यातील फरक आहे.
वारंवार होणार्‍या यु टी आय  आटोक्यात आणण्यासाठी या दोन्ही बाह्योपचारासाठी फायदे तर आहेतच. पण, पुनोस्ती टाळण्यासाठी तसेच वारंवार होणार्‍या इन्फेक्शन्सना आळा घालण्यासाठी देखील (अपुनर्भर चिकित्सा) या दोन्ही बाह्योपचारांचा उत्तम फायदा होतो.
योनि धुपन-धावन (योनि) व योनि प्रशालन यामध्ये काढा म्हणजेच जलीय तत्वाचा वापर केला जातो. पण, याव्यतिरिक्त 'वजायनल फ्युमीगेशन' (धुरी या स्वरूपातील) शुद्धि योनि धूपनाने केली जाते. यामध्ये विविध औषधांची धूरी बाह्यतः दिली जाते. ही औषधे वनस्पतीज, खनिज व प्राणीज या तिन्ही प्रकारची असतात. (सिद्ध घृत, गुग्गुळ इ.) याने स्थानिक आर्द्रता तर कमी होतेच, पण त्याचबरोबर स्थानिक दुर्गंधी व खाजही कमी होते. योनि प्रदेशी अधिक आग होत असल्यास, ती जागा लालबूंद झाली असल्यास, मात्र योनि धूपन टाळावे. पिटीका (फोडी) असल्यास ही योनि धूपन टाळावे. प्रत्येक कर्म जरी करण्यास सोपे वाटले, तरी प्रकृतीसापेक्ष काय चालेल व कशाचा त्रास होईल, हे सामान्य व्यक्तीला कळणार नाही व नंतर त्रास बळावला की, चिकित्सेला दोष दिला जातो. एका व्यक्तीला फायदा झाला म्हणून सर्रास प्रत्येक व्यक्तीला होईलच असे नाही. तेव्हा, तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच या विधी करुन घ्याव्यात.
 
पावसाळ्यामध्ये व उन्हाळ्यात (दमट व अति घाम) या कारणामुळे योनि प्रदेशी विविध तक्रारी उद्भवतात. औषधोपचाराने आराम पडतो. पण, पुन्हा-पुन्हा उद्भवतात अशा वेळेस योनि धावन, योनि प्रशालन किंवा योनि धूपन यांचाही अन्य चिकित्सेबरोबर, अवलंब केल्यास वारंवार होणार्‍या त्रासाला थांबविता येते. अन्य बाह्योपचारांबद्दल पुढील लेखांत जाणून घेऊया. (क्रमशः)

-वैद्य कीर्ती देव
आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.